(Source: ECI/ABP News/ABP Majha)
R Ashwin Test Records: भारताचा सर्वोत्कृष्ट गोलंदाज अनिल कुंबळेचा 'हा' रेकॉर्ड तोडण्यासाठी अश्विन सज्ज, 22 विकेट्सची गरज
R Ashwin : भारतीय भूमीत सर्वाधिक विकेट्स घेण्याचा रेकॉर्ड आजही माजी दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे याच्याच नावावर असून आर अश्विन या रेकॉर्डच्या दिशेने वेगात पोहचताना दिसत आहे.
Ashwin Record : भारतीय फिरकी गोलंदाज आर अश्विन (R Ashwin) लवकरच आपल्या नावावर आणखी एक मोठा विक्रम करू शकतो. तो भारतीय मैदानावर सर्वाधिक कसोटी बळी घेणारा गोलंदाज बनू शकतो. सध्या हा विक्रम भारताचा माजी फिरकीपटू अनिल कुंबळेच्या (Anil Kumble) नावावर आहे. आर अश्विनने बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2023 (BGT 2023) अंतर्गत इंदूरमध्ये खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी तीन विकेट घेतल्या. या तीन विकेट्ससह, जिथे आर अश्विनने त्याच्या एकूण कसोटी बळींची संख्या 466 वर पोहोचवली, तसंच घरच्या मैदानावर खेळल्या गेलेल्या सामन्यांमध्ये त्याने घेतलेल्या विकेट्सची संख्या 329 वर गेली आहे. म्हणजेच आर अश्विनने आपल्या सर्वाधिक विकेट्स फक्त भारतीय मैदानावर घेतल्या आहेत. त्याचा भारतीय भूमीवरचा हा भक्कम विक्रम आता मोठी कामगिरी ठरणार आहे.
कारण भारतात अनिल कुंबळेने 63 कसोटी सामन्यांच्या 115 डावात 350 विकेट्स घेतल्या आहेत. भारतीय मैदानावर तो बऱ्याच काळापासून सर्वाधिक कसोटी बळी घेणारा गोलंदाज म्हणून विराजमान आहे. आता अश्विन हा विक्रम मोडण्यापासून फक्त 22 विकेट्स दूर आहे. पुढील 7 ते 8 सामन्यांमध्ये अश्विन हा मोठा विक्रम आपल्या नावावर करू शकतो.
कपिल देव यांना टाकलं मागे
अश्विननं घेतलेल्य तीन विकेट्समुळे त्याने अष्टपैलू खेळाडू कपिल देव यांना मागे टाकलं आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात इंदूरमध्ये खेळल्या जात असलेल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाच्या पहिल्या सत्रात अश्विनने तीन बळी घेतले. आधी पीटर हँड्सकॉम्बची विकेट घेत त्याने कपिल देव यांच्या 687 आंतरराष्ट्रीय विकेट्सच्या विक्रमाशी बरोबरी केली. त्यानंतर अश्विनने अॅलेक्स कॅरीला पॅव्हेलियनमध्ये पाठवताना कपिल देव यांचा रेकॉर्डही मोडला. त्यानंतर अश्विनने नॅथन लायनला बोल्ड करून त्याच्या आंतरराष्ट्रीय विकेटची संख्या 689 वर नेली. इंदूर कसोटीच्या दुसऱ्या दिवशी अश्विनच्या या अप्रतिम गोलंदाजीमुळे ऑस्ट्रेलिया चा संघ फारशी आघाडी घेऊ शकला नाही. ऑस्ट्रेलियन संघ 197 धावांवर सर्वबाद झाला. त्याआधी भारतीय संघाने पहिल्या डावात केवळ 109 धावा केल्या होत्या. पण भारताचा दुसरा डावही 163 धावांवर आटोपल्याने ऑस्ट्रेलियाला केवळ 76 धावांची गरज आहे. दरम्यान अश्विनच्या नावावर आता कसोटी क्रिकेटमध्ये 466, एकदिवसीय क्रिकेटमध्ये 151 आणि आंतरराष्ट्रीय टी-20मध्ये 72 विकेट्स आहेत. तसेच तो कसोटी क्रिकेटमध्ये भारतासाठी दुसरा सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे.
हे देखील वाचा-