ICC Test Rankings : शुभमन गिलचा 'सुपरफॉर्म', एका सामन्यात 430 धावा अन् ICC टेस्ट रँकिंगमध्ये भारताच्या कर्णधाराची मुसंडी, रूटला मात्र 'दे धक्का'
भारतीय कर्णधार शुभमन गिलला कसोटी मालिकेतील तुफानी कामगिरीबद्दल आयसीसीने बक्षीस दिले आहे.

ICC Test Rankings Shubman Gill : भारतीय कर्णधार शुभमन गिलला कसोटी मालिकेतील तुफानी कामगिरीबद्दल आयसीसीने बक्षीस दिले आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत गिलने सहकारी खेळाडू ऋषभ पंतसह 15 फलंदाजांना मागे टाकले आहे. तो त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम कसोटी क्रमवारीत पोहोचला आहे. पण, तो अजूनही यशस्वी जैस्वालच्या मागे आहे. याच वेळी, हॅरी ब्रूकने इंग्लंडचा धडाकेबाज फलंदाज जो रूटला मागे टाकले आहे. ब्रूक कसोटी क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे, तर रूट दुसऱ्या क्रमांकावर घसरला आहे.
कसोटी कर्णधार बनल्यानंतर शुभमन गिल इंग्लंडसोबत सुरू असलेल्या कसोटी मालिकेत भरपूर धावा करत आहे. त्याने दुसऱ्या कसोटी सामन्यात 430 धावा केल्या आहेत. गिलने एजबॅस्टन येथे खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात द्विशतक झळकावले, तर दुसऱ्या डावात त्याने शतक झळकावून संघाला मोठ्या धावसंख्येपर्यंत पोहोचवले. गिलच्या शानदार कामगिरीचे परिणाम म्हणजे तो कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. पहिल्या कसोटीनंतर, गिल 21 व्या स्थानावर होता. त्याचे रेटिंग गुण 807 पर्यंत वाढले आहेत.
ICC टेस्ट रँकिंगमध्ये भारताच्या कर्णधाराची मुसंडी
शुभमन गिलचे मागील सर्वोत्तम कसोटी क्रमवारी 14 व्या क्रमांकावर होते, परंतु आता तो 807 रेटिंग गुणांसह सहाव्या क्रमांकावर पोहोचला आहे. ही त्याच्या मागील सर्वोत्तमपेक्षा 106 गुणांची मोठी झेप आहे. अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीच्या सुरुवातीला भारताच्या कसोटी कर्णधारपदाची सूत्रे स्वीकारल्यापासून गिल परदेशात चांगली कामगिरी करत आहे. आशियाबाहेर त्याच्या कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या टीकाकारांची तोंडे बंद केली आहेत. गिलने इंग्लंडमध्ये आल्यापासून दोन शतके आणि एक द्विशतक ठोकले आहे.
यशस्वी जैस्वाल चौथ्या क्रमांकावर कायम
यशस्वी जैस्वालने त्याचे चौथे स्थान कायम ठेवले आहे. डावखुरा सलामीवीर याने मालिकेच्या पहिल्या सामन्यात शतक झळकावल्यानंतर बर्मिंगहॅम कसोटीच्या पहिल्या डावात 87 धावांची शानदार खेळी खेळली. अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करूनही यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत एका स्थानाने घसरून सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. पंतने पहिल्या कसोटीच्या दोन्ही डावात शतक झळकावले आणि बर्मिंगहॅममध्ये दुसऱ्या डावात 65 धावांच्या तुफानी खेळी खेळली.
हॅरी ब्रूक जो रूटला दिला धक्का!
हॅरी ब्रूक नंबर वन कसोटी फलंदाज बनला आहे. ब्रूकने पहिल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात 99 धावा केल्या तर दुसऱ्या डावात शतक झळकावले. या शानदार खेळीच्या जोरावर तो नंबर वन कसोटी फलंदाज बनला. या काळात जो रूट दोन्ही कसोटी सामन्यांमध्ये काही खास दाखवू शकला नाही. तो मोठी खेळी खेळू शकला नाही. अशा परिस्थितीत ब्रूकने त्याची जागा घेतली.





















