IND vs BAN: भारत अन् बांगलादेशच्या कसोटी सामन्यावर पावसाचं संकट; टीम इंडियाचा खेळ बिघडणार?
IND vs BAN Test Weather Forecast And Update: भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी खराब प्रकाशामुळे खेळ लवकर थांबवण्याचा निर्णय घेतला होता.
IND vs BAN Test Weather Forecast And Update: चेन्नईमधील चेपॉकवर खेळल्या जात असलेल्या पहिल्या कसोटीच्या तिसऱ्याच दिवशी शनिवारी भारतीय संघ विजयाच्या जवळ पोहचला आहे. बांगलादेश संघाला आता विजयासाठी 357 धावांची गरज आहे. सध्या बांगलादेशची धावसंख्या 158/4 अशी आहे. तर भारताला विजयासाठी सहा बळींची गरज आहे. मात्र याचदरम्यान एक महत्वाची अपडेट समोर आली आहे.
भारत आणि बांगलादेश (Ind vs Ban) यांच्यातील कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी खराब प्रकाशामुळे खेळ लवकर थांबवण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आज म्हणजेच कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी सकाळी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच पावसामुळे चौथ्या दिवसाचा खेळ सुरु होण्यास विलंब देखील लागण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
सामन्याचा तिसरा दिवस सुरू होण्यापूर्वी रात्री पाऊस सुरू होता, जो पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू होता. मात्र, त्यानंतरही खेळ सुरू होण्यास कोणत्याही प्रकारचा विलंब झाला नाही. परंतु खराब हवामानामुळे चौथ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यास उशीर होऊ शकतो. चौथ्या दिवशी आकाश ढगाळ राहण्याचा अंदाज आहे, जो टीम इंडियाच्या गोलंदाजांसाठी फायदेशीर ठरू शकतो.
आतापर्यंत सामना कसा राहिला?
आतापर्यंत भारतीय संघ स्पर्धेत पुढे असल्याचे दिसून येत आहे. लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या बांगलादेशने तीन दिवस पूर्ण होईपर्यंत 4 विकेट्स गमावत 158 धावा केल्या. टीम इंडियाने बांगलादेशसमोर 515 धावांचे लक्ष्य ठेवले आहे. आता बांगलादेश संघाला विजयासाठी 2 दिवसात 357 धावांची गरज आहे. बांगलादेशकडे 2 दिवस शिल्लक आहेत, परंतु त्यांनी आतापर्यंत 4 विकेट्स गमावल्या आहेत. त्यामुळे भारताचा विजय जवळपास निश्चित मानला जात आहे.
ऋषभ पंत अन् शुभमन गिलने धू धू धुतले-
बांगलादेशविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या डावात 124 चेंडूत ऋषभ पंतने आपले शतक पूर्ण केले. तर 128 चेंडूत 109 धावा करत ऋषभ पंत (Rishabh Pant) बाद झाला. ऋषभ पंतने शतक झळकवल्यानंतर त्याच्यासह संपूर्ण मैदान भावूक झाल्याचं दिसून आले. मैदानात उपस्थित असणाऱ्या प्रेक्षकांपासून रोहित शर्मा, विराट कोहली आणि ड्रेसिंग रुममधील सर्व खेळाडूंनी उभे राहत ऋषभ पंतचे कौतुक केले. ऋषभ पंतने या खेळीत 13 चौकार आणि 4 षटकार टोलावले. ऋषभ पंत शतक झळकवून बाद झाल्यानंतर शुभमन गिलने देखील शतक केले. शुभमन गिल सध्या 162 चेंडूत 101 धावा केल्यानंतर खेळत आहे. शुभमन गिलने या खेळीत 9 चौकार आणि 3 षटकार लगावले.
संबंधित बातमी:
मैदानातील चाहत्यांपासून रोहित, कोहली, संपूर्ण ड्रेसिंग रुमपर्यंत...; ऋषभ पंतच्या शतकानंतर सर्व भावूक