IPL 2023 : आगामी आयपीएलपूर्वीच दिल्ली कॅपिटल्सची डोकेदुखी वाढली, पंतनंतर आता सरफराजच्या दुखापतीने वाढवली चिंता
Delhi Capitals: आयपीएल 2023 स्पर्धेला 31 मार्चपासून सुरुवात होणार आहे. त्यापूर्वी फलंदाज सरफराज खानला दुखापत झाल्यामुळे संघ व्यवस्थापन चिंतेत आहे.
Sarfaraz Khan Injury : जगप्रसिद्ध क्रिकेट लीग इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2023 च्या सीझनचा पहिला सामना 31 मार्च रोजी होणार आहे. दरम्यान आजवर एकदाही खिताब मिळवता न आलेल्या दिल्ली कॅपिटल्स संघाच्या अडचणी यंदाही वाढत आहेत. हंगाम सुरु होण्यापूर्वीच कर्णधार ऋषभ पंतचा अपघात होऊन तो स्पर्धेबाहेर पडल्यानंतर आता दमदार फलंदाज सरफराज खानची दुखापतीनेही संघाची चिंता वाढवली आहे. दिल्ली कॅपिटल्स संघाच्या सामन्याचा विचार करता दिल्ली आपला पहिला सामना 1 एप्रिल रोजी खेळणार आहे. लखनौ सुपर जायंट्स या संघाविरुद्ध दिल्ली कॅपिटल्स आपला पहिला सामना खेळणार असून हा सामना लखनौ येथे रंगणार आहे.
डिसेंबर 2022 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंतच्या गाडीचा भीषण अपघात झाल्यानंतर तो आता वर्षभर तरी मैदानापासून दूर राहणार आहे. अशात संघाने आगामी आयपीएल हंगामासाठी ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज डेव्हिड वॉर्नरला त्यांच्या संघाचा कर्णधार म्हणून नियुक्त केलं आहे, तर अक्षर पटेलकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्याच वेळी, संघ सरफराज खानकडे यष्टिरक्षक फलंदाज म्हणून पाहत होता, जो पंतच्या जागी बॅटने स्फोटक फलंदाजाची भूमिका निभावू शकतो. पण त्यात आता सरफराजला दुखापत झाल्याने त्याच्या खेळण्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
सरफराजची दुखापत किती गंभीर?
सरफराज खानच्या दुखापतीबद्दल रिपोर्ट्समधून समोर आलेल्या माहितीनुसार, त्याला पूर्णपणे बरे होण्यासाठी 15 ते 20 दिवस लागतील. अशा परिस्थितीत दिल्ली कॅपिटल्स संघासाठी ही दिलासादायक बातमी असू शकते. तसंच, फ्रँचायझीने कोलकाता येथील ईडन गार्डन्स मैदानावर आपल्या काही महत्त्वाच्या खेळाडूंसह सराव शिबीर देखील ठेवले आहे, जिथे सरफराज खान देखील त्याचा एक भाग आहे. पण अद्याप त्याने कोणत्याही प्रकारचा फलंदाजी किंवा क्षेत्ररक्षणाचा सराव सुरु केलेला नाही.
जबरदस्त फॉर्मात सरफराज खान
सरफराजची देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरी वाखाणण्याजोगी असल्याचं आतापर्यंतच्या आकडेवारीवरुन दिसून येतं. याशिवाय रणजी ट्रॉफी 2023 च्या मोसमातही सरफराज खानच्या बॅटमधून अक्षरश: धावांचा पाऊस पडला होता. यंदाच्या हंगामात मुंबईच्या या युवा खेळाडूने तब्बल 556 धावा केल्या. रणजी ट्रॉफी 2023 हंगामात सरफराज खानची सरासरी 90 पेक्षा जास्त होती. त्याच वेळी, सरफराज खानने 2019-20 हंगामापासून 26 सामने खेळले आहेत. या 26 सामन्यांमध्ये सरफराज खानने 12 शतकं आणि 7 अर्धशतकं केली आहेत. त्याचबरोबर त्याने 26 सामन्यांत 2970 धावा केल्या.
हे देखील वाचा-