IND vs BAN: कानपूर कसोटीत रोहित शर्मा कुणाला संधी देणार? नव्या समीकरणासह मैदानात उतरणार? कोण बाहेर जाणार?
IND vs BAN 2nd Test: भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसरी कसोटी कानपूरमध्ये होणार आहे. दुसऱ्या कसोटीत भारतीय संघात बदल होण्याची शक्यता आहे.
IND vs BAN 2nd Kanpur Test Playing XI कानपूर : भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. पहिली कसोटी भारतीय संघानं जिंकत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुसरी आणि शेवटची कसोटी कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियममध्ये खेळवली जाणार आहे. भारतानं पहिल्या कसोटीत 280 धावांनी विजय मिळवत जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या रँकिंगमध्ये पहिलं स्थान कायम ठेवलं होतं. दुसऱ्या कसोटीत देखील विजय मिळवण्याच्या इराद्यानं टीम इंडिया मैदानात उतरेल. दुसऱ्या कसोटीत भारतीय संघात बदल होण्याची शक्यता आहे.
चेन्नईमध्ये झालेल्या कसोटीतील पीच लाल मातीपासून बनवलेली होती तर कानपूरची खेळपट्टी काल्या मातीपासून बनवलेली आहे. लाल मातीपासून बनवलेल्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना फायदा मिळतो तर काळ्या मातीपासून बनवलेल्या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना फायदा मिळतो. त्यामुळं भारतीय संघात बदल होण्याची शक्यता आहे. चेन्नईत भारतीय संघानं तीन वेगवान गोलंदाज आणि दोन फिरकी गोलंदाजांना संधी दिली होती. आता कानपूर कसोटीमध्ये ही स्थिती बदलण्याची शक्यता आहे. तीन फिरकी गोलंदाज आणि दोन वेगवान गोलंदाज या समीकरणासह भारतीय संघ मैदानात उतरु शकतो.
कोण संघाबाहेर जाणार?
भारताचा कॅप्टन रोहित शर्मा यानं चेन्नई कसोटीमध्ये जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि आकाशदीपला संघात स्थान दिलं होतं. कानपूर कसोटीमध्ये आकाशदीप किंवा मोहम्मद सिराज या पैकी एकाला बाहेर बसवलं जाऊ शकतं. तर, कुलदीप यादवला संघात स्थान दिलं जाण्याची शक्यता आहे. कानपूर कसोटीत रोहित शर्मा कुणाला स्थान देणार हे पाहावं लागेल. कुलदीप यादव हा कानपूरचा खेळाडू असल्यानं होमग्राऊंडवर त्याला स्थानिक प्रेक्षकांचा पाठिंबा मिळू शकतो.
टीम इंडियाची संभाव्य प्लेईंग इलेव्हन
यशस्वी जयस्वाल,रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, रिषभ पंत (विकेटकीपर), केएल राहुल, रवींद्र जडेजा, आर. अश्विन, कुलदीप यादव, आकाश दीप किंवा मोहम्मद सिराज, जसप्रीत बुमराह
दरम्यान, भारताला बांगलादेशला क्लीन स्वीप देण्याची संधी आहे. पहिल्या कसोटीत भारतानं वर्चस्व राखलं होतं. पाकिस्तानला त्यांच्या होम ग्राऊंडवर 2-0 असं पराभूत करुन आलेल्या बांगलादेशचं मनोबल वाढलेलं होतं. मात्र, चेन्नई कसोटीत भारताच्या फलंदाजांनी आणि गोलंदाजांनी केलेल्या दमदार कामगिरीमुळं विजय मिळवता आला. पहिल्या कसोटीत रिषभ पंत, शुभमन गिल, आर. अश्विन यांनी भारताकडून शतकी खेळी केली होती.
इतर बातम्या: