50 Years of ODI Cricket | 50 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी पहिला वनडे क्रिकेट सामना खेळवला होता!
5 जानेवारी या दिवसाला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात विशेष स्थान आहे. कारण 50 वर्षांपूर्वी याच दिवशी पहिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना खेळवण्यात आला होता. जाणून घेऊया पहिल्या वनडेच्या पन्नाशीचा इतिहास, रंजक गोष्टी
मुंबई : क्रिकेटची खरी मजा कसोटी क्रिकेटमध्येच आहे, असं मानणारा एक गट आहे. पण एकदिवसीय क्रिकेटमध्ये अस्सल रोमांच शोधणाऱ्यांची संख्याही कमी आहे. 5 जानेवारी या दिवसाला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटच्या इतिहासात विशेष स्थान आहे. कारण 50 वर्षांपूर्वी याच दिवशी पहिला एकदिवसीय आंतरराष्ट्रीय सामना खेळवण्यात आला होता. 5 जानेवारी 1971 रोजी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघात पहिला वनडे सामना रंगला होता.
सध्या एकदिवसीय सामने 50-50 षटकांचे असले तरी पहिला एकदिवसीय सामना 40-40 षटकांचा होता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. तर 82 धावा करणाऱ्या इंग्लंडच्या जॉन एडरिचने वनडे क्रिकेटच्या इतिहासात पहिला सामनावीर बनण्याचा मान मिळवला. त्यांना 90 पौंडचं बक्षीस मिळालं होतं. तब्बल 46 हजार प्रेक्षक या ऐतिहासिक घटनेचे साक्षीदार बनले होते. सामन्यानंतर सर डॉन ब्रॅडमन यांनी मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडमध्ये उपस्थित प्रेक्षकांना संबोधित करताना म्हटलं की, "आज तुम्ही इतिहास घटताना पाहिलं.
वनडे क्रिकेटचा इतिहास पहिला एकदिवसीय सामना मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर 5 जानेवारी 1971 रोजी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात झाला होता. अॅशेस मालिकेतील तिसऱ्या कसोटी सामन्याचे पहिले तीन दिवस पावसामुळे वाया गेल्याने सामनाधिकाऱ्यांनी सामना संपवण्याचा निर्णय घेतला. यावेळी प्रती षटक आठ चेंडू यानुसार 40-40 षटकांचा एकदिवसीय सामना खेळवण्याचं निश्चित करण्यात आलं.
1970 मधील नोव्हेंबर महिन्यात इंग्लंडचा संघ अॅशेस मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता. त्या काळात एका अॅशेस मालिकेत सहा कसोटी सामने खेळवळण्यात येत असत. पहिला सामना ब्रिस्बेनमध्ये खेळवण्यात आला, जो अनिर्णित राहिला. दुसरा सामना पर्थमध्ये झाला आणि तोही अनिर्णित राहिला. आता वेळ होती मेलबर्नमध्ये खेळवल्या जाणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामान्याची. 29 डिसेंबर 1970 पासून हा सामना सुरु होणार होता. परंतु जोरदार पावसामुळे पहिल्या तीन दिवसांचा खेळ वाया गेला. यानंतर पंच आणि क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या अधिकाऱ्यांनी हा सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला. परंतु त्या काळात क्रिकेट सामन्यांचा विमा काढला जात नसे. आधीच पावसामुळे सामन्याचे पहिले तीन दिवस वाया गेल्यामुळे आयोजकांना जवळपास 80 हजार पौंडचं नुकसान झालं होतं. मेलबर्न कसोटीसाठी व्रिकी झालेल्या तिकीटांचे पैसे प्रेक्षकांना परत करावे लागले असते. त्यामुळे दोन्ही देशांच्या क्रिकेट बोर्डांनी मिळून निर्णय घेतला की, मालिकेच्या शेवटी सातवा कसोटी सामना खेळवला जाईल. परंतु इंग्लंडच्या खेळाडूंनी या अतिरिक्त कसोटी सामन्यासाठी अतिरिक्त पैशांची मागणी केली होती. कारण तो काळ प्रायोजक, कॉन्ट्रॅक्ट आण क्रिकेटमध्ये पैशांचा पाऊस असा नव्हता. त्यावेळी क्रिकेटपटूंना सामन्यासाठी दिवसाच्या हिशेबाने पैसे मिळत होते.
यानतंर दोन्ही देशांच्या अधिकाऱ्यांनी ठरवलं की, "मेलबर्नच्या स्थानिक लोकांच्या मनोरंजन आणि दोन्ही संघांतील खेळाडूंचा आर्थिक फायदा लक्षात ठेवून संघांमध्ये 40-40 षटकांचा एक वनडे सामना आयोजित करावा."
परंतु या सामन्यासाठी प्रायोजक शोधणं हे कठीण काम होतं. अखेर तंबाखूचं उत्पादन करणारी रॉथमॅन्स कंपनी हा सामना स्पॉन्सर करण्यासाठी तयार झाली ते ही केवळ 5 हजार पौंडमध्ये. त्यामधील 90 पौंड सामनावीराचा पुरस्कार जिंकणाऱ्यासाठी ठेवले होते. कंपनीने या सामन्यासाठी 20 हजार तिकीटांची विक्री करण्याचं लक्ष्य ठेवलं होतं, जेणेकरुन खर्च वसूल होईल.
सामन्यात काय झालं? इंग्लंड-11 आणि ऑस्ट्रेलिया-11 नावाचे दोन संघ मैदानात उतरले होते. ऑस्ट्रेलिया-11 चे कर्णधार बिल लॉरी यांनी नाणेफेक जिंकून इंग्लंड-11 चे कर्णधार रे इलिंगवर्थ यांना प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. इंग्लंड-11 संघाचा डाव 39.4 षटाकात 190 धावा करुन आटोपला. मधल्या फळीतील फलंदाज जॉन एन्डरिचने सर्वाधिक 82 धावा केल्या. ऑस्ट्रेलिया-11 समोर विजयासाठी 40 षटकात 191 धावा करण्याचं लक्ष्य होतं. इयान चॅपल यांच्या 60 धावांच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलिया-11 ने हे लक्ष्य 5 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पार केलं.
पहिल्याच एकदिवसीय सामन्यात पैशांचा पाऊस हा सामना पाहण्यासाठी स्पॉन्सर कंपनी राथमॅन्सला 20 हजार प्रेक्षक उपस्थित राहतील असा अंदाज होता. पण 46 हजारांपेक्षा जास्त प्रेक्षक हा सामना पाहायला आले. यामुळे कंपनीचा फक्त पैसा न पैसा वसूल झाला नाही तर मोठा फायदाही झाला. सामन्याचं यश पाहता आयसीसीने याला आंतरराष्ट्रीय सामन्याची मंजुरी दिली. इथूनच औपचारिकरित्या एकदिवसीय क्रिकेट सामन्याची सुरुवात झाली.