गोंधळात गोंधळ, तिकीट विक्री सुरु केली नंतर ठरलं प्रेक्षकांना नो एंट्री, पाकिस्तानात प्रेक्षकांना पैसे परत देण्याची वेळ
Pak vs Ban : पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेला 21 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतील दोन सामने रावळपिंडी आणि कराचीत होणार आहेत,
कराची : आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजनं पाकिस्तान करणार आहे. पाकिस्तान 1996 नंतर एखाद्या आयसीसी स्पर्धेचं संयोजन करणार आहे. आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी बांगलादेश आणि इंग्लंड पाकिस्तानचा दौरा करणार आहेत. बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यातील कसोटी मालिकेला 21 ऑगस्टपासून सुरुवात होत आहे. पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यातील दुसरी कसोटी कराचीमध्ये होणार आहे. कराचीतील मैदानावर होणाऱ्या कसोटी सामन्यात प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार नाही, असा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, निर्णयापूर्वीच तिकीट विक्री सुरु झाली होती. ज्यांनी तिकीटं खरेदी केली होती त्यांना पैसे परत दिले जाणार असल्याची माहिती आहे.
पाकिस्तानमध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन केलं जात असल्यानं मैदानांची देखील दुरुस्ती केली जात आहे. आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पार्श्वभूमीवर लाहोरच्या गद्दाफी स्टेडियमची देखील दुरुस्ती केली जात आहे. कराचीतील स्टेडियममध्ये बांधकाम आणि दुरुस्तीची कामं सुरु असल्यानं 30 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर दरम्यान आयोजित केल्या जाणाऱ्या कसोटी सामन्यात प्रेक्षकांना प्रवेश दिला जाणार नाही, असा निर्णय़ घेण्यात आला आहे.
पीसीबीनं काय म्हटलं?
पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी मैदानांच्या दुरूस्तीचं काम हाती घेतलं आहे. पाकिस्तान क्रिकेटमध्ये प्रेक्षकांची भूमिका महत्त्वाची असते. ते आमच्या खेळाडूंना चांगली कामगिरी करण्यासाठी प्रेरणा आणि प्रोत्साहन देतात. आमच्यासाठी प्रेक्षकांचं आरोग्य आणि सुरक्षा प्राथमिकता आहे. उपलब्ध असलेल्या सर्व पर्यायांचा विचार केल्यानंतर विना प्रेक्षक दुसरी कसोटी खेळवण्याचा निर्णय घेतल्याचं पीसीबीनं म्हटलंय.
तिकीट विक्री थांबवण्याचा निर्णय
पाकिस्तान क्रिकेट बोर्डानं कराचीत होणाऱ्या बांगलादेश विरूद्धच्या कसोटी सामन्यासाठी सुरु असलेली तिकीट विक्री थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. पीसीबीनं तात्काळ तिकीट विक्री थांबवली आहे. ज्या प्रेक्षकांनी पहिल्यांदा तिकीटं खरेदी केली असतील त्यांना तिकिटांची रक्कम परत दिली जाणार आहे. यामुळं प्रेक्षकांना होणाऱ्या त्रासासाठी खेद व्यक्त करतो, असं देखील पीसीबीकडून सांगण्यात आलंय.
चॅम्पियन्स ट्रॉफीच्या आयोजनाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानातील मैदानांच्या दुरूस्तीचं आणि नुतनीकरणाची कामं सुरु आहेत. प्रेक्षकांना चांगल्या सोयी सुविधा देण्याचा प्रयत्न आहे, असंही पीसीबीकडून म्हटलं गेलं आहे. 1996 नंतर पीसीबी आयसीसी स्पर्धेचं संयोजन करणार असल्यानं या चॅम्पियन्स ट्रॉफीचं आयोजन करण पाकिस्तान क्रिकेट बोर्डासमोर आव्हान असेल.
संबंधित बातम्या :
Vinesh Phogat : विनेश फोगाटला मोठा धक्का, CAS नं याचिका फेटाळली, रौप्य पदकाची आशा संपुष्टात