Rinku Singh Priya Saroj : क्रिकेटपटू रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा, रिंकूनं अंगठी घालताच प्रिया सरोज यांना आनंदाश्रू
Rinku Singh Priya Saroj : टीम इंडियाचा क्रिकेटपटू रिंकू सिंह आणि समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा दिग्गजांच्या उपस्थित पार पडला.

लखनौ : टीम इंडियाचा स्टार क्रिकेटपटू खेळाडू रिंकू सिंह (Riku Singh) आणि समाजवादी पक्षाच्या खासदार प्रिया सरोज (Priya Saroj) यांचा साखरपुडा पार पडला आहे. या सोहळ्याला दिग्गजांनी हजेरी लावली. समाजवादी पक्षाचे खासदार अखिलेश यादव, डिंपल यादव, शिवपाल यादव, राजीव शुक्ला, जया बच्चन, क्रिकेटपटू प्रवीण कुमार, पियूष चावला यांच्यासह इतर उपस्थित होते.
रिंकू सिंह आणि प्रिया सरोज यांनी साखरपुड्यापूर्वी कुटुंबासह बुलंदशहरच्या चौधेरा येथील विचित्र देवी मंदिरात आशीर्वाद घेतला. त्यांनतर फुलकर्न हॉलमध्ये साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडला.
लग्नसोहळा कधी?
रिंकू सिंह आणि प्रिया सरोज या दोघांना शुभेच्छा आणि आशीर्वाद देण्यासाठी दिग्गजांनी हजेरी लावली. लखनौच्या या पंचतारांकित हॉटेलमध्ये 300 व्हिआयपी पाहुण्यांच्या उपस्थितीत साखरपुडा पार पडला. दोघांचं लग्न आता 18 नोव्हेंबरला वाराणसीमध्ये होणार आहे.
प्रिया सरोज या मछलीशहर येथून समाजवादी पक्षाच्या खासदार आहेत. तर, रिंकू सिंह टीम इंडियाचा आक्रमक फलंदाज आहे. प्रिया सरोज आणि रिंकू सिंह यांनी एकमेकांना अडीच लाख रुपयांची अंगठी घातली. रिंकू सिंहनं जेव्हा प्रिया सरोजला अंगठी घालताच ती आनंदानं रडू लागली. त्यानंतर दोघांनी हात उंचावत सर्व पाहुण्यांना अंगठी दाखवली.
रिंकू सिंग आणि प्रिया सरोज यांचं लग्न कसं ठरलं?
रिंकू सिंग भारताच्या टी 20 क्रिकेटमधील महत्त्वाचा खेळाडू आहे. प्रिया सरोज या समाजवादी पक्षाच्या खासदार आहेत. एक जण क्रिकेटच्या मैदानात तर दुसरी व्यक्ती राजकारणात असताना दोघांचं लग्न कसं ठरलं असं अनेकांना वाटेल. रिंकू सिंह आणि प्रिया सरोज यांची मैत्री 2023 मध्ये झाली होती. त्यानंतर मैत्रीचं रुपांतर प्रेमात आणि लग्नापर्यंत आलं आहे.
🔴 BREAKING | 'Sixer King' wore the ring Cricketer Rinku Singh and MP Priya Saroj got engaged,
— Indian Observer (@ag_Journalist) June 8, 2025
watch video #RinkuSingh | #PriyaSaroj #Engagement | #UttarPradesh | #Lucknow #latest #news #BREAKING pic.twitter.com/hI8rFJVrVN
प्रिया सरोज आणि रिंकू सिंह यांची पहिली भेट
रिंकू सिंह गेल्या अनेक वर्षांपासून आयपीएल खेळत आहे. मात्र, एक आक्रमक फलंदाज होण्यासाठी मॅच विनिंग इनिंग खेळणं आवश्यक असतं. रिंकू सिंह गेल्या अनेक वर्षांपासून कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळत आहे. कोलकाता नाईट रायडर्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील 2023 मधील हंगामातील मॅचमध्ये सलग 5 षटकार मारले होते. केकेआरला विजयासाठी 5 बॉलमध्ये 28 धावा आवश्यक होत्या. रिंकू सिंहनं 5 बॉलमध्ये 5 षटकार मारले आणि केकेआरला विजयी करण्यात आलं.
रिंकू सिंह या मॅचनंतर एका क्रिकेटपटूच्या लग्न सोहळ्याला गेला होता. तिथं रिंकू सिंह आणि प्रिया सरोज यांची पहिली भेट झाली. या दोघांच्या पहिल्या भेटीचं रुपांतर मैत्रीत झालं. रिंकू सिंह आणि प्रिया सरोज यांच्यातील भेटीचं रुपांतर प्रेमात झालं. यानंतर दोघांनी त्यांच्या कुटुंबीयांना माहिती देण्यात आली. 8 जून म्हणजे आजच दोघांचा साखरपुडा पार पडला.




















