(Source: ECI/ABP News/ABP Majha)
New Cricket Law : चेंडूवर लाळ लावण्यास कायमची बंदी, मांकडिंग वादावर पडदा; MCC ने अनेक नियम बदलले
New Cricket Law : एमसीसीने नियमांमध्ये दुरुस्तीसाठी सूचना केल्या आहेत. यामध्ये चेंडूवर लाळ लावण्यापासून वाईड बॉलच्या नियमांचा समावेश आहे. सोबतच मांकडिंग वादालाही पूर्णविराम मिळाला आहे.
मुंबई : 1 ऑक्टोबरपासून क्रिकेटचे काही नियम बदलण्याची शक्यता आहे. मेरिलबोन क्रिकेट क्लबने नियमांमध्ये दुरुस्तीसाठी सूचना केल्या आहेत. यामध्ये चेंडूवर लाळ लावण्यापासून मांकडिंगपर्यंतच्या नियमांचा समावेश आहे. त्यामुळे आता चेंडूला लाळ लावण्यावर कायमची बंदी घातली जाणार आहे. सोबतच झेलच्या नियमातही बदल सूचवण्यात आले आहेत.
हे नियम आहे तसे लागू करायचे की त्यात थोडे बदल करुन लागू करायचे याबाबत ICC आणि जगभरातील क्रिकेट बोर्ड ठरवतील. सामान्यत: मेरिलबोन क्रिकेट क्लबचे नियम जसेच्या तसे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये लागू केले जातात. त्यामुळे क्रिकेटच्या नियमांमध्ये 1 ऑक्टोबरपासून बदल होतील हे जवळपास निश्चित आहे.
कोणकोणत्या नियमांमध्ये दुरुस्तीच्या सूचना?
1. कोरोनाव्हायरसमुळे चेंडूला लाळ लावण्यास मज्जाव करण्यात आला होता. आता हा नियम कायम करण्यात आला आहे. चेंडू चमकवण्यासाठी लाळेचा वापर करण्यावर बंदी घालण्यात आली असून केवळ घामाचाच वापर करता येईल.
2. एखादा खेळाडू झेल बाद झाल्यानंतर मैदानात येणारा नवा खेळाडूच स्ट्राईक घेणार. याआधी नियम होता की जर फलंदाज झेलच्या दरम्यान एंड बदलत असेल तर जुना फलंदाजही बॅटिंग करु शकत होता.
3. मांकडिंगला अधिकृतरित्या धावचित समजलं जाईल. गोलंदाजाने चेंडू फेकण्याआधी नॉन स्ट्रायकिंग एन्डचा फलंदाज क्रीजमधून बाहेर गेल्यास गोलंदाज थांबून तिथल्या स्टम्पच्या बेल्स उडवतो त्याला मांकडिंग म्हटलं जातं. याआधी याला अनफेअर प्लेचा दर्जा होता.
4. मैदानात कोणत्याही व्यक्ती, प्राणी किंवा अन्य वस्तूला कोणत्याही टीमकडून नुकसान झालं तर तो डेड बॉल ठरवला जाईल. पहिल्यांदा असं झाल्यास खेळ सुरुच राहायचा किंवा काही वेळासाठी थांबवण्यात येत होता.
5. ज्या खेळाडूला बदली केलं आहे, त्याच्या जागी येणाऱ्या खेळाडूला तेच नियम लागू असतील. खेळाडूवर बंदी घालणे आणि विकेट घेणे यासारख्या परिस्थितीत देखील नियम लागू होईल.
6. वाईड बॉलबाबतही आता बदल झाले आहे. एखादा खेळाडू इनोव्हेटिव शॉट खेळण्यासाठी आपल्या स्टान्समध्ये बदल करतो आणि त्यामुळे गोलंदाज चेंडू आजूबाजूला फेकतो. अशा परिस्थितीत फलंदाजाच्या पोझिशननुसारच वाईड बॉल ठरवला जाईल, स्टम्पच्या अंतरावरुन नाही.
7. जर चेंडू पिचपासून दूर पडला आणि फलंदाजाने तो शॉट खेळला तर त्याचा किंवा त्याच्या बॅटचा काही भाग पिचवर असणं गरजेचं आहे. जर असं झालं नाही तर तो बॉल डेड घोषित करण्याचा अधिकार पंचांकडे असेल. याशिवाय एखादा चेंडू फलंदाजाला पिचमधून बाहेर येण्यास भाग पाडत असेल तर तो नो बॉल असेल.
8. क्षेत्ररक्षक जर नियमांच्या बाहेर जावून हालचाल करत असेल तर फलंदाजी करणाऱ्या संघाला 5 पेनल्टी धावा मिळतील. याआधी हा डेड बॉल घोषित केला जात होता.