T20 World Cup 2024 PAK vs USA: बाबर-शादाबने पाकिस्तानची लाज राखली; अमेरिकेसमोर 159 धावांचे आव्हान
T20 World Cup 2024 PAK vs USA: बाबर आणि शादाबच्या 72 धावांच्या भागीदारीमुळे पाकिस्तानला 159 धावा करण्यात यश आले.
T20 World Cup 2024 PAK vs USA: टी 20 विश्वचषत स्पर्धेत (T20 World Cup 2024) प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानने अमेरिकेविरुद्धच्या सामन्यात 159 धावा केल्या आहेत. संघाकडून सर्वाधिक धावा कर्णधार बाबर आझमने केल्या. बाबारने 43 चेंडूत 44 धावा केल्या. दरम्यान, शादाब खानने 25 चेंडूत 40 धावांची तुफानी खेळी करत पाकिस्तानला संकटातून सोडवले. सुरुवातीला अमेरिकेच्या गोलंदाजांनी पाकिस्तान संघाला अडचणीत आणले होते, मात्र बाबर आणि शादाबच्या 72 धावांच्या भागीदारीमुळे पाकिस्तानला 159 धावा करण्यात यश आले. अमेरिकेकडून नोशातुश केन्झिगेने सर्वाधिक 3 विकेट्स घेतल्या.
नाणेफेक गमावल्यानंतर पाकिस्तानी संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्यात आले. टेक्सासमधील ग्रँड प्रेरी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात पाकिस्तानची सुरुवात खूपच खराब झाली कारण पाकिस्तानी संघाने डावाच्या पहिल्या 15 चेंडूंमध्ये 2 महत्त्वाचे विकेट्स गमावल्या. मोहम्मद रिझवान केवळ 9 धावा करू शकला, तर उस्मान खान केवळ 3 धावा करून बाद झाला. फखर झमानने फलंदाजीसाठी येताच दमदार षटकार मारला, पण तोही 5व्या षटकात 11 धावा काढून पॅव्हेलियनमध्ये परतला. पॉवरप्लेमध्ये पाकिस्तान संघाने 30 धावांत 3 विकेट गमावल्या होत्या.
दरम्यान, बाबर आझम आणि शादाब खान यांच्यातील 72 धावांच्या महत्त्वपूर्ण भागीदारीने पाकिस्तानची लाज राखली. बाबर आणि शादबची चांगली भागिदारी होत असताना 13व्या षटकात केन्झिगे नावाच्या गोलंदाजाने शादाबला 40 धावांवर बाद केले आणि पुढच्याच चेंडूवर आझम खानला शून्यावर बाद केले. 15 षटकांपर्यंत पाकिस्तान संघाची धावसंख्या 5 विकेट गमावून 113 धावा होती. पण पुढच्याच षटकात कर्णधार बाबर आझम 44 धावा करून बाद झाला. कर्णधार बाद झाल्यानंतर धावांचा वेग मंदावला आणि दरम्यान, इफ्तिखार अहमद 18 धावांवर बाद झाला. अखेरच्या षटकांमध्ये शाहीन आफ्रिदीने आक्रमक फलंदाजी करत 16 चेंडूत 23 धावा करत पाकिस्तानची धावसंख्या 159 पर्यंत नेली.
बाबर आझमचा विक्रम-
बाबर आझमने यूएसएविरुद्धच्या सामन्यात 16 धावा करून आंतरराष्ट्रीय T20 क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम केला आहे. हा सामना सुरू होण्यापूर्वी बाबर आझम सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत विराट कोहलीपेक्षा केवळ 15 धावांनी मागे होता. बाबरच्या आता 120 टी-20 सामन्यांमध्ये 4,067 धावा आहेत. या यादीत दुसऱ्या स्थानावर भारताचा माजी कर्णधार विराट कोहली आहे, ज्याच्या सध्या 118 सामन्यांमध्ये 4,038 धावा आहेत. रोहित शर्माच्या नावावर सध्या 4,026 धावा आहेत.