IND vs AUS 3rd ODI : निर्णायक सामना चेन्नईच्या मैदानात, याठिकाणी ऑस्ट्रेलिया आहे भारतावर भारी; वाचा सविस्तर
IND vs AUS: चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियम ज्याला चेपॉक स्टेडियम म्हणूनही ओळखले जाते. या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया या संघामध्ये सध्या सुरु असलेल्या मालिकेतील अखेरचा एकदिवसीय सामना खेळवला जाणार आहे.
MA Chidmbaram Stadium Records : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना एमए चिदंबरम स्टेडियम, चेपॉक, चेन्नई येथे खेळवला जाणार आहे. या मालिकेत सध्या दोन्ही संघ 1-1 ने बरोबरीत आहेत. अशा परिस्थितीत हा शेवटचा सामना मालिकेतील निर्णायक सामना ठरणार आहे. त्यामुळे सामना जिंकणारा संघ मालिकाही जिंकणार आहे. अशात या मैदानावरील दोन्ही संघांचे मागील आकडे पाहिले तर कांगारूचा संघ अधिक मजबूत दिसून येत आहे.
टीम इंडियाने चेपॉकमध्ये आतापर्यंत 13 एकदिवसीय सामने खेळले आहेत. यामध्ये 7 जिंकले आहेत आणि 5 गमावले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला आहे. म्हणजेच या मैदानावर टीम इंडियाची विजयाची टक्केवारी 58.33 इतकी आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियन संघ येथे 5 सामने खेळला आहे. या 5 पैकी 4 सामने कांगारूंनी जिंकले आहेत. याठिकाणी त्यांना केवळ एकच सामना गमावावा लागला आहे. म्हणजेच या मैदानावर ऑस्ट्रेलियाची विजयाची टक्केवारी 80 टक्के इतकी आहे. ऑस्ट्रेलियाने याठिकाणी भारत, झिम्बाब्वे, वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंड अशा संघाचा पराभव केला आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलियाचे संघ दोनदा आमनेसामने आले आहेत. यामध्ये ऑस्ट्रेलियाने प्रथमच बाजी मारली आणि भारतीय संघ दुसऱ्यांदा विजयी झाला. या मैदानावर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिला सामना झाला. ऑक्टोबर 1987 मध्ये झालेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा अवघ्या एका धावेने पराभव केला होता. 30 वर्षांनंतर सप्टेंबर 2017 मध्ये जेव्हा हे दोन संघ भिडले तेव्हा भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा 26 धावांनी पराभव केला होता.
चेपॉकची खेळपट्टी कशी असेल?
एमए चिदंबरम स्टेडियम म्हणजेच चेपॉक स्टेडियमची खेळपट्टी सामान्यत: मर्यादीत षटकाच्या क्रिकेटमध्ये फिरकीपटूंसाठी अनुकूल असते. तसंच वेगवान गोलंदाज आणि फलंदाजांना ही समान मदत करते. उद्या (22 मार्च) होणाऱ्या सामन्यांसाठी वेगवान गोलंदाजांना याठिकाणी चांगला स्विंग आणि सीम मिळेल असं म्हटलं जात आहे.
कसे आहेत दोन्ही संघ?
भारताचा एकदिवसीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), युझवेंद्र चहल, इशान किशन, श्रेयस अय्यर, रवींद्र जाडेजा, विराट कोहली, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, केएल राहुल, शुभमन गिल, शार्दुल ठाकूर, उमरान मलिक, जयदेव उनाडकट, वॉशिंग्टन सुंदर, सूर्यकुमार यादव.
ऑस्ट्रेलिया एकदिवसीय संघ : स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), शॉन अॅबॉट, अॅश्टन आगर, नॅथन एलिस, कॅमेरॉन ग्रीन, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस, मार्नस लॅबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉइनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झाम्पा
हे देखील वाचा-