Gautam Gambhir: राहुल द्रविडचा नव्या प्रशिक्षकाला खास मेसेज, गौतम गंभीर झाला भावूक, बीसीसीआयकडून व्हिडीओ शेअर
Rahul Dravid message to Gautam Gambhir: बीसीसीआयनं एक व्हिडीओ शेअर केला आहे. राहुल द्रविडनं गौतम गंभीरला खास शुभेच्छा दिल्या आहेत.
पल्लेकेले : रोहित शर्माच्या नेतृत्त्वात आणि राहुल द्रविडच्या मार्गदर्शनात भारतानं वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत पार पडलेल्या टी 20 वर्ल्ड कपमध्ये विजेतेपद मिळवलं होतं. भारतानं टी 20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर रोहित शर्मा,विराट कोहली आणि रवींद्र जडेजानं निवृत्ती घेतली. राहुल द्रविडनं (Rahul Dravid) देखील मुख्य प्रशिक्षकपदावरुन टी 20 वर्ल्ड कपनंतर पायऊतार होण्याचा निर्णय घेतला.आता भारत आणि श्रीलंका यांच्यात आजपासून टी 20 मालिका सुरु होत आहे. या टी 20 मालिकेपासून मुख्य प्रशिक्षक म्हणून गौतम गंभीरचा (Gautam Gambhir) कार्यकाळ सुरु होत आहे. यानिमित्तानं गौतम गंभीरला राहुल द्रविडनं खास मेसेज देत प्रशिक्षकपदाचा कार्यभार सोपवला आहे.
भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी 20 मालिकेला आजपासून सुरुवात होत आहे. या मालिकेपूर्वी राहुल द्रविडनं गौतम गंभीरला खास मेसेज करत कोचिंगची जबाबदारी सोपवली आहे. बीसीसीआयनं जो व्हिडीओ शेअर केला आहे त्यात गौतम गंभीर एका लॅपटॉपसमोर बसलेला आहे. त्यामध्ये तो एक बटन दाबतो आणि राहुल द्रविडच्या मेसेज सुरु होत असल्याचं पाहायला मिळतं.
राहुल द्रविडनं त्याच्या मेसेजची सुरुवात करताना हॅलो गौतम, तुझं आमच्या जगातील सर्वात रोमांचक कामात स्वागत आहे, असं म्हटलं. भारतीय क्रिकेट टीमच्या कोचचा कार्यकाळ पूर्ण करुन तीन आठवले संपले आहेत, असं राहुल द्रविड म्हणतो. द्रविडनं यामध्ये बारबाडोसमधील अंतिम फेरीनंतरचा विजयाचा जल्लोष आणि मुंबईतील विजयी परेड अविस्मरणीय असल्याचं म्हटलं.
राहुल द्रविडनं गौतम गंभीरला शुभेच्छा देत भारतीय टीमला मोठ्या उंचीवर नेशील, असं म्हटलं. तुझ्यासोबत खेळाडू म्हणून खेळताना मैदानावर तुला सर्वश्रेष्ठ योगदान देताना पाहिलं आहे. तुला फलंदाज आणि क्षेत्ररक्षक म्हणून दृढनिश्चय आणि पराभव न स्वीकारण्याची सवय पाहिलं आहे, असं राहुल द्रविड म्हणाला.
आयपीएलमध्ये तुला जिंकण्याची इच्छा, युवा खेळाडूंना सहकार्य आणि मैदानावर आपल्या टीमनं सर्वश्रेष्ठ करण्यासाठी तुझी धडपड पाहिली आहे, असं राहुल द्रविड म्हणाला. भारतीय क्रिकेटसाठी तू किती समर्पित आणि भावनिक आहे हे मला माहिती असून नव्या जबाबदारीत देखील आणशील, असं राहुल द्रविड गौतम गंभीरला म्हटलं.
तुला माहिती आहे की अपेक्षा अधिक असणार आहेत, परीक्षा आणखी कठोर असणार आहे. तुला संघात पूर्णपणे फिट असलेले खेळाडू मिळतील त्यासाठी शुभेच्छा असं राहुल द्रविड म्हणाला.
राहुल द्रविडच्या मेसेजनंतर गौतम गंभीर भावनिक झाल्याचं पाहायला मिळालं. तो म्हणाला की राहुल द्रविडकडून अनेक गोष्टी शकलो आहे. फक्त माझ्याच नाही तर नव्या पिढीला देखील त्या शिकायला मिळाल्या आहेत. भारतीय क्रिकेट महत्त्वाचं आहे, कोणताही व्यक्ती महत्त्वाची नाही. मी जास्त भावनिक होत नाही मात्र, या मेसेजमुळं भावनिक झालोय. ही जबाबदारी प्रामाणिकपणे, पारदर्शकतेसह पार पाडेन, असं गौतम गंभीर म्हणाला.
𝗣𝗮𝘀𝘀𝗶𝗻𝗴 𝗼𝗻 𝘁𝗵𝗲 𝗯𝗮𝘁𝗼𝗻 𝘄𝗶𝘁𝗵 𝗰𝗹𝗮𝘀𝘀 & 𝗴𝗿𝗮𝗰𝗲! 📝
— BCCI (@BCCI) July 27, 2024
To,
Gautam Gambhir ✉
From,
Rahul Dravid 🔊#TeamIndia | #SLvIND | @GautamGambhir pic.twitter.com/k33X5GKHm0
संबंधित बातम्या :
टीम इंडिया श्रीलंका मोहिमेसाठी सज्ज, गंभीरच्या उपस्थितीत दमदार प्रॅक्टिस, बीसीसीआयकडून व्हिडीओ पोस्ट