सिराजच्या माऱ्यापुढे साहेबांनी गुडघे टेकले, 20 धावांत 5 फलंदाज तंबूत, पहिल्या डावात भारताकडे 126 धावांची आघाडी
IND vs ENG 3rd Test, England 1st Innings : तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी मोहम्मद सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. सिराजने इंग्लंडच्या चार फलंदाजांना तंबूत पाठवलं.
IND vs ENG 3rd Test, England 1st Innings : तिसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी मोहम्मद सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडच्या फलंदाजांनी गुडघे टेकले. सिराजने इंग्लंडच्या चार फलंदाजांना तंबूत पाठवलं. सिराजच्या माऱ्यापुढे इंग्लंडचा डाव 319 धावांवर आटोपला. इंग्लंडने अवघ्या 20 धावांत अखेरचे पाच फलंदाज गमावले. पहिल्या डावात भारताने 126 धावांची आघाडी घेतली. भारताने दुसऱ्या डावात फलंदाजी करताना सावध सुरुवात केली. पण कर्णधार रोहित शर्मा याला बाद करण्यात इंग्लंडला यश आले आहे. यशस्वी जायस्वाल आणि शुभमन गिल हे युवा फलंदाज सध्या किल्ला लढवत आहेत. भारताची आघाडी 150 पेक्षा जास्त झाली आहे. रोहित शर्मा 19 धावा काढून बाद झाला.
राजकोट कसोटीमध्ये इंग्लंडचा संघ पहिल्या डावात 319 धावांत गारद झाला. इंग्लंडकडून बेन डकेट याने सर्वाधिक 153 धावांची खेळी केली. त्याशिवाय कर्णधार बेन स्टोक्स याने 41 धावा केल्या. भारताकडून मोहम्मद सिराज याने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. तर कुलदीप यादव आणि रवींद्र जाडेजा यांनी प्रत्येकी दोन दोन विकेट घेतल्या. जसप्रीत बुमराह आणि आर. अश्विन यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळाली. दरम्यान, तिसऱ्या दिवसाच्या दुसऱ्या सत्रात इंग्लंडने अखेरच्या पाच विकेट फक्त 20 धावात गमावल्या.
इंग्लंडची फलंदाजी ढेपाळली -
दुसऱ्या दिवशी बॅझबॉल खेळणारा इंग्लंडचा संघाने तिसऱ्या दिवशी भारताच्या माऱ्यापुढे लोटांगण घातले. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा इंग्लंडने दोन विकेटच्या मोबदल्यात 207 धावा केल्या होत्या. पण तिसऱ्या दिवशी हीच लय इंग्लंडला कायम ठेवता आली नाही. तिसऱ्या दिवशी इंग्लंडने आठ विकेट गमावल्या. त्यामुळे भारताने पहिल्या डावात 126 धावांची आघाडी घेतली. इंग्लंडने राजकोट कसोटीच्या दुसऱ्या दिवशी वनडे स्टाईल फटकेबाजी करत धावांचा पाऊस पाडला होता. त्यामुळे तिसऱ्या दिवशी इंग्लंडचा संघ मोठी धावसंख्या करेल, असा अंदाज वर्तवला जात होता. पण तिसऱ्या दिवशी भारताच्या माऱ्यापुढे इंग्लंडच्या फलंदाजांनी लोटांगण घातले. अखेरच्या 20 धावांत इंग्लंडने 5 विकेट गमावल्या.
युवा फलंदाजांवर भारताची मदार -
पहिल्या डावात भारताने 126 धावांची आघाडी घेतली. त्यानंतर दुसऱ्या डावात रोहित शर्मा आणि यशस्वी जायस्वाल यांनी संयमी सुरुवात केली. पण जो रुट यानं भारताच्या कर्णधाराला माघारी धाडले. रोहित शर्मा 19 धावा काढून तंबूत परतला. आता भारतीय संघाची धुरा युवा फलंदाजांवर आहे. सध्या यशस्वी जायस्वाल आणि शुभमन गिल मैदानावर आहेत. भारताची आघाडी 170 इतकी झाली आहे. दुसऱ्या डावात भारताने एक बाद 44 धावा केल्या आहेत.
भारताने पहिल्या डावात 445 धावा केल्या -
कर्णधार रोहित शर्माचं शतक, पदार्पणात सरफराज खानचं अर्धशतक, त्याशिवाय रवींद्र जाडेजा याचं संयमी शतकाच्या बळावर भारताने पहिल्या डावात 445 धावांचा डोंगर उभारला होता. इंग्लंडकडून मार्क वूड याने चार विकेट घेतल्या.