(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Rohit Sharma Captaincy : भारताच्या श्रीलंकेवरील मोठ्या विजयामुळे रोहितवर कौतुकाचा वर्षाव, 'ही' कामिगिरी करणारा दुसराच भारतीय
IND vs SL, 1st Test, Mohali: भारतीय क्रिकेट संघाने पहिल्या कसोटी सामन्यात श्रीलंकेवर एक डाव आणि 222 धावांनी विजय मिळवला आहे.
Rohit Sharma Captaincy : भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यातील पहिल्या कसोटीत भारताने एक डाव आणि 222 धावांनी एका मोठ्या विजयाची नोंद केली आहे. सामन्याच्या पहिल्या दिवशीपासून भारताचं पारडं जड असल्याने भारताने हा मोठा विजय मिळवला. विशेष म्हणजे रोहित शर्माची कसोटी कर्णधार म्हणून ही पहिलीच मॅच असल्याने हा मोठा विजय त्याच्यासाठी आणखी खास झाला आहे. दरम्यान भारताने सामन्यात एक डाव आणि 222 धावांनी मिळवलेल्या मोठ्या विजयामुळे कर्णधार म्हणून सलामीच्या सामन्यात अशी कामगिरी करणारा रोहित दुसरा भारतीय कर्णधार ठरला आहे. याआधी पॉली उमरीगर (Polly Umrigar) यांनी 1955-56 साली अशीच कामगिरी केली होती.
भारताचे माजी कर्णधार आणि दिग्गज खेळाडू पॉली उमरीगर यांच्या कर्णधारपदाखाली भारताने 1955-56 साली न्यूझीलंडविरुद्ध मुंबई येथे झालेल्या कसोटी सामन्यात दांडगा विजय मिळवला होता. भारताने एक डाव आणि 27 धावांनी हा सामना जिंकला होता. दरम्यान त्यानंतर कर्णधार म्हणून सलामीचा सामना खेळताना अशी कामगिरी कोणीच केली नव्हती. त्यानंतर आता रोहितच्या कर्णधारपदाखाली भारताने हा मोठा विजय मिळवल्याने रोहितचं नाव इतिहासात लिहिलं गेलं आहे. बीसीसीआयनेही रोहितचं कौतुक केलं आहे.
असा पार पडला सामना
सामन्याच्या पहिल्या दिवशी नाणेफेक जिंकत भारताने फलंदाजाची निर्णय घेतला. पहिल्या दिवशी भारतीय संघाने 85 षटकांत 6 बाद 357 धावा केल्या. पहिल्या दिवशी ऋषभ पंतने 97 चेंडूमध्ये 96 धावा केल्या. तर हनुमा विहारीने 128 चेंडूत 58 धावा केल्या. तर कोहली 45 धावा करुन तंबूत परतला. दुसऱ्या दिवशी जाडेजाने उत्तम सुरुवात केली त्याला आश्विनची साथ मिळाली. आश्विन 61 धावा करुन बाद झाला तर जाडेजा 175 धावांवर नाबाद राहिला. अखेर 574 धावांवर भारताने डाव घोषित केला. ज्यानंतर श्रीलंकेच्या फलंदाजांनी पहिल्या दिवस अखेर 108 धावा करत 4 विकेट गमावल्या. ज्यानंतर तिसऱ्या दिवशी सकाळच्या सुमारास 6 विकेट्स भारताने मिळवल्या. ज्यानंतर श्रीलंकेला फॉलोऑन मिळाल्याने श्रीलंकेने दुसरा डाव सुरु केला. ज्यात एन. डिकवेला (नाबाद 51) याच्याशिवाय एकाही फलंदाजाला खास कामगिरी करता न आल्याने 178 धावांवर श्रीलंका पुन्हा सर्वबाद झाली. ज्यामुळे भारताने एक डाव आणि 222 धावांनी सामना जिंकत दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 ची आघाडी घेतली आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- IND vs SL, 1st Test: रविंद्र जडेजानं रचला इतिहास, कपिल देवचा 'हा' विक्रम मोडला
- Virat Kohli Test Runs : शंभराव्या कसोटीत 8000 धावा पूर्ण करणारा विराट कोहली दुसरा फलंदाज
- 'अनुष्का ग्राऊंडवर काय करतेय?' विराट कोहलीच्या 100व्या कसोटी सामन्या दरम्यान नेटकऱ्यांकडून ट्रोल
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha