Ind vs Pak Asia Cup 2025 : भारत-पाकिस्तान सामन्यावर बीसीसीआयचा बहिष्कार? मॅचमध्ये दिसणार नाहीत बोर्डाचे वरिष्ठ अधिकारी, काही तासाआधी मोठी अपडेट
India vs Pakistan Match Boycott Asia Cup 2025 : आशिया कप 2025 मधला हाय-व्होल्टेज सामना भारत आणि पाकिस्तान 14 सप्टेंबरला रंगणार आहे.

India vs Pakistan Asia Cup 2025 Update : आशिया कप 2025 मधला हाय-व्होल्टेज सामना 14 सप्टेंबरला रंगणार आहे. हा महत्त्वाचा सामना भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणार असून दुबईतील दुबई इंटरनॅशनल क्रिकेट ग्राऊंडवर रात्री 8 वाजता पहिला चेंडू टाकला जाईल. या सामन्यापूर्वीच वातावरण तापलं आहे. एकीकडे चाहते आणि माजी खेळाडू यांचा विरोध सुरू आहे, तर दुसरीकडे या लढतीवर नवा वाद निर्माण झाला आहे.
बीसीसीआय टाकणार IND vs PAK सामन्यावर बहिष्कार? (BCCI boycott IND vs PAK match?)
मिळालेल्या माहितीनुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) पाकिस्तानविरुद्धच्या या सामन्याचा बहिष्कार करण्याचा विचार केला आहे. अलीकडेच झालेल्या पहलगाव दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरातून हा सामना रद्द करण्याची मागणी होत आहे. दैनिक जागरणच्या वृत्तानुसार, बीसीसीआय (BCCI) चे कुठलेही वरिष्ठ अधिकारी अद्याप दुबईला पोहोचलेले नाहीत. पहलगाव हल्ला आणि त्यानंतरच्या ऑपरेशन सिंदूरमुळे निर्माण झालेल्या संवेदनशील परिस्थितीचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.
सचिव देवजीत सैकिया हे महिला वनडे विश्वचषकाच्या तयारीत व्यस्त असल्याने सामन्याला उपस्थित राहणार नाहीत. आयपीएल चेअरमन अरुण धूमल यांनीदेखील दुबई न जाण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, कार्यकारी अध्यक्ष राजीव शुक्ला, जे एशियन क्रिकेट कौन्सिल (ACC) चे सदस्य आहेत, ते या सामन्यात उपस्थित राहू शकतात. तसेच, आयसीसी चेअरमन जय शाह हे अमेरिकेत महत्त्वाच्या बैठकींमध्ये व्यस्त असल्याने दुबईत येणार नाहीत.
सरकारच्या निर्णयावर BCCI अवलंबून (BCCI depends India Government)
बीसीसीआय अनेकदा स्पष्टपणे सांगत आलं आहे की, पाकिस्तानविरुद्ध खेळायचं की नाही हे पूर्णपणे भारत सरकारच्या भूमिकेवर अवलंबून आहे. यापूर्वीही भारताने पाकिस्तानमध्ये होणाऱ्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा बहिष्कार केला होता. त्यावेळी स्पर्धा हायब्रिड मॉडेलवर घेण्यात आली होती आणि भारताने आपले सर्व सामने यूएईत खेळले होते.
भारत आणि पाकिस्तान टी-20 मध्ये कोण वरचढ? (India vs Pakistan Head To Head Records Asia Cup)
2025 आशिया कप टी-20 स्वरूपात खेळला जात आहे. 2016 मध्ये पहिल्यांदाच ही स्पर्धा टी-20 स्वरूपात आयोजित करण्यात आली होती, त्यामुळे टी-20 मध्ये हा पाचवा हंगाम असेल. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील टी-20 स्वरूपात सामना नेहमीच खास असतो. आतापर्यंत दोन्ही संघांनी 17 टी-20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत, ज्यामध्ये भारताने 10 सामने जिंकले आहेत तर पाकिस्तानने फक्त तीन वेळा विजय मिळवला आहे. या आकडेवारीवरून असे दिसून येते की टी-20 मध्ये भारताची थोडीशी आघाडी आहे, ज्यामुळे भारतीय संघाला मानसिक फायदा देखील मिळतो.
हे ही वाचा -





















