IND vs AUS : कसोटीत कोणता कर्णधार सरस, रोहित शर्मा की पॅट कमिन्स?
Rohit Sharma vs Pat Cummins : बॉर्डर गावसकर मालिकेत दोन्ही संघाचे कर्णधार नवीन असतील.
Rohit Sharma vs Pat Cummins as Test Captains : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चार सामन्याच्या कसोटी मालिकेला 9 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. यंदा होणाऱ्या बॉर्डर गावसकर मालिकेत दोन्ही संघाचे कर्णधार नवीन असतील. रोहित शर्मा (Rohit Sharma) टीम इंडियाचं नेतृत्व करत आहे तर पॅट कमिन्स (Pat Cummins) ऑस्ट्रेलिया संघाची धुरा सांभाळत आहे. दोन्ही खेळाडू कर्णधार म्हणून पहिल्यांदाच आमनेसामने असतील. ऑस्ट्रेलियाविरोधात कसोटीत रोहित शर्मा पहिल्यांदात नेतृत्व करणार आहे. तर टीम इंडियाविरोधात कर्णधार म्हणून पॅट कमिन्स पहिल्यांदाच मैदानात उतरणार आहे. दोन्ही कर्णधारात सरस कोण? याबाबत क्रीडा चाहत्यांमध्ये चर्चा सुरु आहे. कसोटी सामन्यातील दोघांच्या आकडेवारी पाहूयात...
रोहित शर्मापेक्षा कमिन्स सरस?
कर्णधार म्हणून रोहित शर्मा आतापर्यंत फक्त दोन सामन्यात खेळला आहे. ऑस्ट्रेलियाविरोधात रोहित शर्मा आपला तिसरा सामना खेळणार आहे. तर दुसरीकडे पॅट कमिन्स याने ऑस्ट्रेलियासाठी 13 सामन्यात नेतृत्व केलेय. अशात रोहित शर्माच्या तुलने नेतृत्व करण्याचा पॅट कमिन्सकडे अनुभव जास्त असल्याचं दिसतेय. पण मैदानात कोण सरस ठरणार? हे येणाऱ्या काही दिवसांत स्पष्ट होईल.
कर्णधार म्हणून रोहित शर्माची कामगिरी -
रोहित शर्मानं दोन कसोटीत भारताचं नेतृत्व केलेय. या दोन्ही सामन्यात भारताचा विजय झालाय. म्हणजेच रोहितच्या नेतृत्वात भारताच्या विजयाची सरासरी 100 टक्के आहे.
रोहित शर्माने 2022 मध्ये श्रीलंकाविरोधात मायदेशात झालेल्या दोन कसोटी सामन्यात टीम इंडियाचं नेतृत्व केले होते. पहिला सामना भारताने एक डाव 222 धावांनी जिंकला होता. तर दुसऱ्या सामन्यात 238 धावांनी विजय नोंदवला होता. कर्णधार असताना रोहित शर्मानं दोन कसोटीत 30 च्या सरासरीने 90 धावा काढल्या आहेत.
पॅट कमिन्सची कर्णधार म्हणून कामगिरी -
ऑस्ट्रेलियासाठी पॅट कमिन्सने आतापर्यंत 13 सामन्यात नेतृत्व केलेय. यामध्ये आठ सामन्यात विजय तर एका सामन्यात ऑस्ट्रेलियाचा पराभव झालाय. उर्वरित चार सामना अनिर्णित राहिलेत. या 13 सामन्यात कमिन्सने 20.12 च्या सरासरीने 50 विकेट घेतल्या आहेत. इंग्लंड, श्रीलंका, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तानविरोधात पॅट कमिन्सने ऑस्ट्रेलिया संघाचं नेतृत्व केलेय.
ऑस्ट्रेलियाच्या भारत दौऱ्याचं वेळापत्रक (2023)
सामना | तारीख | ठिकाण |
पहिला कसोटी सामना | 9-13 फेब्रुवारी 2023 | नागपूर |
दुसरा कसोटी सामना | 17-21 फेब्रुवारी 2023 | दिल्ली |
तिसरा कसोटी सामना | 1-5 मार्च 2023 | धर्माशाला |
चौथा कसोटी सामना | 9-13 मार्च 2023 | अहमदाबाद |
पहिला एकदिवसीय सामना | 17 मार्च 2023 | मुंबई |
दुसरा एकदिवसीय सामना | 19 मार्च 2023 | विशाखापट्टम |
तिसरा एकदिवसीय सामना | 22 मार्च 2023 | चेन्नई |