IND vs SA Final : एमएस धोनीसारखा करिष्मा रोहित शर्मा करणार का, आफ्रिकेला कसं रोखणार?
T20 World Cup 2024 IND vs SA Final : टी20 विश्वचषकाचा नवा विजेता कोण ठरणार, भारत की दक्षिण आफ्रिका? तुमच्या आमच्या मनातल्या या प्रश्नाचं आज बार्बाडोसच्या रणांगणात मिळणार आहे.
T20 World Cup 2024 IND vs SA Final : टी20 विश्वचषकाचा नवा विजेता कोण ठरणार, भारत की दक्षिण आफ्रिका? तुमच्या आमच्या मनातल्या या प्रश्नाचं आज बार्बाडोसच्या रणांगणात मिळणार आहे. भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री आठ वाजता सुरु होईल. टी20 किंवा वन डे विश्वचषकाच्या इतिहासात भारत आणि दक्षिण आफ्रिका संघ फायनलच्या मैदानात आमनेसामने येण्याची ही पहिलीच वेळ आहे. ट्वेन्टी ट्वेन्टी विश्वचषकात भारताची फायनलमध्ये धडक मारण्याची तिसरी वेळ आहे. पण आयसीसी विश्वचषकाच्या इतिहासात दक्षिण आफ्रिकेनं पहिल्यांदाच अंतिम फेरी गाठण्याची कामगिरी बजावली आहे. दक्षिण आफ्रिका आणि भारत या दोन्ही संघांनी यंदाच्या विश्वचषकात प्राथमिक आणि अव्वल साखळीवरही आपला ठसा उमटवला. हे दोन्ही संघ आतापर्यंत अपराजित आहेत. त्यामुळं यंदाचा टी20 विश्वचषक कोण जिंकतो, याकडे क्रिकेटरसिकांचं लक्ष लागलं आहे. भारतानं टी20 विश्वचषकाच्या फायनलमध्ये धडक मारण्याची ही तिसरी वेळ आहे. 2007 साली भारतानं पाकिस्तानला हरवून टी20 विश्वचषकावर आपलं नाव कोरलं होतं. त्यानंतर 2014 सालच्या टी20 विश्वचषकात भारताला फायनलमध्ये श्रीलंकेकडून हार स्वीकारावी लागली होती. पण आयसीसीच्या स्पर्धेत मागील पाचवेळा भारतीय संघ जेव्हा जेव्हा फायनलला पोहचलाय, त्यावेली स्वप्न भंगलेय. हेच कोडं सोडवण्याची संधी आज पुन्हा एकदा भारताकडे आलेली आहे.
2007 चा पराक्रम पुन्हा होणार ?
टी20 विश्वचषक 2007 मध्ये भारताने विजेतेपद पटकावले होते. यानंतर 2011 मध्ये एकदिवसीय विश्वचषक जिंकला. टीम इंडियाने 2013 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. मात्र त्यानंतर मागील 11 वर्षांपासून पराभवाचा सिलसिला सुरु आहे. 2014 च्या फायनलमध्ये टीम इंडियाचा पराभव झाला होता. यानंतर 2017 च्या चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत पाकिस्तानकडून पराभव झाला. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2021 मध्ये भारताचा न्यूझीलंडकडून पराभव झाला. 2023 मध्ये ऑस्ट्रेलियाने हरवले. एकदिवसीय विश्वचषकातही ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला होता. आता हीच पराभवाची मालिका खंडित करण्यासाठी रोहितसेना मैदानात उतरणार आहे. रोहित शर्माला एमएस धोनीसारखी कमाल करण्याची संधी चालून आली आहे. धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने 2007 मध्ये टी-20 विश्वचषक जिंकला होता. आता रोहितही हा पराक्रम करू शकतो.
आफ्रिकेचा संघ भन्नाट फॉर्मात -
2024 टी20 विश्वचषक दक्षिण आफ्रिकेने शानदार कामगिरी केली आहे. आफ्रिकेचा संघ आतापर्यंत अजेय आहे. साखळी फेरीत आणि सुपर 8 मध्ये दमदार कामगिरी केली. उपांत्य सामन्यात अफगाणिस्तानचा पराभव करत फायनलमध्ये स्थान मिळवले. आता अंतिम सामना भारतासोबत होणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा संघ अतिशय मजबूत स्थितीत आहे. आफ्रिकेकडून भारतीय संघाला कडवी टक्कर मिळण्याची शक्यता आहे.
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात होणाऱ्या अंतिम सामन्यादरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. नाणेफेकीपूर्वी पाऊस पडल्यास सामन्याला उशीर होऊ शकते. आजच्या दिवस खेळ झालाच नाही तर राखीव दिवस ठेवण्यात आला आहे. म्हणजे, पावसाने व्यत्यय आणल्यास रविवारी फायनल होण्याची शक्यता आहे.