Sourav Ganguly Health Update | सौरव गांगुली यांची प्रकृती स्थिर, आज इकोकार्डिओग्राफी; डॉक्टरांची माहिती
सौरव गांगुली यांची प्रकृती स्थिर असून त्यांच्यावर आज इकोकार्डिओग्राफी केली जाईल, अशी माहिती त्यांच्यावर उपचार करत असलेल्या डॉक्टरांनी मेडिकल बुलेटिनद्वारे दिली.
कोलकाता : भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार आणि बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती त्यांच्यावर उपचार करत असलेल्या डॉक्टरांनी दिली. हृदयविकाराचा सौम्य झटका आल्यानंतर सौरव गांगुली यांना शनिवारी (2 जानेवारी) वूडलॅण्ड्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. गांगुली यांच्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या तीन धमण्यांमध्ये ब्लॉक असल्याचं शनिवारीच समोर आलं होतं. त्यानंतर स्टेंट लावला होता. रुग्णालयाने जारी केलेल्या माहितीनुसार, गांगुली यांची कोरोनरी अँजिओग्राफी दुपारी तीन वाजता करण्यात आली. आज त्यांची इकोकार्डिओग्राफी केली जाईल.
48 वर्षीय सौरव गांगुली यांची तब्येत 2 जानेवारीला सकाळी अचानक बिघडली. आपल्या घरातील जिममध्ये व्यायाम करताना त्यांच्या छातीत दुखू लागलं. यानंतर कुटुंबीयांनी त्यांना तातडीने वूडलॅण्ड्स रुग्णालयात दाखल केलं. तिथे त्यांची अँजिओप्लास्टी करण्यात आली. "गांगुली यांच्या हृदयात काही गंभीर ब्लॉक होते, त्यांना स्टेंट लावला आहे," असं वूडलॅण्ड्स रुग्णालयाच्या सीईओ डॉ. रुपाली बासू आणि डॉ. सरोज मंडल यांनी सांगितलं.
Saurav Ganguly Hospitalised | 'दादां'च्या तब्येतीत सुधारणा
शरीरात ऑक्सिजनची पातळी 98 टक्के गांगुली यांचा रक्तदाब 110/80 असून त्यांच्या शरीरात ऑक्सिजनची पातळी 98 टक्के आहे. डॉक्टर म्हणाले की, गांगुली यांची परिस्थिती पाहता त्यांची आणखी एक अँजिओप्लास्टी केल्यानंतर निर्णय घेतला जाईल. रुग्णालयाच्या प्रवक्त्यांनी एका उत्तरात सांगितलं की, "मेडिकल बोर्डाने अद्याप बायपास सर्जरीच्या पर्यायाचा विचार केलेला नाही. पुढील उपचारांच्या बाबतीत आमची तज्ज्ञ समिती आज निर्णय घेईल."
'दादा कम बॅक'चे पोस्टर घेऊन चाहते रुग्णालयाबाहेर जमा मेडिकल बुलेटिननुसार, नऊ सदस्यीय मेडिकल बोर्डाची आज बैठक होणार असून गांगुली यांच्या कुटुंबीयांसोबत पुढील उपचारांच्या योजनेवर चर्चा केली जाईल. गांगुली यांनी रात्री दहा वाजता जेवणही केलं. सौरव गांगुली यांना देखरेखीखाली ठेवलं असून सातत्याने तपासणी केली जात असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.
दुसरीकडे सौरव गांगुलीचे चाहते हातात पोस्टर घेऊन रुग्णालयाबाहेर जमा झाले आहेत. 'दादा कम बॅक' असा मेसेज त्यांनी पोस्टरवर लिहिला आहे. सौरव गांगुली यांच्या प्रकृतीत सुधारणा होऊन लवकरात लवकर घरी परतावे, अशी प्रार्थना ते करत आहेत.