(Source: Poll of Polls)
MS Dhoni : महेंद्रसिंह धोनी आता स्वत:लाच देणार वाढदिवसाचं गिफ्ट, कॅप्टन कूलनं उचललं मोठं पाऊल, काय घडलं?
MS Dhoni Captain Cool: भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा वाढदिवस जवळ आला आहे. त्यापूर्वीच धोनीनं मोठा निर्णय घेतला आहे.

MS Dhoni Captain Cool Trademark: भारताचा माजी कॅप्टन महेंद्रसिंह धोनीचा वाढदिवस जवळ आला आहे. येत्या 7 जुलैला महेंद्रसिंह धोनी 44 वर्षांचा होईल. धोनीनं त्यापूर्वीच स्वत:ला वाढदिवसाचं गिफ्ट देण्याचा निर्णय घेतला आहे. खरंतर कॅप्टन कूल या उपाधीसाठी धोनीनं ट्रेडमार्कसाठी अर्ज केला आहे. महेंद्रसिंह धोनीला दबावाच्या काळात धैर्यानं निर्णय घेतल्यानं कॅप्टन कूल म्हटलं जातं. बातम्यांमधील माहितीनुसार महेंद्रसिंह धोनीनं 5 जूनलाच ट्रेडमार्कसाठी अर्ज केला होता, अशी माहिती आहे.
ट्रेडमार्क्स नोंदणी पोर्टलनुसार एमएस धोनीच्या अर्जाची सध्याची स्थिती स्वीकृत आणि प्रसिद्धीसाठी अशी आहे. या ट्रेडमार्कला क्रीडा प्रशिक्षण, खेळांच्या प्रशिक्षणाच्या सेवा पुरवणे या श्रेणीत नोंदणीकृत करण्यात आलं आहे. महेंद्रसिंह धोनीनं याबाबत कसलंही प्रसिद्धीपत्रक जारी केलेलं नाही. मिळालेल्या माहितीनुसार यापूर्वी कॅप्टन कूल या शब्दांच्या अधिकारासाठी प्रभा स्किल स्पोर्टस प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीनं अर्ज केला आहे. मात्र, त्या अर्जाची स्थिती सुधारणांसाठी असं दिसत आहे.
महेंद्रसिंह धोनीला अलीकडेच आयसीसी हॉल ऑफ फेमनं सन्मानित करण्यात आलं आहे. धोनीनं त्याला एक मोठं यश म्हटलं होतं. महेंद्रसिंह धोनी कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा कॅप्टन म्हणून चांगलं यश मिळवू शकला नाही. मात्र, महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्त्वात भारतानं टी 20 वनडे वर्ल्डकप, वनडे वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली.
महेंद्रसिंह धोनीनं ऑगस्ट 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. त्यानं 350 मॅचमध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये 10773 धावा केल्या. 90 कसोटी सामन्यात धोनीनं 4876 धावा केल्या आहेत. तर, 98 मॅचमध्ये टी 20 सामन्यात 1617 धावा केल्या.
महेंद्रसिंह धोनी टीम इंडियाचा यशस्वी कर्णधार
भारतानं कपिल देव याच्या नेतृत्त्वात 1983 च्या वर्ल्ड कपमध्ये विजेतेपद मिळवलं होतं. त्यानंतर 2007 मध्ये भारतानं टी 20 वर्ल्डकपचं विजेतेपद धोनीच्या नेतृत्त्वात मिळवलं होतं. त्यानंतर भारतानं एकदिवसीय क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये 2011 मध्ये विजेतेपद मिळवलं होतं. त्यावेळी धोनी कॅप्टन होता. तर, 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी भारतानं जिंकली होती. तीन आयसीसी ट्रॉफी जिंकणारा महेंद्रसिंह धोनी एकमेव कर्णधार आहे. दुसरीकडे आयपीएलमध्ये महेंद्रसिंह धोनीनं चेन्नई सुपर किंग्जला सहा वेळा विजेतेपद मिळवून दिलं आहे.















