(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Ind Vs Aus 2nd ODI: गिलचा फ्लॉप शो, सूर्या थेट सरेंडरच... कांगारूंकडून टीम इंडियाचा फडशा, पराभवाला कारणीभूत कोण?
India Vs Australia, 2nd ODI: विशाखापट्टणमच्या वनडेत ऑस्ट्रेलियानं टीम इंडियावर 10 गडी राखून विजय मिळवला. उर्वरित चेंडूनुसार, भारतीय संघाचा हा सर्वात मोठा पराभव असून या सामन्यात फलंदाजांचा फ्लॉप शो पाहायला मिळाला. या पराभवाला जबाबदार कोण?
Ind Vs Aus 2nd ODI: ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या (Australia) विशाखापट्टणम वनडेत (Visakhapatnam ODI) टीम इंडियाचा (Team India) 10 विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला. मुंबई वनडेत विजयानंतर टीम इंडियाला दुसऱ्या वनडेत मात्र पराभव पत्करावा लागला आणि यासह मालिका 1-1 अशी बरोबरीत सुटली. हा पराभव टीम इंडियाच्या जिवाहरी नक्कीच लागला असणार, याला कारणही तसंच आहे. कारण हा टीम इंडियाच्या वनडे सामन्यांच्या आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठा पराभव मानला जातोय. महत्त्वाचं म्हणजे, घरच्याच मैदानावर टीम इंडियाला लाजीरवाण्या पराभवाचा सामना करावा लागला आहे.
विशाखापट्टणममध्ये टीम इंडियानं सर्वात आधी फलंदाजी करताना केवळ 117 धावा केल्या. टीम इंडिया अवघ्या 26 षटकांत गडगडली. टीम इंडियानं दिलेल्या धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या ऑस्ट्रेलियानं 11 षटकांत हे लक्ष्य गाठलं. ऑस्ट्रेलियानं 10 गडी राखून दुसरी वनडे आपल्या खिशात घातली आणि सामना 234 चेंडू शिल्लक असतानाच संपला. एकदिवसीय क्रिकेटमध्ये चेंडू शिल्लक असताना टीम इंडियाचा हा सर्वात मोठा पराभव आहे.
...अन् अखेर 'या' पराभवाचा दोषी कोण, कोणामुळे टीम इंडियाचा पराभव झाला?
शुभमन गिल
दोन्ही सामन्यांमध्ये टीम इंडियाची सुरुवात चांगली झाली नाही. शुभमन गिलला पहिल्या एकदिवसीय सामन्यात केवळ 20 धावा करता आल्या, तर दुसऱ्या सामन्यात त्याला साधं खातंही उघडता आलं नाही. ऑस्ट्रेलियासारख्या बलाढ्य संघासमोर चांगली सुरुवात करणं आवश्यक आहे, पण शुभमनला ते करणं शक्य झालं नाही. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात शुभमन गिलचा विकेट गेला अन् त्यापाठोपाठ एक-एक करुन सर्वच फलंदाज माघारी परतले.
सूर्यकुमार यादव
टी-20 चा सुपरस्टार सूर्यकुमार यादव वनडेत मात्र आपली जादू दाखवू शकला नाही. यापूर्वी झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यांतही सूर्यकुमारला चांगली खेळी करता आली नाही. सूर्यकुमार यादव सलग दोन सामन्यांमध्ये 'गोल्डन डक'चा बळी ठरला. म्हणजेच, तो डावाच्या पहिल्याच चेंडूवर बाद झाला. कसोटी मालिका, एकदिवसीय मालिका सूर्याचा फ्लॉप शो सुरूच आहे, अशा परिस्थितीत त्याच्या जागी दुसऱ्याला संधी मिळावी, अशी मागणी होत आहे.
टीम इंडियाची मिडल ऑर्डर फ्लॉप
टीम इंडियाला चांगली सुरुवात झाली नाही, पण मिडल ऑर्डर पूर्णपणे फ्लॉप झाली. सूर्यापाठोपाठ हार्दिक पांड्या, केएल राहुललाही धावा करता आल्या नाहीत. सूर्यकुमार यादव 0, हार्दिक पांड्या 1 आणि केएल राहुल केवळ 9 धावा करुन माघारी परतले. अवघ्या 5 षटकांत तिघंही बाद झाले आणि त्यानंतर टीम इंडियाची धावसंख्या 49/5 अशी होती.
गोलंदाजही फेल
टीम इंडियाच्या फलंदाजांनी केवळ 117 धावा केल्या होत्या, त्यामुळे गोलंदाजांकडून अधिक अपेक्षा होत्या. पण ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांनी मैदानावर उतरताच वायूवेगानं केवळ 11 षटकांतच लक्ष्य गाठलं. या सामन्यात सिराजनं 3 षटकांत 37 धावा, हार्दिकनं 1 षटकात 18 धावा आणि कुलदीप यादवनं एका षटकात 12 धावा दिल्या.
विशाखापट्टनम वनडेचा स्कोरबोर्ड
टीम इंडिया : 117/10, 26 ओव्हर्स
टीम ऑस्ट्रेलिया : 121/0, 11 ओव्हर्स
वनडेमध्ये टीम इंडियाचा सर्वात मोठा पराभव (चेंडूनुसार)
• 234 चेंडू, 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाच्या विरोधात
• 212 चेंडू, 2019 मध्ये न्यूजीलँडच्या विरोधात
• 209 चेंडू, 2010 मध्ये श्रीलंकेच्या विरोधात
महत्त्वाच्या इतर बातम्या :