IND vs ENG Test Series: पहिल्या कसोटीपूर्वी टीम इंडियाला धक्का, इंग्लंडमध्ये 259 धावा करणारा खेळाडू दुखापतग्रस्त, भारताची प्लेइंग 11 कशी असणार?
IND vs ENG : लीडस कसोटीपूर्वी भारतीय संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. सराव सामन्यात 259 धावा करणारा खेळाडू दुखापतग्रस्त झाल्यानं संघाबाहेर जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

लंडन : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांची कसोटी मालिका 20 जूनपासून सुरु होणार आहे. पहिला कसोटी सामना हेडिंग्लेच्या लीडसमध्ये होणार आहे. या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी टीम इंडियाच्या अडचणीत वाढ झाली आहे. टीम इंडियाचा युवा खेळाडू इंग्लंडमध्ये शानदार फॉर्ममध्ये होता. मात्र, तोच खेळाडू दुखापतग्रस्त झाला आहे. या खेळाडूचं नाव करुण नायर आहे. करुण नायरला तब्बल 8 वर्षानंतर टीम इंडियात कमबॅक करण्याची संधी मिळाली होती. करुण नायरनं सराव सामन्यांमध्ये 259 धावा केल्या होत्या. करुण नायरच्या बरगडीवर बॉल लागल्यानं तो दुखापतग्रस्त झाला आहे.
करुण नायर दुखापतग्रस्त टीम इंडियाला धक्का
करुण नायर पहिल्या कसोटीपूर्वी नेट्समध्ये सराव करत होता. या दरम्यान प्रसिद्ध कृष्णानं टाकलेला एक बॉल त्याच्या बरगडीवर लागला. यामुळं करुण नायर दुखापतग्रस्त झाला आहे. आता तो पहिली कसोटी खेळू शकेल की नाही याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे.
करुण नायरच्या दुखापतीवर बीसीसीआयकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. तो लीडस कसोटीपर्यंत फिट होईल का याबाबत देखील माहिती देण्यात आलेली नाही. जर त्याला झालेली दुखापत गंभीर असेल तर हा टीम इंडियासाठी मोठा धक्का ठरु शकतो.
करुण नायरनं भारतीय संघातून 2017 मध्ये कसोटी सामना खेळला होता. त्यानंतर त्याला कसोटी संघात स्थान मिळालं नव्हतं. आता त्याला पुन्हा इंग्लंड दौऱ्यासाठी निवडण्यात आलं आहे. इंग्लंड लायन्स विरुद्ध दोन सराव सामने खेळताना त्यानं तीन डावांमध्ये 259 धावा केल्या होत्या. करुण नायर या दौऱ्यावर द्वीशतक करणारा पहिला खेळाडू ठरला आहे.
करुण नायरला जर पहिल्या कसोटीमध्ये संधी मिळाली नाही तर अभिमन्यू ईश्वरनला संधी मिळू शकते. अभिमन्यू ईश्वरन भारत अ संघ आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये चांगली कामगिरी करत आहे. करुण नायरनं आयपीएलमध्ये चांगली कामगिरी केली होती. टीम इंडियाची प्लेईंग इलेव्हन टॉसपूर्वी जाहीर केली जाऊ शकते. करुण नायर संघात नसल्यास टीमच्या मधल्या फळीवर परिणाम होऊ शकतो.
इंग्लंडकडून पहिल्या कसोटीसाठी संघ जाहीर
भारताच्या पहिल्या कसोटीच्या संघात कुणाला स्थान मिळणार याबाबत सस्पेन्स कायम आहे. इंगल्ंडनं पहिल्या कसोटीसाठी संघ जाहीर केला आहे. बेन स्टोक्सच्या नेतृत्त्वात इंग्लंडनं 11 खेळाडूंचा संघ जाहीर केला आहे.
इंग्लंडचा संघ :
जॅक क्रॉली, बेन डकेट, ऑली पोप, जो रूट, हॅरी ब्रुक, बेन स्टोक्स (कर्णधार), जेमी स्मिथ, ख्रिस वोक्स, ब्रायडन कार्स, जोश टंग आणि शोएब बशीर.
भारताचा कसोटी मालिकेसाठी संघ :
शुभमन गिल (कर्णधार),रिषभ पंत (उपकर्णधार/विकेटकीपर),यशस्वी जयस्वाल,केएल राहुल,साई सुदर्शन,अभिमन्यु ईश्वरन,करुण नायर,नितीश रेड्डी,रवींद्र जडेजा,ध्रुव जुरेल,वॉशिंगटन सुंदर,शार्दुल ठाकुर,जसप्रीत बुमराह,मोहम्मद सिराज,प्रसिद्ध कृष्णा,आकाश दीप,अर्शदीप सिंह,कुलदीप यादव.





















