(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ICC T20 World Cup 2024: देशात एकच खेळपट्टी, खेळण्यासाठी किटही नव्हते; पापुआ न्यू गिनीला ऑस्ट्रेलिया अन् न्यूझीलंड बोर्डाकडून मदत
ICC T20 World Cup 2024: ऑस्ट्रेलियन आणि न्यूझीलंड क्रिकेट बोर्डांसह आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) पापुआ न्यू गिनीमध्ये क्रिकेटला चालना देण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिले.
ICC T20 World Cup 2024: सध्या वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये खेळल्या जाणाऱ्या टी-20 विश्वचषक 2024 मध्ये (ICC T20 World Cup 2024) एकूण 20 संघ सहभागी होत आहेत. यापैकी एका संघाचे नाव पापुआ न्यू गिनी आहे, जो ऑस्ट्रेलियाजवळ स्थित एक छोटासा देश आहे. पापुआ न्यू गिनी हा तोच संघ आहे ज्याने या विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात वेस्ट इंडिजला कडवी टक्कर दिली होती. या देशाच्या क्रिकेट संघाची कहाणी खूप रंजक पण संघर्षांनी भरलेली आहे. ऑस्ट्रेलियन आणि न्यूझीलंड क्रिकेट बोर्डांसह आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) पापुआ न्यू गिनीमध्ये क्रिकेटला चालना देण्यासाठी महत्त्वाचे योगदान दिले.
पहिला एकदिवसीय सामना 2014 मध्ये खेळला-
पापुआ न्यू गिनी 1973 पासून आयसीसीचा सदस्य असला तरी या संघाला 2014 मध्ये एकदिवसीय क्रिकेट खेळण्याचा दर्जा मिळाला. 8 नोव्हेंबर 2014 रोजी, पापुआ न्यू गिनीने त्यांच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात हाँगकाँगचा 4 गडी राखून पराभव केला. या संघाने आत्तापर्यंत 66 एकदिवसीय सामने खेळले आहेत, त्यापैकी फक्त 14 वेळा जिंकले आहेत.
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडने मदत केली-
2015 च्या वनडे क्रिकेट विश्वचषकाचे आयोजन ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडने संयुक्तपणे केले होते. खरे तर ही स्पर्धा दोन्ही देशांसाठी फायदेशीर ठरली. अशा परिस्थितीत दोन्ही देशांनी पापुआ न्यू गिनीमध्ये क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी सुमारे 1.67 कोटी रुपयांची देणगी दिली. त्यांच्याशिवाय आयसीसीनेही सुमारे 83.5 लाख रुपयांची देणगी दिली आहे. ही रक्कम मिळून 4 कोटींहून अधिक झाली होती. त्यावेळी पापुआ न्यू गिनीमध्ये एकूण 48 क्रिकेट खेळपट्ट्या तयार केल्या जातील असे ठरले होते.
संपूर्ण देशात एकच खेळपट्टी होती-
2015 च्या वेळी पापुआ न्यू गिनीच्या संपूर्ण देशात एकच खेळपट्टी होती. अशा परिस्थितीत दान केलेल्या पैशातून 48 खेळपट्ट्या बनवणे ही एक मोठी मोहीम म्हणून पाहिले जात होते. या संघाची अवस्था अशी होती की सर्व खेळाडू किट वाटून घ्यायचे. त्यावेळी संघाचे प्रशिक्षक असलेल्या अँडी बिकेल यांनी ग्रेग कॅम्पबेल यांना पापुआ न्यू गिनी येथे बोलावून या संघाची जबाबदारी सोपवली. अशा प्रकारे पापुआ न्यू गिनी संघ जगभरात छाप सोडण्यात यशस्वी ठरला आहे.
पापुआ न्यू गिनीने वर्ल्डकपमध्ये 2 सामने गमावले-
पापुआ न्यू गिनीने टी20 विश्वचषक 2024 मध्ये आतापर्यंत दोन सामने खेळले आहेत. पहिल्या चकमकीत असद वालाच्या नेतृत्वाखाली संघाला निकराच्या सामन्यात वेस्ट इंडिजकडून 5 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला होता. दुसऱ्या सामन्यात युगांडाविरुद्ध 3 गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. ग्रुप स्टेजमध्ये अजून 3 सामने बाकी आहेत आणि जर टीमला सुपर-8 च्या आशा जिवंत ठेवायच्या असतील तर त्याला पुढील तीन सामने जिंकावे लागतील.