(Source: ECI/ABP News/ABP Majha)
विजेत्यावर कोट्यवधीची उधळण, पराभूत संघही होणार मालामाल, पाहा कोणत्या संघाला किती रक्कम मिळणार?
ODI World Cup 2023 Prize Money : विश्वचषकाच्या महायुद्धात रविवारी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अशी फायनल पाहायला मिळेल.
ODI World Cup 2023 Prize Money : विश्वचषकाच्या महायुद्धात रविवारी भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अशी फायनल पाहायला मिळेल. मागील 48 दिवसांपासून दहा संघ आणि कोट्यवधी चाहते याच क्षणाची वाट पाहत होते. विश्वचषकाच्या फायनलकडे गल्ली, दिल्ली ते जगातील सर्व क्रीडा चाहते वाट पाहत आहेत. विश्वचषक विजेत्यावर बक्षीसांचा वर्षाव होतोय. तब्बल 10 मिलिअन डॉलरची उधळण होणार आहे. भारतीय रुपयात ही रक्कम 82 कोटी 93 लाख 55 हजार रुपये इतकी होतेय. म्हणजेच, विश्वचषक स्पर्धेत कोट्यवधींची उधळण होणार आहे.
कुणाला किती मिळणार बक्षीस ?
विश्वचषक विजयासाठी दहा संघाने जिवाचे रान केले. पण आठ संघाना आपला गाशा गुंडाळावा लागला. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांनी फायनल गाठली. रविवारी, म्हणजेच 19 नोव्हेंबर रोजी विजेता मिळणार आहे. विजेत्या संघाला तब्बल 33 कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. तर उप विजेत्या संघाला 16 कोटी रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. तर सेमीफायनलमध्ये आव्हान संपणाऱ्या दोन्ही संघाला प्रत्येकी सहा-सहा कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. ग्रुप स्टेजमध्ये म्हणजेच, साखळी फेरती आव्हान संपलेल्या संघाला प्रत्येकी 82 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. म्हणजेच, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका यांना प्रत्येकी सहा सहा कोटी रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. या दोन्ही संघाचे उपांत्य फेरीत आव्हान संपुष्टात आले होते.
19 नोव्हेंबर रोजी अहमदाबाद येथे नरेंद्र मोदी स्टेडिअमवर विश्वचषकाची अंतिम लढत होणार आहे. विजेत्याला संघाला चार मिलिअन डॉलरचे बक्षीस दिले जाणार आहे. तर उपविजेता संघाला दोन मिलिअन डॉलरवर समाधान मानावे लागेल. विजेता संघ 33 कोटी तर उपविजेता संघ 16 कोटींचे बक्षीस घेईल. साखळी फेरीमध्ये प्रत्येक विजयाला 33 लाख (USD 40,000) रुपये दिले जाणार आहेत. त्याशिवाय साखळी फेरीत आव्हान संपणाऱ्या संघाला 82 लाख ( 100,000 USD) रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.
The total prize pool for #CWC23, including the cash prize for the winners, has been announced 💰
— ICC (@ICC) September 22, 2023
Details 👇
ऑस्ट्रेलियानं आजवरच्या इतिहासात... 1987, 1999, 2003, 2007 आणि 2015 मध्ये विश्वचषक जिंकण्याचा पराक्रम गाजवला होता. त्यापैकी 2003 साली पॉण्टिंगच्या ऑस्ट्रेलियानं सौरव गांगुलीच्या टीम इंडियाचा धुव्वा उडवून विश्वचषकाचा मान मिळवला होता. त्यानंतर वीस वर्षांनी पुन्हा एकदा विश्वचषकाच्या महायुद्धात भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या फौजा निर्णायक लढाईसाठी पुन्हा आमनेसामने येतायत. वीस वर्षांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं चित्र तब्बल 360 अंशांनी बदललंय. भारत ही आंतरराष्ट्रीय क्रिकेटची आर्थिक महासत्ता आधीपासूनच होतीच. पण सध्या भारत ही वन डे क्रिकेटचीही जणू महासत्ता भासतेय...