Sarfaraz Khan: 80 ची सरासरी, 9 अर्धशतकं अन् 13 शतकं... तरीही सरफराजचं वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी सिलेक्शन का नाही?
Sarfaraz Khan: रणजी ट्रॉफीत धमाकेदार कामगिरी करणारा सरफराज खानला यंदाही टीम इंडियात स्थान नाही.
Sarfaraz Khan: वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे आणि कसोटी मालिकेसाठी शुक्रवारी (23 जून) टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. दोन्ही मालिकेत टीम इंडियाची (Team India) धुरा रोहित शर्माकडे (Rohit Sharma) असणार आहे. वेस्ट इंडिज दौऱ्यावर टीम इंडियाला दोन कसोटी, तीन एकदिवसीय आणि पाच टी-20 सामने खेळायचे आहेत. टी-20 मालिकेसाठी संघाची घोषणा नंतर केली जाईल.
अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा वगळता बहुतांश वरिष्ठ खेळाडूंना कसोटी मालिकेसाठी भारतीय संघात स्थान मिळवण्यात यश आलं आहे. यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड या खेळाडूंनाही कसोटी संघात स्थान मिळालं आहे, पण देशांतर्गत क्रिकेटमध्ये चमकदार कामगिरी करणारा मुंबईचा स्टार फलंदाज सरफराज खान (Sarfaraz Khan) मात्र यंदाही भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवण्यात अयशस्वी ठरला आहे.
अजून किती दिवस सरफराजला प्रतिक्षा करावी लागणार?
25 वर्षीय सरफराज खान देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यानं धावा करत आहे. रणजी ट्रॉफीच्या गेल्या मोसमातही त्यानं धावांचा पाऊस पाडला होता. यानंतरही त्याची कसोटी संघात निवड न होणं अनेकांना विचारात पाडणारं आहे. एकदिवसीय आणि टी-20 कामगिरीच्या जोरावर ऋतुराज गायकवाडला कसोटी संघात स्थान मिळू शकलं. तसंच, देशांतर्गत क्रिकेटमधील कामगिरीच्या जोरावर सरफराज खानलाही संधी मिळू शकते. असो, ऋतुराजचं फर्स्ट क्लास एव्हरेज 42 च्या आसपास आहे आणि त्यानं सरफराजच्या तुलनेत जास्त सामनेही खेळलेले नाहीत.
सरफराज खाननं आतापर्यंत 37 फर्स्ट क्लास सामन्यांमध्ये 3505 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये 13 शतकं आणि 9 अर्धशतकं झळकावली आहेत. सरफराज खानची सर्वोच्च धावसंख्या नाबाद 301 आहे आणि सरासरी 80 (79.65) आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, सरफराजची गेल्या तीन रणजी ट्रॉफी हंगामात सरासरी 100 च्या वर आहे. अशा परिस्थितीत त्याची पुन्हा कसोटी संघात निवड न झाल्यानं चाहत्यांमध्ये आश्चर्य व्यक्त होत आहे. सरफराज फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये मुंबईसाठी मधल्या फळीत खेळतो आणि त्यामुळे टीम इंडियाची सध्याची स्थिती पाहता, मधल्या फळीसाठी तो एक चांगला पर्याय ठरू शकला असता.
सरफराजचं सिलेक्शन न होण्यामागे फिटनेसचं कारण?
तो फिट नाही... तो खूप लठ्ठ आहे... सर्फराजची निवड न करण्यामागे असा युक्तीवाद केला जात आहे. हे कारण असेल तर, आतापर्यंत सरफराजच्या फिटनेसचा त्याच्या कामगिरीवर काहीही परिणाम झाल्याचं दिसत नाही. जर तुम्हाला (निवडकांना) सडपातळ दिसणारा मुलगा हवा असेल तर तुम्ही एक मॉडेल शोधा, कारण सरफराज अशा फिटनेसमध्येही धावांचा डोंगर उभा करत आहे.
सरफराज खानची आतापर्यंतची कामगिरी
37 फर्स्ट क्लास मॅच : 79.65 सरासरी, 3505 धावा, 13 शतकं, 9 अर्धशतकं
26 लिस्ट-ए मॅच : 39.08 सरासरी, 469 धावा
वेस्ट इंडीज दौऱ्यासाठी टीम इंडिया
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड, विराट कोहली, यशस्वी जयसवाल, अजिंक्य रहाणे (उपकर्णधार), केएस भरत (विकेटकीपर), ईशान किशन (विकेटकीपर), आर. अश्विन, रवींद्र जाडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनादकट, नवदीप सैनी.
वेस्ट इंडिज दौऱ्याचं संपूर्ण वेळापत्रक
कसोटी सामने (संध्याकाळी साडेसात वाजता)
12 ते 16 जुलै 2023 : पहिला कसोटी सामना
ठिकाण : विंडसर पार्क, डोमिनिका
20 ते 24 जुलै 2023 : दुसरा कसोटी सामना
ठिकाण : क्विन्स पार्क ओव्हल पोर्ट , त्रिनिदाद
वनडे सामने - (संध्याकाळी सात वाजता)
27 जुलै 2023 : पहिला एकदिवसीय सामना
ठिकाण : किंग्सटन, ओव्हल बारबाडोस
29 जुलै 2023 : दुसरा एकदिवसीय सामना
ठिकाण : किंग्सटन, ओव्हल बारबाडोस
1 ऑगस्ट 2023 - तिसरा एकदिवसीय सामना
ब्रायन लारा क्रिकेट अॅकॅडमी, त्रिनिदाद
महत्त्वाच्या इतर बातम्या :