IND vs AUS:ऑस्ट्रेलियाचा 389 धावांचा डोंगर, स्मिथचे शतक, तर वॉर्नर, फिंच, लाबुशेन, मॅक्सवेलचीही धडाकेबाज खेळी
IND vs AUS: सिडनीत सुरु असलेल्या दुसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात ऑस्ट्रे्लियाच्या स्टीव्ह स्मिथने आपल्या कारकिर्दीतले 11 वे शतक झळकवत धडाकेबाज खेळी केली. ऑस्ट्रेलियाने भारतीय संघासमोर जिंकण्यासाठी 390 धावांचं आव्हान ठेवण्यात आलं आहे.
IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असलेल्या वन डे मालिकेतील दुसरा सामना आज सिडनीत खेळवण्यात येतोय. या सामन्यात ऑस्ट्रेलियानं पुन्हा एकदा नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारत भारतीय गोलंदाजांवर वर्चस्व गाजवलं. मधल्या फळीतील स्टीव्ह स्मिथनं झळकावलेलं शतक, अॅरॉन फिंच, डेव्हिड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल आणि मार्नस लाबुशेनची दमदार अर्धशतकं यांच्या जोरावर कांगारुंनी 50 षटकात 4 बाद 389 धावांचा डोंगर उभारला आहे. ऑस्ट्रेलियाची भारताविरुद्धची आजवरची ही सर्वोच्च धावसंख्या ठरली.
स्मिथचं सलग दुसरं शतक
स्टीव्ह स्मिथनं भारताविरुद्धचा आपला सुपर फॉर्म कायम राखताना आणखी एक शतकी खेळी केली. त्यानं अवघ्या 64 चेंडूत 104 धावांची खेळी केली. त्याच्या या खेळीत 14 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता. स्मिथचं भारताविरुद्धचं हे पाचवं वन डे शतक ठरलं. तर त्याच्या एकूण वन डे शतकांची संख्या 11 वर पोहोचली आहे. याआधीच्या पहिल्या वन डेतही स्मिथनं 66 चेंडूत 105 धावा कुटल्या होत्या.
फिंच-वॉर्नरची भक्कम सलामी
ऑस्ट्रेलियाच्या डावात कर्णधार अॅरॉन फिंच आणि डेव्हिड वॉर्नरनं पुन्हा एकदा एक भक्कम सलामी दिली. फिंच आणि वॉर्नरनं पहिल्या विकेटसाठी 142 धावा उभारल्या. या दोघांनी साकारलेली ही आजवरची 12वी शतकी भागीदारी ठरली. फिंचनं 69 चेंडूत 6 चौकार आणि एका षटकारांसह 60 धावा केल्या. तर वॉर्नरनं 77 चेंडूत 7 चौकार आणि 3 षटकारांसह 83 धावांची खेळी केली. त्यानंतर आलेल्या मार्नस लाबुशेन आणि ग्लेन मॅक्सवेलनंही धावांच्या वाहत्या गंगेत हात धुऊन घेतले. लाबुशेननं 70 तर मॅक्सवेलनं नाबाद 63 धावा फटकावल्या.