(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sreesanth Retirement: तो पुन्हा परतणारचं नाही, एस. श्रीशांतचा मोठा निर्णय
Sreesanth Retirement: भारताचा एक उत्कृष्ट वेगवान गोलंदाज श्रीशांतने नुकतंच ट्वीट करत सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे.
Sreesanth Retirement: भारतीय क्रिकेटपटू एस. श्रीशांत (S. Sreesanth) याने नुकतीच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती (Sreesanth Retirement) घेतली आहे. त्याने ट्वीट करत याबद्दल माहिती दिली. श्रीशांत यंदाच्या आयपीएलमध्ये पुनरागमन करेल असे वाटत होते. पण कोणत्याच संघाने त्याला विकत घेण्यात रस दाखवला नाही. ज्यानंतर अखेर श्रीशांतने आज निवृत्ती घेतली आहे. भविष्यात खेळणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंसाठी मी निवृत्ती घेत असल्याचं श्रीशांतने ट्वीटमध्ये म्हटलं आहे.
काय म्हणाला श्रीशांत?
श्रीशांतनं निवृत्तीचा निर्णय ट्वीटरवरुन जाहीर केला आहे. यावेळी त्याने लिहिलं आहे की, 'आजचा दिवस फार अवघड आहे. पण हा दिवस कृतज्ञता दाखवणारा आहे. मी विविध संघासाठी विविध स्तरावर खेळलो. त्या सर्वांचे धन्यवाद. बीसीसीआय, केरळा क्रिकेट, एरनाकुलम स्टेट, वॉर्कशायर काऊंटी क्रिकेट संघ, इंडियन एअरलाईन्स अशा विविध संघाची नावं त्याने यावेळी नमूद केली. यावेळी आयसीसीने माझ्या 25 वर्षांच्या कारकिर्दीत दिलेल्या विविध सन्मानासाठी त्यांचं धन्यवाद. भारताचं प्रतिनिधित्त्व करायला मिळालं हे माझं भाग्य आहे. भविष्यातील भारतीय क्रिकेटपटूंसाठी मी हा निवृत्तीचा निर्णय घेतला आहे.
संधी मिळाली पण कोणीच विकत घेतलं नाही
एस श्रीशांत आयपीएल 2013 दरम्यान स्पॉट फिक्सिंगमध्ये दोषी आढळला होता. त्यानंतर त्याच्यावर आजीवन बंदी घालण्यात आली होती. त्यानंतर केरळ उच्च न्यायालयानं त्याच्यावरची बंदी उठवली आणि 7 वर्षांच्या बंदीनंतर श्रीसंत 2020 मध्ये देशांतर्गत क्रिकेटमध्ये परतला. श्रीशांतनं आयपीएलसाठी नोंदणी देखील केली होती, परंतु बीसीसीआयनं त्याला ऑक्शनसाठी निवडलं नव्हतं. यंदा मात्र बीसीसीआयनं (BCCI) आयपीएलच्या मेगा ऑक्शनसाठी 590 खेळडूंची यादी जाहीर केली. या यादीत श्रीशांतचा (S. Sreesanth) समावेश होता. पण कोणत्याच संघाने त्याला विकत घेतलं नसल्याने अखेर तो निवृत्त झाला आहे.
श्रीशांतची कारकिर्द
श्रीशांतच्या कारकिर्दीचा विचार करता त्याने 27 कसोटी सामन्यात 87 विकेट्स, 53 एकदिवसीय सामन्यात 75 विकेट्स आणि 10 टी20 सामन्यात 7 विकेट्स घेतल्या आहेत. याशिवाय आयपीएलमध्येही त्याने काही सामने गाजवले असून 44 आयपीएलच्या सामन्यात त्याने 40 विकेट्स घेतल्या आहेत. तसंच कसोटी क्रिकेटमध्ये श्रीशांतने 281 धावा केल्या असून एकदिवसीय सामन्यात 44, टी20 सामन्यात 20 आणि आयपीएलमध्ये 34 धावा केल्या आहेत.
हे ही वाचा -
- ICC Test Rankings : रवींद्र जाडेजा कसोटीमधील अव्वल अष्टपैलू
- New Cricket Law : चेंडूवर लाळ लावण्यास कायमची बंदी, मांकडिंग वादावर पडदा; MCC ने अनेक नियम बदलले
- IND vs SL, 2nd Test: बंगळुरू कसोटीसाठी अक्षर पटेलची संघात ऐन्ट्री, 'हा' खेळाडू संघाबाहेर
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha