विकेटकीपिंग सोडली अन् थेट गोलंदाजीसाठी आला; ऋषभ पंतने पहिला चेंडू टाकताच खेळ खल्लास, video
Rishabh Pant Bowling In Delhi Premier League T20: ऋषभ पंत या सामन्यात गोलंदाजीसाठी आला, तेव्हा उपस्थित असणाऱ्या चाहत्यांना खूप आर्श्चर्य वाटलं.
Rishabh Pant Bowling In Delhi Premier League T20: दिल्ली प्रीमियर लीगचा पहिला सामना शनिवारी (17 ऑगस्ट) जुनी दिल्ली 6 आणि दक्षिण दिल्ली सुपरस्टार्स यांच्यात खेळला गेला. या सामन्यात दोन्ही संघांकडून स्फोटक फलंदाजी पाहायला मिळाली. याशिवाय जुनी दिल्ली 6 चा कर्णधार ऋषभ पंतने केलेल्या गोलंदाजीची चर्चा रंगली आहे. ऋषभ पंतने यष्टीरक्षक सोडत थेट गोलंदाजी टाकण्याचा निर्णय घेतला.
पहिल्या चेंडूवरच खेळ खल्लास-
ऋषभ पंत (Rishabh Pant) या सामन्यात गोलंदाजीसाठी आला, तेव्हा उपस्थित असणाऱ्या चाहत्यांना खूप आश्चर्य वाटलं. ऋषभ पंत सामन्यातील शेवटचे षटक टाकण्यासाठी आला होता. मात्र ऋषभ पंतच्या एका षटकाने सामन्याच्या निकालावर काहीही फरक पडला नाही. ऋषभ पंत जेव्हा गोलंदाजीसाठी आला तेव्हा दक्षिण दिल्ली सुपरस्टार्सला विजयासाठी 6 चेंडूत फक्त 1 धाव हवी होती. ऋषभ पंतच्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर एक धाव काढत दक्षिण दिल्ली सुपरस्टार्सने विजय मिळाला.
ऋषभ पंतवर गौतम गंभीरचा प्रभाव?
ऋषभ पंतची गोलंदाजी पाहून त्याच्यावर टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरचा प्रभाव पडल्याचं बोललं जात आहे. श्रीलंकेविरुद्ध नुकत्याच झालेल्या टी-20 मालिकेतील तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यात रिंकू सिंग आणि सूर्यकुमार यादव सामन्याचे शेवटचे षटक टाकताना दिसले. त्याप्रमाणे आता ऋषभ पंतनेही गोलंदाजी सुरु केल्याच्या प्रतिक्रिया चाहते व्यक्त करत आहेत.
ऋषभ पंतचा गोलंदाजीचा व्हिडीओ-
Rishabh pant bowling 😸🔥pic.twitter.com/QvM7tFZLcu
— 𝓱 ¹⁷ 🇮🇳 (@twitfrenzy_) August 17, 2024
ऋषभ पंतला अपयश-
सामन्यात ऋषभ पंतच्या नेतृत्वाखाली जुनी दिल्ली 6 प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरला. संघासाठी कर्णधार ऋषभ पंत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आला. ऋषभ पंत फारसा प्रभाव टाकू शकला नाही. 109.37 च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करताना त्याने 32 चेंडूत 35 धावा केल्या, ज्यात 4 चौकार आणि 1 षटकारांचा समावेश होता. ऋषभ पंतची ही खराब कामगिरी पाहून चाहत्यांनी सोशल मीडियावर त्याच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे.
सामना कसा राहिला?
दिल्ली प्रीमियर लीग टी-20 च्या पहिल्या सामन्यात दक्षिण दिल्ली सुपरस्टार्सने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना जुनी दिल्ली 6 ने 20 षटकात 197/3 धावा केल्या. अर्पित राणाने 41 चेंडूत 8 चौकार आणि 2 षटकारांच्या मदतीने 59 धावा करत संघासाठी सर्वात मोठी खेळी खेळली. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना साउथ दिल्ली सुपरस्टार्स संघाने १९.१ षटकांत १९८/७ धावा करून विजय मिळवला. संघाचा कर्णधार आयुष बदोनी आणि सलामीवीर प्रियांश आर्यने 57-57 धावांची सर्वात मोठी खेळी खेळली. प्रियांश आर्यने 30 चेंडूत 190 च्या स्ट्राईक रेटने 57 धावा केल्या. तर कर्णधार आयुष बदोनीने 29 चेंडूत 196.55 च्या स्ट्राईक रेटने 57 धावा केल्या. याशिवाय आयुष बदोनीनेही एक विकेट घेतली.