(Source: ECI/ABP News/ABP Majha)
आयसीसी वन-डे क्रमवारीत विराट-रोहित अव्वल, तर गोलंदाजांच्या यादीत बुमराह दुसऱ्या स्थानावर
आयसीसीने जाहीर केलेल्या रँकिंगमध्ये विराट आणि रोहितने आपलं अव्वल स्थान कायम ठेवलं आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा या दोघांनीही आयसीसीच्या वन-डे क्रमवारीत आपलं पहिलं आणि दुसरं स्थान कायम ठेवलं आहे.
दुबई : भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि उपकर्णधार रोहित शर्मा या दोघांनीही आयसीसीच्या वन-डे क्रमवारीत आपलं पहिलं आणि दुसरं स्थान कायम ठेवलं आहे. तर गोलंदाजांच्या यादीत भारतीय गोलंदाज बुमराह दुसऱ्या स्थानावर आहे. मंगळवारी जारी करण्यात आलेल्या रँकिंगमध्ये कोहली 871 गुणांसह टॉपवर आहे. तर रोहित 855 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे. या यादीत तिसऱ्या स्थानावर 829 गुणांसह पाकिस्तानचा फलंदाज बाबर आजम हा आहे.
गोलंदाजांच्या यादीमध्ये बुमराह (719 गुण) दुसऱ्या स्थानावर तर न्यूझिलंडचा ट्रेंड बोल्ट (722 गुण) पहिल्या स्थानावर आहे. अफागाणिस्तानचा मुजीब उर रहमान 701 गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे. ऑलराउंडर खेळाडूंच्या यादीत टॉप 10 खेळाडूंच्या यादीत रविंद्र जडेजा एकमेव भारतीय खेळाडू असून तो आठव्या स्थानावर आहे. अफगानिस्तानचा मोहम्मद नबी या यादीत टॉपवर आहे. तर इंग्लंडचा बेन स्टोक्स दुसऱ्या स्थानावर आहे.
यादरम्यान, रॅकिंगच्या दृष्टिने इंग्लंडचा जेसन रॉय आणि जॉनी बेयरस्टोच्या कामगिपरीवर नजर असणार आहे. 30 जुलै पासून आयसीसीच्या बहुचर्चित ODI Super League स्पर्धेला सुरुवात होणार आहे. भारतात 2023 साली होणाऱ्या स्पर्धेत पात्र ठरण्यासाठी ही स्पर्धा प्रत्येक संघासाठी महत्वाची आहे. 4 महिन्यांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला सुरुवात झालेली असली तरीही डिसेंबर महिन्याखेरीस भारतीय क्रिकेटपटू आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी मैदानात उतरताना दिसणार नाहीत. त्यामुळे आपल्या लाडक्या क्रिकेटपटूंना मैदानात पाहण्यासाठी भारतीय चाहत्यांना थोडी वाट पहावी लागणार आहे.
कोरोनानंतरच्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय मालिकेत इंग्लंडची सरशी
कोरोना संकटानंतरच्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय कसोटी मालिकेत इंग्लंडनं सरशी साधली. मॅन्चेस्टरच्या ओल्ड ट्रॅफर्डवर खेळवण्यात आलेल्या तिसऱ्या कसोटीत स्टुअर्ट ब्रॉडच्या भेदक माऱ्याच्या जोरावर इंग्लंडनं वेस्ट इंडिजचा 269 धावांनी धुव्वा उडवला आणि तीन सामन्यांची मालिका 2-1 अशी खिशात घातली. या सामन्यात इंग्लंडनं विंडिजसमोर 399 धावांचं आव्हान ठेवलं होतं. पण स्टुअर्ट ब्रॉड आणि ख्रिस वोक्सच्या भेदक माऱ्यासमोर विंडीजचा दुसरा डाव 129 धावातच आटोपला. ब्रॉडनं पहिल्या डावात सहा तर दुसऱ्या डावात विंडीजच्या चार फलंदाजांना माघारी धाडून इंग्लंडच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली. तर वोक्सनं दुसऱ्या डावात पाच विकेट्स घेतल्या.
ब्रॉडच्या कसोटीत 500 विकेट्स पूर्ण
मॅन्चेस्टर कसोटीत वेगवान गोलंदाज स्टुअर्ट ब्रॉडनं कसोटी कारकीर्दीत 500 विकेट्स घेण्याचा पराक्रम गाजवला. दुसऱ्या डावात विंडीजच्या क्रेग ब्रेथवेटला माघारी धाडत ब्रॉडनं 500 विकेट्सचा टप्पा ओलांडला. अशी कामगिरी करणारा ब्रॉड हा जगातला सातवा तर जेम्स अँडरसननंतर इंग्लंडचा दुसराच गोलंदाज ठरला. ब्रॉडनं आतापर्यंत 140 कसोटी सामन्यात इंग्लंडचं प्रतिनिधीत्व करताना 28 च्या सरासरीनं 501 विकेट्स आपल्या नावावर केल्या आहेत.
महत्त्वाच्या बातम्या :
कोरोनानंतरच्या पहिल्याच आंतरराष्ट्रीय मालिकेत इंग्लंडची सरशी; स्टुअर्ट ब्रॉडची विक्रमी कामगिरी
क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी, 19 सप्टेंबरपासून IPL ची सुरुवात