Gautam Gambhir on ROKO: रोहित-विराटचं कमबॅक झालेल्या सिरीजबाबत गौतम गंभीरचं भाष्य, म्हणाला, 'देश हरताना आपण सेलिब्रेशन करु शकत नाही'
Team India Virat Kohli & Rohit Sharma: रोहित अन् विराटची दमदार कामगिरी पण गौतम गंभीरने मुलाखतीमध्ये दोघांचाही उल्लेख खड्यासारखा वगळला, एकदाही नाव घेतलं नाही, नेमकं काय घडलं?

Team India Gautam Gambhir: भारतीय क्रिकेटमधील सर्वात लोकप्रिय खेळाडूंपैकी असलेल्या रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनी काही दिवसांपूर्वीच ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेच्यानिमित्ताने टीम इंडियात पुनरागमन केले. भारतीय संघाने ही एकदिवसीय मालिका 2-1 अशा फरकाने गमावली असली तरी रोहित शर्मा आणि विराट कोहली (Virat Kohli) यांच्या चांगल्या कामगिरीचे क्रीडारसिकांकडून कौतुक करण्यात आले होते. भारतीय संघ हरला असला तरी लाडक्या रोहित शर्मा (Rohit Sharma) आणि विराट कोहली यांना पुन्हा मैदानात टॉप फॉर्ममध्ये फलंदाजी करताना पाहून अनेक चाहत्यांचा जीव सुखावला होता. मात्र, याबाबत भारतीय संघाचा प्रशिक्षक गौतम गंभीर (Gautam Gambhir) याला फारसे कौतुक नसल्याचे दिसून येत आहे. गौतम गंभीर याने 'बीसीसीआय टीव्ही'ला दिलेल्या मुलाखतीत याबाबत भाष्य करताना आपल्यासाठी खेळाडूंच्या वैयक्तिक कामगिरीपेक्षा सांघिक कामगिरी आणि संघाचा विजय महत्त्वाचा असल्याचे परखडपणे नमूद केले. विशेष म्हणजे या संपूर्ण मुलाखतीत गौतम गंभीर याने एकदाही रोहित शर्मा आणि विराट कोहली यांचा एकदाही उल्लेख केला नाही. याऐवजी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघाचा पराभव कसा झाला, यावरच तो बोलत राहिला.
ऑस्ट्रेलियावरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील तीन सामन्यांमध्ये रोहित शर्मा याने 8,73 आणि 121 धावा केल्या. तर विराट कोहली याने पहिल्या दोन सामन्यांमध्ये शून्य आणि शेवटच्या सामन्यात 74 धावा केल्या होत्या. शेवटच्या सामन्यातील रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या विजयी शतकी भागीदारीने भारतीय क्रीडाप्रेमी सुनावले होते. या पार्श्वभूमीवर भारतीय संघ आणि खेळाडूंच्या कामगिरीबाबत बोलताना गौतम गंभीर याने म्हटले की, क्रिकेट हा वैयक्तिक कामगिरीपेक्षा अधिक सांघिक कामगिरीचा खेळ आहे, असे मी मानतो. खेळाडूंच्या वैयक्तिक कामगिरीबाबत मी नक्कीच आनंदी होतो आणि कायम होत राहीन. पण सरतेशेवटी आपण ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका गमावली, हे सत्य आहे. मी एक प्रशिक्षक म्हणून संघाचा पराभव झाल्यानंतरही सेलिब्रेशन करु शकत नाही. एक खेळाडू म्हणून मी खेळाडूंच्या वैयक्तिक कामगिरीची प्रशंसा करु शकतो. पण एक प्रशिक्षक म्हणून ही माझी नैतिक जबाबदारी आहे की, आपण एक देश आणि एक व्यक्ती म्हणून कधीही संघाच्या पराभवानंतर कधीही सेलिब्रेशन करता कामा नये. कारण, आपण आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करत असतो, असे मत गौतम गंभीर याने मांडले.
यापूर्वी रोहित शर्मा हा भारतीय संघाचा एकदिवसीय फॉर्मेटमधील कर्णधार होता. मात्र, ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी एकदिवसीय संघाचे कर्णधारपद त्याच्याकडून काढून घेत ते शुभमन गिलकडे देण्यात आले होते. 2027 साली दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेच्यादृष्टीने गौतम गंभीर याने तरुण खेळाडूंचा संघ बांधायला घेतला आहे. यामध्ये रोहित शर्मा आणि विराट कोहली कितपत फिट बसणार, याबाबत साशंकता आहे. येत्या विश्वचषक स्पर्धेपर्यंत आम्ही आम्हाला अपेक्षित असलेल्या स्तरापर्यंत पोहोचू, ही अपेक्षा आहे. ही माझी पहिल्या दिवसापासूनची विचारसरणी आहे, असे गौतम गंभीर याने म्हटले.
आणखी वाचा
विराट कोहली अन् रोहित शर्माला बीसीसीआयचा थेट इशारा; टीम इंडियाकडून खेळायचे असेल तर...




















