(Source: ECI/ABP News/ABP Majha)
India vs South Africa Test Match: फक्त 642 चेंडू आणि 92 वर्षांपूर्वीचा विक्रमही खल्लास; कसोटी क्रिकेटमधील सर्वात छोटा सामना कोणता?
India vs South Africa Test Match: : भारत आणि आफ्रिका यांच्यात झालेला हा कसोटी सामना क्रिकेटच्या इतिहासातील चेंडूंच्या बाबतीत सर्वात लहान कसोटी होता.
IND vs SA 2nd Shortest Test : केपटाऊनमध्ये भारत आणि दक्षिण आफ्रिका (India Vs South Africa Test Match) यांच्यातील दुसरी कसोटी अवघ्या दीड दिवसात संपली. या सामन्यात टीम इंडियाने बाजी मारली. अतिशय कमी कालावधीत संपलेल्या या कसोटी सामन्यात काही विक्रमांची नोंदही झाली आहे.
केपटाऊनमध्ये खेळल्या गेलेल्या कसोटीत पाहुण्या भारताने यजमान दक्षिण आफ्रिकेचा 7 गडी राखून पराभव केला. भारत आणि आफ्रिका यांच्यात झालेला हा कसोटी सामना क्रिकेटच्या इतिहासातील चेंडूंच्या बाबतीत सर्वात लहान कसोटी होता. सामना पूर्ण करण्यासाठी केवळ 642 चेंडू टाकण्यात आले. याचा अर्थ संपूर्ण सामना हा 107 षटकांमध्ये संपला.
92 वर्षापूर्वीचा विक्रम मोडीत
यापूर्वी, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात 1932 मध्ये सर्वात लहान कसोटी सामना ठरला होता. हा सामना 656 चेंडूंमध्ये संपला होता. पण आता भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात खेळल्या गेलेल्या कसोटीच्या नावावर हा खास विक्रम नोंदवला गेला आहे. सामन्यात दोन दिवसही पूर्ण होऊ शकले नाहीत आणि टीम इंडियाला विजय मिळाला. कसोटी क्रिकेटमध्ये सामना दोन दिवस आधी संपणे हे फारच दुर्मिळ आहे.
सर्वात कमी कालावधीत संपलेले कसोटी सामने कोणते?
642 चेंडू - दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत, केपटाऊन, 2024
656 चेंडू - ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका, मेलबर्न, 1932
672 चेंडू - वेस्ट इंडिज विरुद्ध इंग्लंड, ब्रिजटाऊन, 1935
788 चेंडू - इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, मँचेस्टर, 1888
792 चेंडू - इंग्लंड विरुद्ध ऑस्ट्रेलिया, लॉर्ड्स, 1888.
केपटाऊन सामन्यातील स्थिती काय?
केपटाऊनमध्ये खेळल्या गेलेल्या दुस-या कसोटीत दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. सिराजच्या भेदक गोलंदाजीसमोर आफ्रिकेचा संघ पहिल्या डावात अवघ्या 55 धावांमध्ये गडगडला. टीम इंडियाकडून मोहम्मद सिराजने सर्वाधिक 6 विकेट घेतल्या. याशिवाय जसप्रीत बुमराह आणि मुकेश कुमार यांनी 2-2 विकेट घेतल्या. त्यानंतर पहिल्या डावात फलंदाजीसाठी आलेला भारतीय संघ जास्त वेळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही आणि 153 धावांवर संघ तंबूत परतला.
सामन्याच्या पहिल्याच दिवशी दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या डावात फलंदाजीसाठी उतरला आणि दिवसअखेर त्यांनीही 3 विकेट गमावल्या. सामन्याच्या पहिल्या दिवशी एकूण 23 विकेट पडल्या. त्यानंतर दुसऱ्या दिवशी भारताने दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेला 176 धावांत गुंडाळले. जसप्रीत बुमराहने 6 विकेट घेतल्या. आफ्रिकेने भारताला विजयासाठी 79 धावांचे लक्ष्य दिले होते. टीम इंडियाने 12 षटकांत 3 गडी गमावून हे विजयी लक्ष्य पूर्ण केले.