T20 World Cup : भारताने स्कॉटलँडला तर हरवलं, आता उपांत्य फेरीचं गणित कसं असणार?
T20 World Cup : भारताने स्कॉटलँडचा सहज पराभव केला. मात्र उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी भारताला इतरांच्या जय-पराजयावर अवलंबून राहावं लागणार आहे.

T20 World Cup : दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानात शुक्रवारी झालेल्या सामन्यात भारताने स्कॉटलँडवर 8 विकेट अन् 13.3 षटकं राखून मोठा विजय मिळवला. या सामन्यात नाणेफेक जिंकून भारताने स्कॉटलँडच्या संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलं. भारतीय गोलंदाजांनी उत्कृष्ट गोलंदाजी करीत स्कॉटलँडच्या संघाला केवळ 85 धावांवरच गुडांळले. या लक्ष्याचा पाठला करण्यासाठी मैदानात उतरलेल्या भारताच्या सलामीवीरांनी 6.3 षटकातच संघाला विजय मिळवून दिलाय. भारताने स्कॉटलँडचा सहज पराभव केला. मात्र उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी भारताला अफगणिस्तान आणि न्यूझीलंडविरोधातील सामन्यावर अवलंबून राहावं लागणार आहे. त्याशिवाय अखेरच्या सामन्यात नेट रनरेटही वाढवावा लागेल.
काय असेल समीकरण ?
भारताने स्कॉटलँडचा पराभव केल्यानंतर ग्रुप ब मधील समीकरण अतिशय रोमांचंक झालं आहे. पाकिस्तानचा संघाने चार सामने जिंकत सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. उर्वरित एका जागेसाठी तीन संघ दावेदार आहेत. नामेबिया आणि स्कॉटलँड संघ आधीच स्पर्धेबाहेर पडले आहेत. न्यूझीलंडने चार सामन्यापैकी तीन सामन्यात विजय मिळवला आहे. न्यूझीलंडचा संघ सहा गुणांसह दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यांचा अखेरचा सामना अफगाणिस्तान संघाबरोबर आहे. अफगाणिस्तान संघ चार गुणांसह चौथ्या क्रमांकावर आहे. रविवारी या दोन संघामध्ये सामना रंगणार आहे. अफगाणिस्तान संघाला उपांत्य फेरीत पोहचण्यासाठी हा सामना मोठ्या फराकने जिंकावा लागेल. तर न्यूझीलंडलाही हा सामना जिंकून उपांत्य फेरीत पोहचण्याच्या आशा आहेत. भारत आणि अफगाणिस्तान संघानं दोन-दोन सामने जिंकले असून दोघांचेही चार गुण आहेत.भारताचा नेट रनरेट अफगाणिस्तानपेक्षा चांगला आहे. भारताचा रनरेटन 1.619 इतका आहे तर अफगाणिस्तानचा रनरेट 1.481 इतका आहे. भारताच्या उपांत्य फेरीचं तिकीट अफगाणिस्तान-न्यूझीलंड सामन्यावर आहे. जर अफगाणिस्तान संघानं न्यूझीलंडचा पराभव केला. तर न्यूझीलंड, भारत आणि अफगाणिस्तान यांचे प्रत्येकी सहा-सहा गुण (भारताचा अखेरचा सामना नामेबियाबरोबर आहे.) होतील. अशा परिस्थितीत ज्या संघाचा नेटरनरेट चांगला असेल तो संघ उपांत्य फेरीत पोहचेल. न्यूझीलंडचा नेट रनरेट चांगला आहे. न्यूझीलंडचा नेट रनरेट 1.277 इतका आहे. अफगाणिस्तान संघानं जर न्यूझीलंडचा पराभव केला तरिही भारताला नामेबिया संघाचा मोठ्या फरकानं पराभव करावा लागले. कारण न्यूझीलंडचा नेटरनरेट सर्वात चांगला आहे. भारताच्या उपांत्य फेरीचं गणीत रविवारी होणाऱ्या सामन्यावर अवलंबून आहे. क्रिकेट अनिश्चितता आणि चमत्काराचा खेळ म्हटलं जातं. नेदरलँडनं दोन वेळा तर बांगलादेश आणि अफगणिस्ताननं एक एक वेळा समीकरणं बदलली आहे. आता पुन्हा एकदा अफगाणिस्तान बलाढ्य संघाला परभवाचा धक्का देत विश्वचषकात उलटफेर करणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
स्कॉटलँडवर सोपा विजय -
नाणेफेक गमवून प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या स्कॉटलँडच्या संघाकडून जॉर्ज मुन्से (19 बॉल 24 धावा), काइल कोएत्झर (7 बॉल 1 धाव), मॅथ्यू क्रॉस (9 बॉल 2 धावा), रिची बेरिंग्टन (5 बॉल 0 धाव), कॅलम मॅकलिओड (28 बॉल 16), मायकेल लीस्क (12 बॉल 21 धावा), ख्रिस ग्रीव्हज (7 बॉल 1 धाव), मार्क वॉट (13 बॉल 14), अलास्डेअर इव्हान्स (1 बॉल 0 धाव), सफियान शरीफ (1 बॉल 0 धाव) आणि ब्रॅडली व्हीलने नाबाद 2 धावा केल्या. ज्यामुळे स्कॉटलँडच्या संघाला 17.4 षटकात केवळ 85 धावा करता आल्या. भारताकडून रविंद्र जाडेजा आणि मोहम्मद शामीला प्रत्येकी दोन- दोन विकेट्स मिळाले. त्यानंतर चक्रवर्तीला 2 दोन तर, आर अश्विनला एक विकेट प्राप्त झालीय. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारताकडून रोहित शर्माने (19 बॉल 50), केएल राहुल (16 बॉल 30 धावा) विराट कोहली (2 बॉल 2 धावा, नाबाद) आणि सुर्यकुमार यादवने 2 बॉलमध्ये 6 धावा केल्या. ज्यामुळे भारतीय संघाने स्कॉटलँडवर 8 विकेट्सने विजय मिळवलाय. स्कॉटलॅंडकडून मार्क व्हॅट आणि ब्रॅड्ली व्हील यांना प्रत्येकी एक एक विकेट्स मिळाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
