T20 WC 2024 : कोण गेल, कोण धोनी ? रोहित शर्मापुढे सगळेच फेल, हिटमॅननं षटकारांचा केला मोठा विक्रम
T20 World Cup 2024 : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम रोहित शर्माने याआधीच आपल्या नावावर केला. आता रोहित शर्माने षटकारांचा नवा अध्याय रचलाय.
T20 World Cup 2024 : आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकण्याचा विक्रम रोहित शर्माने याआधीच आपल्या नावावर केला. आता रोहित शर्माने षटकारांचा नवा अध्याय रचलाय. रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 600 षटकार ठोकण्याचा पराक्रम केला आहे. असा विक्रम करणारा रोहित शर्मा पहिलाच खेळाडू ठरला आहे. रोहित शर्माचा 600 षटकारांचा विक्रम मोडणं, सध्या तरी एकाही खेळाडूला शक्य नसल्याचं दिसत आहे. रोहित शर्माच्या आसपास एकही खेळाडू नाही. दुसऱ्या क्रमांकावर असणारा ख्रिस गेल यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. आयर्लंडविरोधात रोहित शर्माने खणखणीत तीन षटकार ठोकत विक्रमला गवसणी घातली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 600 षटकारांचा टप्पा पूर्ण केलाय. त्यामुळे पुढील अनेक वर्षे रोहित शर्माचा हा विक्रम अबाधित राहणार आहे.
रोहित शर्माने 2007 मध्ये टीम इंडियासाठी पदार्पण केले होते. आतापर्यंत रोहित शर्माने 450 पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. रोहित शर्माने 152 टी20 सामन्यात 193 षटकार ठोकले आहेत. 262 वनडे सामन्यात 323 षटकार ठोकले आहेत. कसोटीमध्ये 84 षटकार ठोकले आहेत. टी20 क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या यादीत रोहित शर्मा पहिल्या क्रमांकावर आहे. तर वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्या फलंदाजात तिसऱ्या क्रमांकावर आहे. ख्रिस गेल यानं 331 आणि शाहिद आफ्रिदीने 351 षटकार ठोकलेत. तिन्ही फॉर्मेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकणाऱ्यांमध्ये रोहित शर्मा पहिल्या क्रमांकावर आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोखणारे फलंदाज
खेळाडू | सामना | षटकार |
रोहित शर्मा | 472 | 600 |
ख्रिस गेल | 483 | 553 |
शाहिद आफ्रिदी | 524 | 476 |
ब्रँडन मॅक्युलम | 432 | 398 |
मार्टिन गुप्टिल | 367 | 383 |
विश्वचषकात भारताची विजयी सुरुवात -
रोहित शर्माच्या भारतीय संघानं ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात दणदणीत विजयी सलामी दिली. न्यूयॉर्कमधल्या सामन्यात भारतानं आयर्लंडचा आठ विकेट्स आणि ४६ चेंडू राखून धुव्वा उडवला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी आयर्लंडचा डाव दहा षटकांत ९६ धावांत गुंडाळला. त्यानंतर भारतानं विजयासाठीचं ९७ धावांचं आव्हान केवळ दोन विकेट्स गमावून गाठलं. रोहित शर्मानं सलामीला ५२ धावांची खेळी करून भारतीय डावाचा पाया रचला. त्यानं ३७ चेंडूंमधली खेळी चार चौकार आणि तीन षटकारांनी सजवली. ऋषभ पंतनं २६ चेंडूंत तीन चौकार आणि एका षटकारासह नाबाद ३६ धावांची खेळी उभारली. त्याआधी, भारताकडून हार्दिक पंड्यानं सर्वधिक तीन फलंदाजांना माघारी धाडलं. भारताकडून अर्शदीपसिंग आणि जसप्रीत बुमरानं प्रत्येकी दोन, तर मोहम्मद सिराज आणि अक्षर पटेलनं प्रत्येकी एक विकेट घेतली.