Ranji Trophy 2024 Final Match : अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात मुंबई 42 व्यांदा रणजी चषकावर नाव कोरणार ?
Mumbai, Ranji Trophy 2024 Final Match : अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) नेतृत्त्वाखाली मुंबई 42 व्यांदा प्रतिष्ठेच्या रणजी करंडकावर आपलं नाव कोरणार का?
Mumbai, Ranji Trophy 2024 Final Match : अजिंक्य रहाणेच्या (Ajinkya Rahane) नेतृत्त्वाखाली मुंबई 42 व्यांदा प्रतिष्ठेच्या रणजी करंडकावर आपलं नाव कोरणार का? हा प्रश्न विचारण्याचं कारण म्हणजे मुंबईनं तामिळनाडूचा एक डाव आणि 70 धावांनी धुव्वा उडवून, रणजी करंडकाच्या फायनलमध्ये (Ranji Trophy Final) धडक मारली. रणजी करंडकाच्या या फायनलमध्ये मुंबईचा मुकाबला मध्य प्रदेश आणि विदर्भ यांच्यामधल्या विजयी संघाशी होईल. हा सामना येत्या रविवारपासून मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर (Wankhede Stadium) खेळवण्यात येणार आहे.
भारतीय क्रिकेटची पंढरी म्हटली जाणारं मुंबईचं वानखेडे स्टेडियम (Mumbai Wankhede Stadium) रणजी करंडकाच्या फायनलसाठी सज्ज झालं आहे. रणजी करंडकाच्या आजवरच्या इतिहासात मुंबईनं अठ्ठेचाळीसाव्यांदा फायनलचं तिकीट मिळवलंय. आणि त्यातही मुंबईनं तब्बल एक्केचाळीसवेळा रणजी करंडक जिंकण्याचा पराक्रम गाजवलाय. पण त्याच मुंबईचं भारतीय क्रिकेटमधलं एका जमान्यातलं निर्विवाद वर्चस्व आता राहिलेलं नाही.
मुंबईला 2015-16 सालापासून म्हणजे गेल्या आठ वर्षांपासून रणजी करंडकावर आपलं नाव कोरता आलेलं नाही. आणि मुंबई क्रिकेटच्या लौकिकाला ही बाब नक्कीच अभिमानास्पद नाही. त्यामुळं मुंबईच्या तमाम क्रिकेटरसिकांची नजर सध्या अजिंक्य रहाणे आणि त्यांच्या फौजेच्या कामगिरीकडे लागून राहिलीय.मुंबईची ही फौज प्रतिस्पर्धी संघाला लोळवून 42 व्यांदा रणजी करंडकाचा मान मिळवणार का? हाच प्रश्न सध्या मुंबईकर क्रिकेटरसिकांच्या ओठांवर आहे.
अजिंक्य कामगिरी, मुंबईच्या यशाचं रहस्य काय ?
मुंबईच्या अजिंक्य रहाणेला एक फलंदाज म्हणून यंदाच्या रणजी मोसमात सूर गवसला नसला तरी कर्णधार या नात्यानं त्यानं आपली भूमिका चोख बजावली. त्यानं युवा आणि अनुभवी शिलेदारांची एक मोट बांधून मुंबईची फौज एका ताकदीनं उभी केली. त्यामुळंच मुंबई आज रणजी करंडकापासून केवळ एक पाऊल दूर आहे. मुंबईच्या यंदाच्या मोसमातल्या कामगिरीत पाच फलंदाजांचा मोठा वाटा आहे. त्यात भूपेन लालवानीनं नऊ सामन्यांमध्ये सर्वाधिक 533 धावांचा रतीब घातला आहे. तनुष कोटियननं नऊ सामन्यांमध्ये 481, शिवम दुबेनं पाच सामन्यांत 407, पृथ्वी शॉनं पाच सामन्यांमध्ये 394, तर मुशीर खाननं दोन सामन्यांमध्ये 291 धावांचा डोलारा उभारला.
गोलंदाजांनीही भूमिका चोख बजावली -
मुंबईच्या आक्रमणालाही यंदाच्या मोसमात कमालीची धार आल्याचं चित्र आहे. मध्यमगती मोहित अवस्थीनं अवघ्या आठ सामन्यांमध्ये 35 फलंदाजांना माघारी धाडण्याचा पराक्रम गाजवला. डावखुरा फिरकी गोलंदाज शम्स मुलानीनं आठ सामन्यांमध्ये 32, तर ऑफ स्पिनर तनुष कोटियननं नऊ सामन्यांमध्ये 22 विकेट्स घेतल्या आहेत. शार्दूल ठाकूरसारखा अनुभवी आंतरराष्ट्रीय क्रिकेटर संघात असणं म्हणजे अजिंक्य रहाणेच्या हातात हुकुमाचा एक्का आल्यासारखं आहे. त्यानंच शतकाला चार विकेट्सची जोड देऊन मुंबईच्या उपांत्य फेरीतल्या विजयात निर्णायक भूमिका बजावली.
आता रणजी करंडकाच्या अंतिम सामन्यात मुंबईला कर्णधार अजिंक्य रहाणे आणि श्रेयस अय्यर या अनुभवी आंतरराष्ट्रीय क्रिकेटवीरांकडून मोठी अपेक्षा राहिल. यंदाच्या मोसमात अजिंक्य रहाणेनं फलंदाज म्हणून निराशा केलीय, तर श्रेयस अय्यरनं उपांत्यपूर्व फेरीतून ऐनवेळी घेतलेली माघार त्याच्या लौकिकाला गालबोट लावणारी ठरली होती. त्या नैराश्यातून आता बाहेर पडायचं तर मुंबईला पुन्हा एकदा रणजी करंडक मिळवून देण्याची मुख्य जबाबदारी ही अजिंक्य रहाणे आणि श्रेयस अय्यरच्या फलंदाजीवर राहिल.
आणखी वाचा :
Ranji Trophy 2024 : 482 धावा, 22 विकेट... रणजी ट्रॉफीत धमाल; भारताला मिळाला 'नवा' अश्विन!