T20 World Cup 2024 Ind vs Pak: 'विराट कोहली पाकिस्तानात ज्या दिवशी खेळेल...'; माजी कर्णधाराचं विधान, सामन्याआधी काय म्हणाला?
T20 World Cup 2024 Ind vs Pak: पाकिस्तानचा माजी कर्णधार अझहर अलीने विराट कोहलीबाबत केलेले वक्तव्य समोर आले आहे.
T20 World Cup 2024 Ind vs Pak: टी-20 विश्वचषकात (T20 World Cup 2024) 19 वा सामना भारत आणि पाकिस्तान (India vs Pakistan) यांच्यात होणार आहे. न्यूयॉर्कमधील नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार रात्री 8 वाजता हा सामना सुरू होईल. या सामन्यात विराट कोहलीची (Virat Kohli) फटकेबाजी पाहायला मिळेल. दरम्यान सामन्यापूर्वी पाकिस्तानचा माजी कर्णधार अझहर अलीने विराट कोहलीबाबत केलेले वक्तव्य समोर आले आहे. ज्यामध्ये अझहरने विराट कोहलीच्या पाकिस्तानातील क्रेझची माहिती दिली आहे.
अझहर अली नेमकं काय म्हणाला?
पाकिस्तानमध्ये विराट कोहलीची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. पाकिस्तानचा माजी कर्णधार अझहर अलीने याबाबत माहिती दिली आहे. जर कोहली पाकिस्तानमधील लाहोरच्या मैदानात खेळला, तर विराट कोहलीचे पाकिस्तानात किती चाहते आहेत, हे दिसेल. संपूर्ण मैदान पाकिस्तान्या हिरव्या रंगाच्या जर्सीने भरून निघेल, पण जर्सीच्या मागे पाकिस्तानी खेळाडू बाबर आझम किंवा शाहीन अफ्रिदीचे नाव दिसणार नाही, तर विराट कोहलीचे नाव दिसेल.
अझहर कोहलीच्या चांगल्या फॉर्मसाठी प्रार्थना करायचा
अझरने असेही सांगितले की काही काळापूर्वी जेव्हा कोहली धावा करू शकत नव्हता तेव्हा तो त्याच्यासाठी प्रार्थना करत असे. जेव्हा कोहली चांगल्या फॉर्मात नव्हता, तेव्हा मी त्याच्यासाठी अनेकदा प्रार्थना केली होती, का माहित नाही, पण मी सतत तीन वर्षे प्रार्थना केली, असं अझहरने सांगितले.
विराट कोहलीचा पाकिस्तानविरुद्ध चांगला रेकॉर्ड-
टीम इंडियाने टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये पहिला सामना आयर्लंड विरुद्ध खेळला होता, ज्यामध्ये विराट कोहली काही खास करू शकला नाही. सलामीला कोहली रोहित शर्मासोबत मैदानावर दिसला. मात्र, वेगवान धावा करण्याच्या प्रयत्नात कोहलीने आपली विकेट गमावली. कोहलीने 5 चेंडूत केवळ 01 धावा केल्या होत्या. पण, विराट कोहलीचा पाकिस्तानविरुद्धचा विक्रम अतिशय उत्कृष्ट आहे. गेल्या T20 विश्वचषकात, त्याने 53 चेंडूंमध्ये 6 चौकार आणि 4 षटकारांच्या मदतीने 82* धावांची खेळी केली आणि भारताला गमावलेला सामना जिंकण्यास मदत केली.
कोहलीचा आतंरराष्ट्रीय रेकॉर्ड-
कोहलीच्या टी-20 इंटरनॅशनलमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या एकूण रेकॉर्डबद्दल सांगायचे तर, त्याने 10 सामने खेळले आणि 10 डावात 81.33 च्या सरासरीने आणि 123.85 च्या स्ट्राइक रेटने 488 धावा केल्या. या कालावधीत, त्याने आपल्या बॅटने 5 अर्धशतके केली आहेत, ज्यामध्ये उच्च धावसंख्या 82* धावा आहे. कोहलीने पाकिस्तानविरुद्धच्या T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात आतापर्यंत 48 चौकार आणि 11 षटकार मारले आहेत.
भारत विरुद्ध पाकिस्तान T20 विश्वचषक हेड टू हेड
टी-20 विश्वचषकात भारत आणि पाकिस्तान यांच्यात 7 सामने झाले आहेत. या 7 सामन्यांमध्ये भारताने पाकिस्तानवर वर्चस्व राखले आहे. भारताने 5 सामने जिंकले असून पाकिस्तानने फक्त एकच सामना जिंकला आहे. एकदा सामना टाय झाला आणि एका सामन्यात निकाल लागला नाही.