IND vs ENG | विराट कोहलीच्या नेतृत्त्वात टीम इंडियाचा कसोटीत सलग चौथा पराभव, पाहा धक्कादायक आकडे
IND vs ENG : इंग्लंड विरुद्धच्या कसोटी मालिकेतील पहिल्या सामन्यात टीम इंडियाचा पराभव झाला आहे. कर्णधार कोहलीच्या नेतृत्त्वात टीम इंडियाचा कसोटीत झालेला हा सलग चौथा पराभव आहे.
IND vs ENG | इंग्लंड विरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना टीम इंडियाने 227 धावांनी गमावला आहे. विराट कोहलीच्या नेतृत्त्वात खेळणाऱ्या टीम इंडियाचा हा सलग चौथा पराभव आहे. यापूर्वी भारताला कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्त्वात ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या कसोटीत एडिलेडमध्ये, न्यूझिलंड विरुद्धच्या कसोटीत क्राइस्टचर्च आणि वेलिंग्टनमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता.
दरम्यान, कोहली कर्णधार असताना टीम इंडियाने न्यूझिलंड दौऱ्यावर दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळली होती. ज्यामध्ये टीम इंडियाला क्लीन स्वीपचा सामना करावा लागला होता. त्यानंतर काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर एडिलेडमध्ये खेळवण्यात आलेल्या पहिल्या डे-नाईट कसोटीत टीम इंडियाचा आठ विकेट्सनी पराभव झाला होता. त्यानंतर विराट कोहली आपल्या मुलीच्या जन्मसाठी मायदेशी परतला होता. विराट कोहलीच्या गैरहजेरीत अजिंक्य रहाणेने टीम इंडियाची धुरा सांभाळली होती.
England win the first @Paytm #INDvENG Test!#TeamIndia will look to bounce back in the second Test. Scorecard 👉 https://t.co/VJF6Q62aTS pic.twitter.com/E6LsdsO5Cz
— BCCI (@BCCI) February 9, 2021
अजिंक्य रहाणेने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर असताना तीन कसोटी सामन्यांसाठी संघाचं कर्णधारपद सांभाळलं होतं. ज्यामध्ये भारताने मेलबर्न कसोटी सामना जिंकला, तर सिडनी कसोटी सामना ड्रॉ केला होता. त्यानंतर ब्रिस्बेनमध्ये खेळवण्यात आलेल्या अंतिम आणि चौथ्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर मात करत कसोटी मालिका आपल्या खिशात घातली होती.
इंग्लंडच्या विरोधातील चार कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी विराट कोहलीचं संघात पुनरागमन झालं. अशातच टीम इंडियाला मात्र विराट कोहलीच्या नेतृत्त्वात पुन्हा एकदा पराभवाचा सामना करावा लागला आहे. कोहलीच्या नेतृत्त्वात न्यूझिलंड दौऱ्यावर भारताचा सामना वेलिंग्टनमध्ये खेळवण्यात आला होता. जिथे टीम इंडियाला 10 विकेट्सनी पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर क्राइस्टचर्च कसोटीत भारताचा सात विकेट्सनी पराभव झाला आणि ती मालिका 0-2 ने गमावली. दरम्यान यानंतर कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे 2020 मध्ये टीम इंडियाने कोणताच कसोटी सामना खेळला नव्हता.
2020 च्या शेवटी भारतीय क्रिकेट संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर गेला होता आणि त्यावेळीही गुलाबी चेंडूच्या पहिल्या कसोटी सामन्यात पराभव पत्करावा लागला होता. विराट कोहलीच्या नेतृत्त्वात एडिलेड कसोटी सामन्यात टीम इंडियाचा दुसरा डाव केवळ 36 धावांवर आटोपला. जो आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात लाजीरवाणा पराभव मानला जातो.
यापूर्वी 2018 मध्ये इंग्लंड दौऱ्यावरही कोहलीच्या नेतृत्त्वात टीम इंडियाला पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील चार सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. तसेच इंग्लंड दौऱ्यापूर्वी साऊथ आफ्रिकेतही टीम इंडियाला कर्णधार विराट कोहलीच्या नेतृत्त्वात तीन सामन्यांच्या मालिकेत 2-1 ने पराभवाचा सामना करावा लागला होता.
महत्त्वाच्या बातम्या :