(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IND vs SL : श्रेयस अय्यरची तुफानी फलंदाजी, भारताने श्रीलंकेला सात गड्यांनी हरवले
IND vs SL, 2nd T20I : श्रेयस अय्यरच्या तुफानी अर्धशतकाच्या बळावर भारतीय संघाने दुसरा टी-20 सामना सात गड्यांनी जिंकला आहे.
IND vs SL, 2nd T20I : श्रेयस अय्यरच्या तुफानी अर्धशतकाच्या बळावर भारतीय संघाने दुसरा टी-20 सामना सात गड्यांनी जिंकला आहे. श्रीलंका संघाने दिलेले 184 धावांचे आव्हान भारतीय संघाने 18 व्या षटकातच तीन गड्यांच्या मोबदल्यात पार केले. या विजयासह भारतीय संघाने तीन सामन्याची मालिकेक 2-0 च्या फरकाने बाजी मारली आहे. वेस्ट इंडिजनंतर भारतीय संघाने श्रीलंका संघाचाही मालिकेत पराभव केला आहे. भारतीय संघाचा हा लागोपाठ नववा विजय होता. 184 धावांचा पाठलाग करताना श्रेयस अय्यरच्या तुफानी 74 धावांच्या खेळीला संजू सॅमसन आणि रविंद्र जाडेजा यांनी चांगली साथ दिली. संजू सॅमसन याने 25 चेंडूत 39 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान संजू सॅमसन याने तीन षटकार आणि दोन चौकार लगावले. तर रविंद्र जाडेजाने 18 चेंडूत 45 धावांचा पाऊस पाडला. जाडेजाने 7 चौकार आणि एक षटकार लगावला.
श्रीलंका संघाने दिलेल्या 184 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. रोहित शर्मा झटपट माघारी परतला. रोहित शर्माला फक्त एक धाव करता आली. त्यानंतर ईशान किशनही 16 धावा काढून तंबूत परतला. पण श्रेयस अय्यरने एका बाजूने धावांचा पाऊस पाडला होता. श्रेयस अय्यरने आधी संजू सॅमसनसोबत आणि नंतर रविंद्र जाडेजासोबत भागिदारी करत भारताला विजय मिळवून दिला. श्रेयस अय्यरने 44 चेंडूत 74 धावांची खेळी केली. या खेळीदरम्यान श्रेयस अय्यरने चार षटकार आणि सहा चौकार लगावले. श्रीलंकाकडून कुमाराने दोन विकेट घेतल्या.
दरम्यान, भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघात कोणताही बदल नव्हता. पहिल्या सामन्यातील विजयी संघ कायम ठेवण्यात आला होता. श्रीलंका संघात दोन बदल करण्यात आले होते. पथुम निसांका याच्या तुफानी अर्धशतकी खेळीच्या बळावर श्रीलंका संघाने निर्धारित 20 षटकांत पाच बाद 183 धावांपर्यंत मजल मारली. दनुष्का गुणथिलका आणि पथुम निसांका यांनी श्रीलंका संघाला आक्रमक सुरुवात करुन दिली. पहिल्या काही षटकांमध्ये लंकेच्या सलामीवीरांना साधव फलंदाजी केली. त्यानंतर दोघांनाही तुफान फटकेबाजी केली. निसांका याने 53 चेंडूत 75 धावांची खेळी केली. तर गुणथिलका याने 38 धावांची खेळी केली आहे. कर्णधार दासुन शनाका याने अखेरच्या षटकात धावांचा पाऊस पाडला. दासुन शनाका याने 19 चेंडूत पाच चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 47 धावांचा पाऊस पाडला. या तीन फलंदाजांचा अपवाद वगळता एकाही फलंदाजाला आपल्या लौकिकास साजेशी फलंदाजी करत आली नाही. अखेरच्या पाच षटकांत श्रीलंकेच्या फलंदाजांनी 80 धावा चोपल्या आहेत. यामध्ये सर्वाधिक मोठं योगदान श्रीलंका संघाच्या कर्णधाराचे होतं. भारतीय संघाकडून जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, रविंद्र जाडेजा आणि यजुवेंद्र चहल यांनी प्रत्येकी एक एक विकेट घेतली. हर्षल पटेल सर्वाधिक महागडा गोलंदाज ठरला आहे. हर्षल पटेलच्या चार षटकात श्रीलंकेच्या फंलदाजांनी तब्बल 52 धावा वसूल केल्या.