IPL 2024 : 22 मार्चपासून आयपीएल सुरु होण्याची शक्यता, 'या' दिवशी होणार अंतिम सामना; BCCI चं फूल प्लॅनिंग
IPL 2024 : यंदाचा आयपीएल हंगाम 22 मार्चपासून सुरु होण्याची शक्यता आहे. बीसीसीआयकडून (BCCI) याची पूर्ण तयारी झाल्याचं बोललं जात आहे.
Indian Premier League 2024 : सध्या क्रिकेट चाहत्यांचं लक्ष इंडियन प्रीमियर लीगच्या (IPL 2024) आगामी हंगामाकडे लागलं आहे. आयपीएल 2024 सुरु होण्याची सर्वजण आतुरतने वाट पाहत आहेत. अद्याप आयपीएल 2024 च्या तारखा जाहीर झालेल्या नाहीत. मात्र, आता आयपीएलबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. आयपीएल 2024 (IPL 2024) 22 मार्चपासून सुरु होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बीसीसीआयकडून आयपीएलसंदर्भात सर्व नियोजन पूर्ण झाल्याचं सांगितलं जात आहे.
आयपीएलची तारीख ठरली?
मीडिया रिपोर्टनुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (Board of Control for Cricket in India) म्हणजेच बीसीसीआयने (BCCI) आयपीएल 2024 चं संपूर्ण प्लॅनिंग पूर्ण केलं आहे. 22 मार्चपासून आयपीएल 2024 सुरु होण्याचा अंदाज आहे, तर त्याआधी वूमन्स आयपीएल (WPL 2024) सुरु होतील. 22 फेब्रुवारीपासून वूमन्स आयपीएल (Women's Premier Leaugue) सुरु होण्याची शक्यता आहे.
'या' दिवसापासून आयपीएल सुरु होण्याची शक्यता
क्रिकबझच्या रिपोर्टनुसार, यंदाचा आयपीएलचा 17 वा हंगाम 22 मार्चपासून खेळवण्यात येण्याची शक्यता आहे. तर आयपीएल 2024 चा अंतिम सामना 26 मे रोजी खेळवण्यात येईल, असंही सांगितलं जात आहे. आगामी लोकसभा निवडणुकीनंतर आयपीएल 2024 सुरु होणार असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच महत्त्वाचं म्हणजे आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयपीएल कुठे खेळवण्यात येणार याबाबत संभ्रम कायम आहे. मात्र यंदाची आयपीएल स्पर्धा भारतामध्ये खेळवण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे.
22 फेब्रुवारीपासून सुरु होणार WPL
महिला प्रीमियर लीगचा दुसरा हंगाम 22 फेब्रुवारीपासून सुरू होऊ शकतो. मीडिया रिपोर्टनुसार, WPL 2024 चा अंतिम सामना 17 मार्च रोजी खेळवला जाईल. गेल्या मोसमात हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्सने चमकदार कामगिरी करत विजेतेपदाच्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा 7 गडी राखून पराभव करून पहिलं विजेतेपद पटकावलं होतं.
चेन्नई सुपर किंग्ज पाचव्यांदा चॅम्पियन
आयपीएल 2023 मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने (CSK) पाचव्यांदा विजेतेपद पटकावलं. चेन्नईने चमकदार कामगिरी करत अंतिम फेरीत गुजरात टायटन्सचा पराभव केला. रवींद्र जडेजाने सामन्याच्या शेवटच्या षटकात एक षटकार आणि एक चौकार मारून संघाला विजय मिळवून दिला.
यंदा आयपीएल भारताबाहेर?
आयपीएलचे आयोजन भारतात होणार की परदेशात होणार, याबाबत संभ्रम कायम आहे. याआधी 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी आयपीएल हंगाम भारतात खेळवण्यात आला होता. बीसीसीआयचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी सांगितलं की, 'आयपीएल 2024 चा हंगाम भारतात खेळवला जाईल की परदेशात, सध्या या संदर्भात कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. आम्ही सरकारशी चर्चा करू, त्यानंतर यावर अंतिम निर्णय घेतला जाईल.'