तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये किती जणांनी शतक झळकावलं? कोण कोणत्या भारतीय खेळाडूंचा समावेश
IND vs NZ, Shubman Gill : युवा फलंदाज शुभमन गिल यानं तिसऱ्या अन् अखेरच्या टी 20 क्रिकेटमध्ये शतक झळकावले.
IND vs NZ, Shubman Gill : युवा फलंदाज शुभमन गिल यानं तिसऱ्या अन् अखेरच्या टी 20 क्रिकेटमध्ये शतक झळकावले. शुभमन गिलच्या शतकी खेळीच्या बळावर भारताने न्यूझीलंडचा पराभव केला. शुभमन गिल याने 126 धावांची शतकी खेळी केली. या शतकी खेळीसह शुभमन गिल तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये शतक झळकावणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पोहोचलाय. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 22 खेळाडूंनी तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये शतक झळकावलेय. सर्वात आधी वेस्ट विंडिजच्या ख्रिस गेल यानं हा पराक्रम केला होता.
भारतीय खेळाडू कोणते?
युनिवर्स बॉस ख्रिस गेल यानं सर्वात आधी तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये शतक झळकावण्याचा पराक्रम केला होता. त्यानंतर न्यूझीलंडचा ब्रँडन मॅक्युलम याने तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये शतक झळकावले. सुरेश रैना तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये शतक झळकावणारा पहिला फलंदाज ठरला होता. आतापर्यंत भारताकडून सुरेश रैना, रोहित शर्मा, केएल राहुल, विराट कोहली आणि शुभमन गिल यांनी तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये शतक झळकावलेय. आंतरराष्ट्रीय कसोटी, वनडे आणि टी 20 मध्ये शतक झळकवणारे 22 खेळाडू आहेत. जाणून घेऊयात त्यांच्याबद्दल...
तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये शतक झळकावणारे 22 खेळाडू -
1 ख्रिस गेल (वेस्ट इंडिज )
2 ब्रँडन मॅक्कुलम (न्यूझीलंड)
3 महेला जयवर्धने (श्रीलंका)
4 सुरेश रैना (भारत)
5 तिलकरत्ने दिलशान (श्रीलंका)
6 मार्टिन गप्टिल (न्यूझीलंड)
7 अहमद शहजाद (पाकिस्तान)
8 फाफ डु प्लेसिस (दक्षिण आफ्रिका)
9 रोहित शर्मा (भारत)
10 शेन वॉटसन (ऑस्ट्रेलिया)
11 तमीम इकबाल (बांग्लादेश)
12 केएल राहुल (भारत)
13 ग्लेन मॅक्लवेल (ऑस्ट्रेलिया)
14 केविन ओब्रायन (आयर्लंड)
15 डेविड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया)
16 हीटर नाइट (इंग्लंड)
17 मोहम्मद रिजवान (पाकिस्तान)
18 बाबर आजम (पाकिस्तान)
19 जॉस बटलर (इंग्लंड)
20 डेविड मलान (इंग्लंड)
21 विराट कोहली (भारत)
22 शुभमन गिल (भारत)
भारताकडून T20 मध्ये सर्वात मोठी धावसंख्या गिलच्या नावावर -
भारताकडून शुभमन गिल टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक 126 धावा करणारा पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. या बाबतीत त्यानं विराट कोहली आणि रोहित शर्मासह सर्व दिग्गज भारतीयांना मागे टाकलंय. आंतरराष्ट्रीय टी-20मध्ये आतापर्यंत केवळ 7 फलंदाजांना शतक झळकावता आलं होतं. गिल, कोहली, रोहित यांच्याशिवाय सुरेश रैना, सूर्यकुमार यादव, केएल राहुल आणि दीपक हुडा या खेळाडूंचा यादीत समावेश आहे.
गिलची कामगिरी -
शुभमन गिल याने आतापर्यंत 13 कसोटी, 21 वनडे आणि 6 टी20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. कसोटीमध्ये त्यानं 32 च्या सरासरीने 736 धावा चोपल्या आहेत. वनडेमध्ये 73.76 च्या सरासरीने 1254 धावा केल्या आहेत. टी 20 मध्ये 40.40 च्या सरासरीने 202 धावा काढल्या आहेत.