ICC T-20 World Cup 2024: रोहित शर्मा अन् अजित आगरकर यांना हार्दिक पांड्या पसंत नव्हता...; कोणाच्या दडपणामुळे संघात स्थान?, पाहा
ICC T-20 World Cup 2024: आयपीएल 2024 च्या हंगामात फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये हार्दिक पांड्या साजेशी कामगिरी केली नाही.
ICC T-20 World Cup 2024: आयपीएल 2024 हंगामानंतर लगेचच 1 जूनपासून अमेरिका आणि वेस्ट इंडिजमध्ये आयसीसी टी-20 विश्वचषक 2024 (ICC T-20 World Cup) स्पर्धा होणार आहे. यासाठी अनेक संघांनी आपल्या खेळाडूंची नावेही जाहीर केली असून स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. या विश्वचषकाच्या स्पर्धेत रोहित शर्मा (Rohit Sharma) भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. तर अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याला (Hardik Pandya) उपकर्णधार पदाची धुरा देण्यात आली आहे.
आयपीएल 2024 च्या हंगामात फलंदाजी आणि गोलंदाजीमध्ये हार्दिक पांड्या साजेशी कामगिरी केली नाही. याशिवाय हार्दिक पांड्या कर्णधार म्हणून आपली छाप सोडू शकलेला नाही. मात्र यानंतरही हार्दिक पांड्या टी-20 विश्वचषकाच्या संघात स्थान देऊन उपकर्णधारपदही देण्यात आल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. याचदरम्यान एक महत्वाची माहिती समोर आली आहे. खरेतर कर्णधार रोहित शर्मा आणि राष्ट्रीय निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांना हार्दिक पांड्याला संघात देखील स्थान द्यायचे नव्हते. मात्र, बीसीसीआयच्या दडपणाखाली या दोघांनी हार्दिकला संघात घेतल्याचा खुलासा झाला आहे.
हार्दिक पांड्याची निवड का झाली?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अहमदाबाद येथे झालेल्या संघ निवड बैठकीच्या वेळी रोहित शर्मा आणि राष्ट्रीय निवड समितीचे अध्यक्ष अजित आगरकर हे हार्दिकला संघात घेण्यास इच्छुक नव्हते. रोहित शर्मा आणि अजित आगरकर यांच्या तीव्र नापसंतीनंतरही बीसीसीआयने दडपण आणून हार्दिक पांड्याला संघात ठेवण्यास त्यांना बाध्य केले. नंतर त्याच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारीही सोपविली.
टी20 विश्वचषकासाठी भारतीय संघ -
रोहित शर्मा(कर्णधार), यशस्वी जयस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (विकेटकीपर), संजू सॅमसन (विकेटकीपर), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शिवम दुबे, रवींद्र जाडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल, अर्शदीप सिंह, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
राखीव खेळाडू-
शुभमन गिल, रिंकू सिंग, आवेश खान, खलील अहमद
टी-20 विश्वचषक 2024 चा फॉरमॅट असा असेल-
आगामी टी-20 विश्वचषक 1 जून ते 29 जून दरम्यान वेस्ट इंडिज आणि यूएसएमध्ये खेळवला जाणार आहे. 20 संघांची ही स्पर्धा बाद फेरीसह एकूण 3 टप्प्यात खेळवली जाईल. सर्व 20 संघ प्रत्येकी 5 च्या 4 गटात विभागले जातील. प्रत्येक गटातील टॉप-2 संघ सुपर-8 मध्ये प्रवेश करतील. यानंतर, सर्व 8 संघ प्रत्येकी 4 च्या 2 गटात विभागले जातील. सुपर-8 टप्प्यात दोन्ही गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. दोन संघ उपांत्य फेरीच्या दोन सामन्यांद्वारे अंतिम फेरीत प्रवेश करतील.
विश्वचषकाचा गट असा असेल -
अ गट- भारत, पाकिस्तान, आयर्लंड, कॅनडा, अमेरिका
ब गट- इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, नामिबिया, स्कॉटलंड, ओमान
क गट- न्यूझीलंड, वेस्ट इंडिज, अफगाणिस्तान, युगांडा, पापुआ न्यू गिनी
ड गट- दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, बांगलादेश, नेदरलँड, नेपाळ