T20 World Cup 2022 : भारतासह 'हे' तीन संघ असणार सेमीफायलनमध्ये, माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचं भाकित
T20 World Cup 2022 : ऑस्ट्रेलियामध्ये 16 ऑक्टोबरपासून टी20 विश्वचषकाला सुरुवात होत असून भारत यंदा या स्पर्धेतील सर्वात दमदार संघापैकी एक आहे.
Ravi Shastri on T20 World Cup : आगामी टी20 विश्वचषक 2022 (T20 World Cup 2022) ऑस्ट्रेलियामध्ये सुरु होत असून सध्या सराव सामने सुरु झाले आहेत. भारतही ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंडविरुद्ध सराव सामने खेळणार असून इतरही संघ एकमेंकाविरुद्ध प्रॅक्टीस मॅच खेळत आहेत. यंदा सर्वच संघ कमाल फॉर्मात असल्याने एक चुरशीची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळणार असून नेमके कोणते संघ सेमीफायलनपर्यंत पोहोचणार याबद्दल माजी क्रिकेटर आणि माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री (Ravi Shastri) यांनी आपलं मत नोंदवलं आहे. शास्त्रींच्या मते भारत यंदा दमदार फॉर्ममध्ये असल्याने भारत सेमीफायनलपर्यंत नक्कीच पोहोचणार असून सोबत पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे संघ सेमीसपर्यंत पोहचण्याचे दावेदार आहेत.
टी20 विश्वचषकापूर्वी पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी शास्त्री मुंबई प्रेस क्लब इथे आले असताना त्यांनी विश्वचषकाबाबतच्या विविध गोष्टींवर चर्चा केली. यावेळी स्पर्धेत चांगली कामगिरी करु शकणारे संघ कोणते याबाबत विचारणा केली असता भारताचा संघ यंदा चांगल्या फॉर्मात असल्याने नक्कीच विजेतेपदाचा दावेदार असून सोबत पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड हे संघ सेमीफायनलपर्यंत पोहोचतील असं ते म्हणाले. तसंच न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिका हे संघही कमाल फॉर्ममध्ये असल्याचंही त्यांनी यावेळी नमूद केलं.
'पंत, पांड्या आणि कार्तिकमुळे भारताची ताकद वाढली'
शास्त्री यांनी यंदाच्या विश्वचषकाबद्दल बोलताना भारतीय संघाची यंदाची बॅटिग लाईनअप ही विश्वचषकाच्या इतिहासातील सर्वात ताकदवर बॅटिंग लाईनअप असल्याची प्रतिक्रिया दिली.यामागील खास कारण म्हणजे, मधल्या फळीतील पंत, पांड्या आणि कार्तिक हे त्रिकुट असल्याचंही शास्त्री म्हणाले. या तिघांच्या संघात एकत्र असण्याने भारताची फलंदाजी आणखी दमदार झाल्याचं ते म्हणाले. भारताकडे शर्मा, कोहली, राहुल तसंच सूर्यासारखे फलंदाज असून मधल्या फळी आणि फिनिशिंगला आता पंत, पांड्या आणि कार्तिक असल्याने भारत चांगली कामगिरी करेल असं ते म्हणाले.
कोणच्या शहरांत रंगणार टी-20 विश्वचषक स्पर्धा
यंदा16 ऑक्टोबरपासून 13 नोव्हेंबर पर्यंत एकूण ऑस्ट्रेलियात आयसीसी टी20 विश्वचषक पार पडणार असून स्पर्धेत एकूण 46 सामने खेळवले जाणार आहेत. हे सर्व सामने ऑस्ट्रेलियाच्या वेगवेगळ्या सात शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत. यामध्ये अॅडलेड, ब्रिस्बेन, जिलॉन्ग, होबार्ट, मेलबर्न, पर्थ आणि सिडनी या शहरांचा समावेश असून याठिकाणी सामने खेळवले जाणार आहेत. उपांत्य फेरीचे सामने 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी सिडनी क्रिकेट मैदान आणि अॅडलेड येथे खेळवले जातील. तर, अंतिम सामना 13 नोव्हेंबरला मेलबर्नमध्ये खेळला जाईल.
हे देखील वाचा-