Sachin Tendulkar : वनडे क्रिकेट का कंटाळवाणं होतंय? सचिन तेंडुलकरनं सांगितलं कारण; आवड निर्माण करण्यासाठी दिल्या 'या' सूचना
ODI Cricket : एकदिवसीय क्रिकेटच्या सध्याच्या फॉरमॅटमध्ये काही गोष्टींचा अभाव आहे, म्हणूनच ते कंटाळवाणे होत आहे, असं सचिन तेंडुलकरने म्हटलं आहे.
Sachin Tendulkar on ODI Cricket : सध्या एकदिवसीय क्रिकेट कंटाळवाणे होऊ लागले आहे, हे मास्टर ब्लास्टर आणि भारतरत्न सचिन तेंडुलकरने (Sachin Tendulkar) मान्य केले आहे. यासाठी सचिन तेंडुलकर टी-20 क्रिकेटला जबाबदार मानत नाही, तर याला एकदिवसीय फॉरमॅटमध्ये स्वीकारले जाणारे नवीन नियम कारणीभूत असल्याचं त्याने म्हटलं आहे. सचिन तेंडुलकरच्या मते, दोन्ही वेळी नवीन चेंडू वापरणे आणि चेंडूवर थुंकता न येणे यासारख्या गोष्टींमुळे एकदिवसीय क्रिकेटमध्ये रस कमी होत आहे.
'एकदिवसीय क्रिकेटमध्ये आता रस कमी झाला आहे यात काही शंका नाही. सध्या प्रत्येक संघाच्या डावात नवीन चेंडूंचा नियम आहे. जेव्हा तुमच्याकडे 50 षटकांमध्ये दोन नवीन चेंडू असतात, अशा वेळी तुम्हाला रिव्हर्स स्विंगची कला पाहायला मिळत नाही. डावातील 40 वं षटक चालू असताना, प्रत्येक चेंडूसाठी हे फक्त 20 वे षटक असते आणि चेंडू फक्त 30 षटकांच्या सुमारास रिव्हर्स स्विंग होतो. त्यामुळे मला वाटते की दोन नवीन चेंडूंमुळे रिव्हर्स स्विंग ही महत्त्वाची गोष्ट एकदिवसीय क्रिकेटमधून गायब होत आहे आणि गोलंदाजांच्या दृष्टिकोनातून ही बाब चुकीची आहे, असं सचिन तेंडुलकरने इंडिया टुडे च्या कार्यक्रमात म्हटलं आहे.
बॉलवर थुंकण्यावरील बंदी मागे घेण्याची गरज
सचिन तेंडुलकर म्हणाला, 'मी वैद्यकीय तज्ज्ञ नाही पण मला वाटतं की चेंडूवर थुंकण्याची परवानगी दिली पाहिजे. हे 100 वर्षांहून अधिक काळापासून सुरू आहे. खेळाडू बॉलवर थुंकल्यामुळे कोणतीही मोठी हानी झालेली नाही. कोरोनामुळे गेल्या दोन-तीन वर्षांपासून त्यावर बंदी घालणे हा योग्य निर्णय होता, पण आता कोविड संसर्ग कमी झाल्याने त्यावरून आता बंदी हटवली पाहिजे, असं सचिनने सांगितलं आहे.
दिला 'हा' सल्ला
यादरम्यान सचिन तेंडुलकरने कसोटीप्रमाणे एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोन डाव खेळण्याचा सल्ला दिला आहे. म्हणजेच, 25-25 षटकांचे चार डाव असले पाहिजेत, पण प्रत्येक संघाकडे दोन्ही डावांसह फक्त 10 विकेट्स असाव्यात. 25 षटकांच्या डावानंतर दुसऱ्या संघाला 25 षटके खेळण्याची संधी मिळते. सचिनने सांगितले की, या फॉरमॅटद्वारे दोन्ही संघांना खेळपट्टी, नाणेफेक यासारख्या घटकांकडून समान मदत मिळेल आणि आवडही वाढेल.