(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs ENG: सूर्यकुमार यादवला कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करण्याची संधी मिळेल का? पृथ्वी शॉ बरोबर इंग्लंडला बोलावले
भारतीय संघ व्यवस्थापनाने तीन खेळाडू जखमी झाल्यानंतर पर्यायी खेळाडूंची मागणी केली होती. शुभमन गिल, वॉशिंग्टन सुंदर आणि आवेश खान यांना दुखापतीमुळे सध्याच्या दौर्याबाहेर जावे लागले आहे.
Suryakumar Yadav and Prithvi Shaw will go to England: विराट कोहलीच्या नेतृत्वात इंग्लंड दौर्यावर गेलेला टीम इंडिया खेळाडूंच्या दुखापतीमुळे त्रस्त आहे. प्रथम सलामीवीर शुभमन गिल जखमी झाला आणि त्यानंतर वॉशिंग्टन सुंदरलाही बोटाला दुखापत झाली. अशा परिस्थितीत आता फॉर्मात असलेला सलामीवीर पृथ्वी शॉ आणि मधल्या फळीतील फलंदाज सूर्यकुमार यादव यांना या खेळाडूंच्या जागी इंग्लंडला बोलावण्यात आले आहे.
वास्तविक, भारतीय संघ व्यवस्थापनाने तीन खेळाडू जखमी झाल्यानंतर पर्यायी खेळाडूंची मागणी केली होती. शुभमन गिल, वॉशिंग्टन सुंदर आणि अवेश खान यांना दुखापतीमुळे सध्याच्या दौर्याबाहेर जावे लागले आहे.
न्यूझीलंडविरुद्धच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये शुबमनला गुडघ्याखालील दुखापत झाली होती, तर काउंटी इलेव्हनविरुद्धच्या सराव सामन्यादरम्यान आवेश खानच्या बोटाला दुखापत झाली तर वॉशिंग्टनच्या बोटालाही दुखापत झाली आहे.
ऑफ स्पिनर जयंत यादव हा देखील वॉशिंग्टनच्या जागी ब्रिटनला जाणार होता, पण आता फक्त सूर्यकुमार आणि पृथ्वी यांनाच पाठवले जाईल, अशी माहिती आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या एका वरिष्ठ अधिका्याने याची पुष्टी केली आहे.
ते म्हणाले, की "हो, पृथ्वी आणि सूर्यकुमार श्रीलंकेहून ब्रिटनला जात आहेत. जयंतलाही जावे लागणार होते. मात्र, क्वारंटाईन ठेवण्याच्या नियमामुळे योजनेत थोडा बदल झाला आहे. जयंत आता जाणार नाही. हे दोन्ही खेळाडू कोलंबोहून लंडनला 'बायो बबल' ते 'बायो बबल' जात आहेत. हे टी -20 आंतरराष्ट्रीय सामन्यांच्या दरम्यान जाणार आहेत. पृथ्वी आणि सूर्यकुमार सध्या श्रीलंकेतील संघाचे सदस्य आहेत. मात्र, हे दोघे मालिकेच्या मध्यभागी किंवा त्यानंतर इंग्लंडला जातील हे अद्याप ठरले नाही. लवकरच याबाबत निर्णय घेतला जाईल."
भारत आणि इंग्लंड यांच्यात चार ऑगस्टपासून कसोटी मालिका सुरू होणार
भारत आणि इंग्लंड यांच्यात पाच सामन्यांची कसोटी मालिका 4 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत जर श्रीलंकेविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेनंतर पृथ्वी शॉ आणि सूर्यकुमार यादव इंग्लंडला रवाना झाले तर त्यांना पहिल्या कसोटीत खेळणे कठीण होईल. दोघांचा फॉर्म पाहता असे मानले जातंय की दोन्ही खेळाडूंना मालिकेत खेळण्याची संधी मिळू शकते.