Sourav Ganguly Health Update | सौरव गांगुली यांची प्रकृती स्थिर, उद्या डिस्चार्ज मिळण्याची शक्यता
Sourav Ganguly Health Update : सौरव गांगुली यांची प्रकृती स्थिर असून त्यांना उद्या (बुधवारी) रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येऊ शकतो. हृदयविकाराचा सौम्य झटका आल्यानंतर सौरव गांगुली यांना शनिवारी (2 जानेवारी) वूडलॅण्ड्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
Sourav Ganguly Health Update : बीसीसीआयचे अध्यक्ष आणि भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. त्यांना उद्या म्हणजेच, बुधवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येऊ शकतो. हृदयविकाराचा सौम्य झटका आल्यानंतर सौरव गांगुली यांना शनिवारी (2 जानेवारी) वूडलॅण्ड्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. वुडलॅड्स रुग्णालयाचे एमडी आणि सीईओ रुपाली बसु यांनी सांगितलं की, नऊ सदस्यीय मेडिकल बोर्डाने सोमवारी गांगुली यांच्या प्रकृतीबाबत सविस्तर चर्चा केली. त्यानंतर गांगुली यांची प्रकृती स्थिर असल्यामुळे त्यांची अँजिओप्लास्टी करणं काही दिवसांसाठी पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे.
48 वर्षीय सौरव गांगुली यांची तब्येत 2 जानेवारीला सकाळी अचानक बिघडली. आपल्या घरातील जिममध्ये व्यायाम करताना त्यांच्या छातीत दुखू लागलं. यानंतर कुटुंबीयांनी त्यांना तातडीने वूडलॅण्ड्स रुग्णालयात दाखल केलं. तिथे त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली. "गांगुली यांच्या हृदयात काही गंभीर ब्लॉक होते, त्यांना स्टेंट लावला आहे," असं वूडलॅण्ड्स रुग्णालयाच्या सीईओ डॉ. रुपाली बासू आणि डॉ. सरोज मंडल यांनी सांगितलं.
Saurav Ganguly Hospitalised | 'दादां'च्या तब्येतीत सुधारणा
गांगुली यांच्या प्रकृतीवर नजर ठेवणार डॉक्टर
वरिष्ठ डॉक्टरांच्या बैठकीत गांगुली यांचे कुटुंबियही उपस्थित होते. त्यावेळी डॉक्टरांनी त्यांना गांगुली यांची सध्याची परिस्थिती आणि त्यांच्यावर करण्यात येणारे पुढील उपचार यांबाबत सांगितलं. त्यावेळी अँजिओप्लास्टी लगेच न करता काही दिवसांनी करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे सौरव गांगुली यांना उद्या डिस्चार्ज दिला जाऊ शकतो. तसेच डॉक्टर बासू यांनी सांगितलं की, सौरव गांगुली यांना देखरेखीखाली ठेवलं असून सातत्याने तपासणी केली जात आहे. हृदयविकाराचा सौम्य झटका आल्यानंतर सौरव गांगुली यांच्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या तीन धमण्यांमध्ये ब्लॉक असल्याचं समोर आलं. त्यानंतर स्टेंट लावला होता.
'दादा कम बॅक'चे पोस्टर घेऊन चाहते रुग्णालयाबाहेर जमा
सौरव गांगुलीचे चाहते हातात पोस्टर घेऊन रुग्णालयाबाहेर जमा झाले आहेत. 'दादा कम बॅक' असा मेसेज त्यांनी पोस्टरवर लिहिला आहे. सौरव गांगुली यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊन लवकरात लवकर घरी परतावे, अशी प्रार्थना ते करत आहेत.