मौका... मौका... आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान महासंग्राम तीन वेळा होणार ?
IND vs PAK, Asia Cup 2023 : क्रिकेट जगतातील सर्व क्रिकेटप्रेमी वाट पाहणारा सामना म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK).
IND vs PAK, Asia Cup 2023 : क्रिकेट जगतातील सर्व क्रिकेटप्रेमी वाट पाहणारा सामना म्हणजे भारत विरुद्ध पाकिस्तान (IND vs PAK). आता या सामन्याचा आनंद पुन्हा एकदा क्रिकेटप्रेमींना अनुभवता येणार आहे. आशिया कप 2023 (Asia Cup 2023) स्पर्धेत दोन्ही संघ पहिल्यांदा आमनेसामने असतील. दोन्ही संघाने फायनलमध्ये धडक मारल्यास तीन वेळा आमनासामना होण्याची शक्यता आहे. पाकिस्तान आणि नेपाळ यांच्यातील सामन्याने आशिया चषकाला दिमाखात सुरुवात झाली. 17 सप्टेंबर 2023 पर्यंत आशिया चषकाचा थरार रंगणार आहे. भारत, पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, अफगाणिस्थान आणि नेपाळ या देशांमध्ये ही स्पर्धा रंगणार आहे. 13 एकदिवसीय सामन्यानंतर आशियाचा किंग कोण ? यावरुन पडदा उठणार आहे.
भारत-पाकिस्तान तीन वेळा आमनेसामने ?-
आशिया चषकामध्ये टीम इंडिया आणि पाकिस्तान एकाच गटामध्ये आहेत. अ गटामध्ये भारत, पाकिस्तान आणि नेपाळ संघ आहे. तर ब गटामध्ये अफगाणिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका असे तीन संघ आहेत. आशिया चषकामध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये तीन सामने रंगण्याची शक्यता आहे. साखळी फेरीत भारत आणि पाकिस्तान यांच्यात लढत होईल. त्यानंतर सुपर - 4 मध्ये पुन्हा एकदा आमनेसामने येतील... जर सुपर 4 मध्ये दोन्ही संघाने गुणतालिकेत आघाडीवर स्थान पटकावले तर आशिया चषकाची फायनल भारत आणि पाकिस्तान यांच्यात होण्याची शक्यता आहे.
यंदा आशिया कप एकदिवसीय स्वरुपात
आशिया चषक म्हणजे विश्वचषकाची रंगीत तालीमच होय. पुढील महिन्यात भारतामध्ये एकदिवसीय विश्वचषक होणार आहे. त्यापार्श्वभूमीवर यंदाचा आशिया चषक एकदिवसीय स्वरुपात होत आहे. यावेळी आशिया कप स्पर्धेच्या एका गटात भारत, पाकिस्तानसह नेपाळ हा संघ असेल. तर श्रीलंका, बांगलादेश आणि अफगाणिस्तान दुसऱ्या गटात आहेत. यामध्ये एकूण 13 सामने खेळवले जाणार आहेत. आशिया कपमध्ये 6 सुपर 4 सामने होणार आहेत.
आशिया चषकासाठी हायब्रिड मॉडेल
आशिया चषकासाठी हायब्रिड मॉडेल वापरण्यात आलेय. पाकिस्तानमध्ये चार सामने होणार आहेत. तर उर्वरित सर्व सामने श्रीलंकामध्ये खेळवण्यात येणार आहेत. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील थरारक सामना श्रीलंकामध्ये होणार आहे.
आशिया कपसाठी टीम इंडियाचा संघ
रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, रवींद्र जाडेजा, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी, इशान किशन, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, प्रसिद्ध कृष्ण.
राखीव खेळाडू : संजू सॅमसन
आशिया कपसाठी पाकिस्तानचा संघ
फखर जमां, इमाम उल हक, बाबर आजम (कर्णधार), मोहम्मद रिजवान (विकेटकीपर), आगा सलमान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, फहीम अशरफ, मोहम्मद हारिस, मोहम्मद वसीम जुनिअर, अब्दुल्ला शफीक, उसामा मीर, सऊद शकील, मोहम्मद नवाज, शाहीन अफरीदी, नसीम शाह, हारिस रऊफ.