पाकिस्तानमध्ये आला तर..., शाहिद आफ्रिदीचं विराट कोहलीला आमंत्रण, टी20 निवृत्तीवरही मोठं भाष्य
Shahid Afridi on Virat Kohli : पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीने विराट कोहलीबद्दल मोठं वक्तव्य केलेय. त्याशिवाय विराट कोहलीने पाकिस्तानमध्ये खेळावं, असेही आफ्रिदी म्हणाला.
Shahid Afridi on Virat Kohli : अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये नुकत्याच झालेल्या टी20 विश्वचषकावर टीम इंडियाने नाव कोरले. विश्वविजेतेपद मिळाल्यानंतर विराट कोहलीने टी20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. आता विराट कोहलीची नजर पुढील वर्षी होणाऱ्या चॅम्पियन ट्रॉफीवर (Champions Trophy 2025) असेल. पाकिस्तानकडे यजमानपद असणारी चॅम्पियन ट्रॉफी वनडे फॉर्मेटमध्ये होत आहे, त्यामध्ये विराट कोहली खेळताना दिसणार आहे. चॅम्पियन ट्रॉफी पाकिस्तानमध्ये होणार आहे, पण भारतीय संघाला अद्याप पाकिस्तानमध्ये जाण्यास सरकारकडून अधिकृत परवानगी मिळाली नाही. भारत सरकारने पाकिस्तानमध्ये जाण्यास क्रिकेट संघाला परवानगी दिली नाही. बीसीसीआयने पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार दिला असून हायब्रिड मॉडलचा पर्याय सुचवला. यावरच पाकिस्तानचा माजी क्रिकेटर शाहिद आफ्रिदीने भाष्य केलेय. विराट कोहली एकदा पाकिस्तानमध्ये आला तर तर भारताचा आदरातिथ्य विसरेल, असे शाहिद आफ्रिदी म्हणाला.
प्रसारमाध्यमाला दिलेल्या एका मुलाखतीत शाहीद आफ्रिदीने अनेक विषयावर भाष्य केले. विराट कोहलीने पाकिस्तानमध्ये खेळण्याबाबतही त्यानं भाष्य केलेय. तो म्हणाला की, "विराट कोहलीला भारतात जे प्रेम मिळाले आहे, जर तो पाकिस्तानमध्ये आला तर तो भारताचा आदरातिथ्य विसरेल. पाकिस्तानच्या लोकांमध्ये विराट कोहलीची खूप क्रेझ आहे. पाकिस्तानमध्ये विराट कोहलीला खूप पसंत केले जाते. इतकेच नाही तर विराट कोहली माझा आवडता खेळाडू आहे."
टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घ्यायला नको होती -
विराट कोहलीचा वेगळा क्लास आहे, त्यानं टी20 क्रिकेटमधून निवृत्ती घ्यायला नको होती, असे शाहिद आफ्रिदी म्हणाला. विराट कोहली अजूनही छोट्या फॉर्मेटमध्ये खेळणं सुरु ठेवू शकतो. कारण, त्याच्याकडे फॉर्म आहे. तो तंदुरुस्त आहे, दररोज ट्रेनिंग करतो. विराट कोहलीनं टी20 क्रिकेटमध्ये अजूनही खेळू शकतो. विराट कोहली युवा खेळाडूंमध्ये आपला अनुभव वाटू शकतो. सर्व युवा खेळाडूंना एकत्र टॉप लेव्हलची तयारी करणं कठीण जातं, असे शाहिद आफ्रिदीने सांगितले. आफ्रिदीच्या मते, विराट कोहली युवा खेळाडूंना खूप काही शिकवू शकतो.
Shahid Afridi said, "if Virat Kohli comes to Pakistan, he'll forget the hospitality of India. Virat has lots of fans in Pakistan, we're eager to see Virat play in Pakistan". (News24 Sports). pic.twitter.com/InokFdKmRY
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) July 11, 2024
खेळाला राजकारणापासून दूर ठेवा -
2023 आशिया चषकात भारतीय संघ क्रिकेट खेळण्यासाठी पाकिस्तानात गेला नाही. आता चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 मध्येही अशीच परिस्थिती आहे, या विषयावर शाहिद आफ्रिदीनेही आपले मौन सोडले. शाहिद आफ्रिदी म्हणाला की, क्रिकेट स्पर्धा, खेळाडू या गोष्टींना राजकारणापासून दूर ठेवायला हवं. दोन देशांनी आपापसात क्रिकेट खेळणे आणि एकमेकांच्या देशात जाऊन खेळणे यापेक्षा चांगले काहीही नाही.