(Source: ECI/ABP News/ABP Majha)
पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीच्या 'त्या' विक्रमावर 24 वर्षांनंतर प्रश्नचिन्ह
शाहिद आफ्रिदीने आत्मचरित्रात हे स्पष्ट केले होते की वेगवान शतक झळकावताना मी 16 वर्षांचा नाही तर 19 वर्षांचा होतो. वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या वयाची चुकीची माहिती दिल्याबद्दल त्याला आता सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.
Shahid Afridi century in 37 balls: पाकिस्तानचा क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदी त्याच्या वयामुळे नेहमीच चर्चेत राहिला. त्याचं वय नक्की किती हा अनेकांना पडलेला प्रश्न आहे. मात्र त्याच्या वयाच्या याच घोळामुळे त्याच्या एका विक्रमावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. 4 ऑक्टोबर 1996 रोजी पाकिस्तानच्या शाहिद आफ्रिदीने (त्यावेळचा सर्वात युवा फलंदाज) श्रीलंकेविरुद्ध क्रिकेट इतिहासातील सर्वात वेगवान शतक झळकावले होते. शाहिद आफ्रिदीने अवघ्या 37 चेंडूत शतक पूर्ण करून जगभरात प्रसिद्ध झाला होता. शाहिद आफ्रिदीने जेव्हा हा विश्वविक्रम केला तेव्हा त्याचे वय अवघे 16 वर्ष होते. आणि शतक ठोकणारा तो सर्वात तरुण खेळाडू ठरला. पण आता तब्बल 24 वर्षानंतर या रेकॉर्डवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आहे.
शाहिदच्या वय नक्की किती?
शाहिद आफ्रिदीच्या या रेकॉर्डवर त्याच्याच एका ट्वीटने प्रश्न उपस्थित झाले आहे. वाढदिवसाच्या दिवशी आपल्या चाहत्यांचे आभार मानत शाहिद आफ्रिदीने एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमध्ये शाहिदने म्हटलं की मी आज 44 वर्षांचा झालो आहे.
प्रश्न का उद्भवत आहेत?
विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या म्हणजेच आयसीसीच्या अधिकृत नोंदीनुसार आफ्रिदीचे सध्याचे वय 41 वर्षे आहे. विशेष म्हणजे आफ्रिदीने आत्मचरित्रात लिहिले आहे की त्यांचा जन्म 1975 मध्ये झालाय. त्यानुसार तो आज 46 वर्षांचा आहे. मात्र त्याने आपल्या आत्मचरित्रात हे स्पष्ट केले होते की वेगवान शतक झळकावताना मी 16 वर्षांचा नाही तर 19 वर्षांचा होतो. वेगवेगळ्या ठिकाणी आपल्या वयाची चुकीची माहिती दिल्याबद्दल त्याला आता सोशल मीडियावर ट्रोल केलं जात आहे.
... तर शाहिद शतक करणारा सर्वात तरुण खेळाडू नाही?
जर शाहिद आफ्रिदी आज 46 वर्षांचा असेल तर एकदिवसीय सामन्यांमध्ये शतक झळकावणारा तो सर्वात तरुण खेळाडू नाही. कारण अफगाणिस्तानच्या उस्मान गनीने 2014 मध्ये झिम्बाब्वेविरुद्ध 143 चेंडूत 118 धावा केल्या होत्या. त्यावेळी उस्मानचे वय 17 वर्षे 242 दिवस होते. अशा परिस्थितीत पहिलं शतक झळकावलं तेव्हा शाहिद 19 वर्षांचा होता. तर एकदिवसीय सामन्यात शतक ठोकणारा उस्मान गनी सर्वात तरुण खेळाडू असेल.