IND vs NZ: भारतासमोर ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीचे आव्हान? विराट कोहली म्हणाला...
IND vs NZ: यापूर्वीचे आकडे पाहता भारतीय संघाला 2003 च्या विश्वचषकापासून आयसीसी स्पर्धेत न्यूझीलंडला पराभूत करता आलेले नाही. यामुळे उद्याचा सामना खूपच रोमांचक होण्याची अपेक्षा आहे.
T20 World Cup 2021: टी-20 विश्वचषकाच्या सुपर-12 फेरीतील पहिल्याच सामन्यात भारताला पाकिस्तानकडून पराभव स्वीकारावा लागला. भारताविरुद्ध खेळण्यात आलेल्या सामन्यात पाकिस्तानकडून शाहीन आफ्रिदीने आक्रमक गोलंदाजी केली. पाकिस्तानचा डावखुरा वेगवान गोलंदाज शाहीनआफ्रिदीने सामन्याच्या सुरुवातीलाच भारताचे सलामीवर रोहित शर्मा आणि केएल राहुलला बाद करून संघाला दबावात टाकले. परिणामी, भारतीय संघाला चांगल्या धावा करत्या आल्या नाहीत. ज्यामुळे भारतीय संघाला 10 विकेट्सने पराभव पत्कारावा लागला. भारताचा पुढील सामना न्यूझीलंडसोबत (India Vs New Zealand) होणार आहे. न्यूझीलंडचा डावखुरा गोलंदाज ट्रेन्ट बोल्टच्या (Trent Boult) गोलंदाजीसमोर भारताला संघर्ष करावा लागण्याची शक्यता आहे. यावर भारताचा कर्णधावर विराट कोहलीने (Virat Kohli) प्रतिक्रिया दिली आहे.
पाकिस्तानच्या शाहीन आफ्रिदीने भारतासमोर गोलंदाजी केली, तशीच योजना ट्रेन्ट बोल्ट आखण्याची शक्यता आहे. शाहीन आफ्रिदीच्या गोलंदाजीसमोर भारतीय संघ डगमगताना दिसला, याचाच फायदा घेण्याचा ट्रेन्ट बोल्ट प्रयत्न करणार आहे. शाहीन आफ्रिदीने भारताविरुद्ध चमकदार कामगिरी करत 4 षटकात 31 धावा देत 3 विकेट्स पटकावले. शाहीनने सुरुवातीलाच रोहित शर्मा आणि केएल राहुलला पॅव्हेलियनमध्ये पाठवून भारतीय संघाला बॅकफूटवर ढकलले. त्यामुळे भारतीय संघाला पाकिस्तानसमोर मोठे लक्ष्य देण्यात अपयश आले.
ट्रेंट बोल्टच्या वक्तव्यावर भारतीय कर्णधार विराट कोहलीने प्रतिक्रिया दिली आहे. कोहली म्हणाला की, "आम्ही ट्रेंट बोल्टसोबत बर्याच दिवसांपासून खेळत आहोत. यामुळे त्याच्या गोलंदाजीविरुद्ध खेळताना आम्हाला कोणताही अडचण येणार नाही. त्याला कसे खेळायचे? हे आम्हाला माहिती आहे. न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात भारत पुनरागमन करेल, असा विश्वासही विराट कोहलीने व्यक्त केला आहे.
आयसीसी टी-२० विश्वचषक स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंडचे संघ रविवारी (31 ऑक्टोबर) आमने- सामने येणार आहेत. भारत आणि न्यूझीलंडने आपला शेवटचा सामना गमावला असून दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होणारा सामना दोन्ही संघासाठी महत्वाचा आहे. या सामन्यात विजय मिळवणारा संघ उपांत्य फेरीच्या आशा कायम ठेवेल. परंतु, यापूर्वीचे आकडे पाहता भारतीय संघाला 2003 च्या विश्वचषकापासून आयसीसी स्पर्धेत न्यूझीलंडला पराभूत करता आलेले नाही. यामुळे उद्याचा सामना खूपच रोमांचक होण्याची अपेक्षा आहे.