IND vs WI : सूर्या-सॅमसन-पांड्या सगळेच फ्लॉप, विश्व कप 2023 आधी टीम इंडियाचे फलंदाज ढेपाळले
West Indies vs India, 2nd ODI : विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्याशिवाय भारतीय फलंदाजी दुबळी जाणवली.
West Indies vs India, 2nd ODI : एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजने भारताला 181 धावांवर गुंडाळले. वेस्ट इंडिजने या सामन्यात भारताचा सहा विकेटने पराभव करत मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली. पण या दोन्ही एकदिवसीय सामन्यात भारतीय फलंदाजी ढेपाळली. 2023 च्या विश्वचषकापूर्वी टीम इंडियाचे फलंदाज फ्लॉप होणे ही भारतीय संघ व्यवस्थापनासाठी चिंतेची बाब आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली दुसऱ्या वनडेच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये नाहीत. या दोघांच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादव, हार्दिक पांड्या आणि संजू सॅमसन यांनी निराशाजनक कामगिरी केली. पहिल्या एकदिवसीय सामन्यातही सूर्या आणि पांड्याला काही विशेष करता आले नाही. विश्वचषकाची तयारी करणाऱ्या भारतीय संघासाठी चिंतेची बाब आहे.
नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने 40.5 षटकांत फक्त 181 धावा केल्या. यादरम्यान इशान किशनने 55 चेंडूत 55 धावा केल्या. शुभमन गिलने 49 चेंडूत 34 धावा केल्या. यानंतर सर्व फलंदाज गुडघे टेकताना दिसले. दीर्घकाळानंतर प्लेइंग इलेव्हनमध्ये परतलेला संजू सॅमसनही फ्लॉप झाला. 19 चेंडूत 9 धावा करून संजू तंबूत परतला. अक्षर पटेल 1 धावा काढून बाद झाला. कर्णधार हार्दिक पांड्या अवघ्या 7 धावा करून बाद झाला. सूर्यकुमार यादव 25 चेंडूत 24 धावा करून बाद झाला. रविंद्र जडेजा 10 धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. शार्दुल ठाकूरने 16 धावांचे योगदान दिले.
वेस्ट इंडिजविरुद्ध झालेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यातही भारतीय फलंदाजांची अवस्थाही वाईट झाली होती. भारताने हा सामना 5 विकेटने जिंकला, पण फलंदाजांनी निराश केले होते. वेस्ट इंडिजने दिलेल्या आव्हानाचा पाठलाग करताना टीम इंडियाची दमछाक उडाली होती. 115 धावांसाठी भारताचे पाच फलंदाज बाद झाले होते. या सामन्यात गिल 7 धावा करून बाद झाला. सूर्या अवघ्या 19 धावा करून बाद झाला. हार्दिक पांड्या धावबाद झाला. जाडेजा 16 धावा करून नाबाद राहिला. शार्दुल ठाकूरने 1 धाव घेतली. रोहित आणि कोहलीशिवाय टीम इंडियाची बॅटिंग खराब स्थितीत दिसत होती. भारतीय संघ 2023 च्या विश्वचषक स्पर्धेची तयारी करत आहे. पण त्याआधी फलंदाजीतील फ्लॉप निराशाजनक आहे. इशान किशनचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला अद्याप मोठी खेळी करता आलेली नाही. इशान किशन याने दोन्ही एकदिवसीय सामन्यात अर्धशतक झळकावलेय. इशान किशनचा अपवाद वगळता एकाही फलंदाजांना अर्धशतक झळकावता आले नाही.
वेस्ट इंडिजविरोधात सुरु असलेली वनडे मालिका म्हणजे विश्वचषकाची पूर्वतयारी होय. भारतामध्ये होणाऱ्या विश्वचषकाआधी भारतीय संघासाठी हा दौरा महत्वाचा आहे. या दौऱ्यात भारतीय संघ विश्वचषकाची पूर्वतयारी करत आहे. पहिल्या दोन्ही सामन्यात भारतीय फलंदाजी ढेपाळली आहे. विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्याशिवाय भारतीय फलंदाजी दुबळी जाणवली.