(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Mohammed Azharuddeen | नावच नाही तर कामही अझहरसारखं... केवळ 37 चेंडूत शतक करणारा मोहम्मद अझहरुद्दीन कोण आहे?
सोशल मीडियावर सध्या मोहम्मद अझहरुद्दीन चर्चेत आहे. पण अझहरुद्दीन भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार नाही तर केरळ क्रिकेट संघाचा सलामीवीर आहे. मोहम्मद अझहरुद्दीन याच्याशी नावसाधर्म्य असलेला केरळच्या या शिलेदाराने कामही अझहरसारखं केलं आहे.
मुंबई : सय्यद मुश्ताक अली टी-20 चषकाच्या ग्रुप-ईच्या एका सामन्यात मुंबईने केरळविरोधात 20 षटकात सात विकेट्सच्या मोबदल्यात केवळ 196 धावा केल्या. पण आश्वासक धावसंख्या असूनही आपला पराभव होईल याचा अंदाज कदाचित मुंबईला आला नसावा. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर रंगलेल्या या सामन्यात केरळचा युवा फलंदाज मोहम्मद अझहरुद्दीन सलामीला उतरला आणि त्याच्या तुफानी खेळीमुळे मुंबईच्या दिग्गज गोलंदाजांच्या अपेक्षांवर विरजण पडलं. पाहता पाहता या सलामीवीराने 37 चेंडूंमध्ये शतक केलं. त्याच्या या शतकाच्या जोरावर केरळने 15.5 षटकातच 8 विकेट्सनी विजय मिळवला.
या अझहरुद्दीनची आज जोरदार चर्चा रंगली आहे. भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझहरुद्दीन याच्याशी नावसाधर्म्य असलेला केरळचा हा शिलेदार सकाळी ट्विटरवर ट्रेण्डिंगमध्ये होता. केवळ नावच नाही तर कामही अझहरसारखं आहे. जाणून घेऊया मुंबईविरुद्ध तुफानी खेळी रचणाऱ्या केरळच्या या मोहम्मद अझहरुद्दीनविषयी.
भावाने आपल्या हिरोचं नावं दिलं यातील रंजक बाब अशी की, या मोहम्मद अझहरुद्दीनचा भारताचा माजी कर्णधार मोहम्मद अझहरुद्दीनशी खास कनेक्शन आहे. केरळच्या या अझहरुद्दीनचा जन्म 1994 मध्ये झाला होता. त्यावेळी माजी कर्णधार अझहरुद्दीनची जादू क्रिकेटचाहत्यांवर होती. त्याच्या चाहत्यांमध्ये केरळच्या या युवा फलंदाजाचा मोठा भाऊ कमरुद्दीनचाही समावेश होता. त्यानेच धाकट्या भावाला आपल्या आवडत्या खेळाडूचं नाव दिलं. विशेष म्हणजे त्याच्या आई-वडिलांना दुसरंच नाव ठेवायचं होतं.
अझहरच्या नावाने प्रसिद्ध जेव्हा त्याचं नाव मोहम्मद अझरुद्दीन ठेवलं तेव्हा कोणालाही कल्पना नव्हती की हा अझरुद्दीनही आपल्या भावाच्या आवडत्या खेळाडूप्रमाणेच क्रिकेटपटू बनेल आणि अशी ऐतिहासिक खेळी रचेल.
आता अझहरुद्दीनची क्रिकेट कारकीर्द पाहू. त्याने प्रथम श्रेणी क्रिकेट कारकीर्दीची सुरुवात 2015 मध्ये केली होती. अझहर नावाने प्रसिद्ध असलेल्या या खेळाडूने आतापर्यंत 22 प्रथम श्रेणी सामन्यात 959 धावा केल्या आहेत. यात एक शतक आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे.
टी-20 मधील पहिलं शतक टी-20 क्रिकेटबद्दल बोलायचं झाल्यास त्याने 21 सामन्यांमध्ये 404 धावा केल्या आहेत. मुंबईविरुद्ध केलेलं शतक हे त्याच्या कारकीर्दीतल पहिलं शतक आहे. याआधी त्याच्या नावावर एक अर्धशतकही नव्हतं. मोहम्मद अझहरुद्दीनने आठ चौकार आणि आठ षटकारांच्या मदतीने आपलं शतक पूर्ण केलं. तो केवळ चारच चेंडू निर्धाव खेळला. 54 चेंडूत नऊ चौकार आणि षटकारांच्या मदतीने त्याने नाबाद 137 धावा केल्या.
???? in 37 balls! ????????
Sensational stuff this is from Mohammed Azharuddeen. ???????? What a knock this has been from the Kerala opener! ???????? #KERvMUM #SyedMushtaqAliT20 Follow the match ???? https://t.co/V6H1Yp60Vs pic.twitter.com/Nrh88uOOFU — BCCI Domestic (@BCCIdomestic) January 13, 2021
दुसरं सर्वात जलद शतक मोहम्मद अझहरुद्दीनच शतक हे सय्यद मुश्ताक अली चषकातील दुसरं सर्वात वेगवाग शतक आहे. याआधी रिषभ पंतने 2018 मध्ये 32 चेंडूत शतक केलं होतं. तर केरळसाठी टी20 क्रिकेटमध्ये शतक करणारा तो पहिला फलंदाज आहे. याआधी केरलकडून 2013 मध्ये रोहन प्रेमच्या नाबाद 92 धावा ही सर्वोच्च होती.