IND vs PAK: 48 चेंडूत 48 धावा, 8 विकेट हातात...तरिही पाकिस्तानने सामना गमावला, भारतानं कमबॅक केलं कसं?
IND vs PAK, T20 World Cup 2024 : पाकिस्तानला विजयासाठी 48 चेंडूत फक्त 48 धावांची गरज होती, 8 विकेट हातात होत्या. मोहम्मद रिझवान तळ ठोकून होता. तरीही बाबर आझमच्या नेतृत्वातील पाकिस्तान संघाला पराभवाचा सामना करावा लागला.
IND vs PAK, T20 World Cup 2024 : पाकिस्तानला विजयासाठी 48 चेंडूत फक्त 48 धावांची गरज होती, 8 विकेट हातात होत्या. मोहम्मद रिझवान तळ ठोकून होता. तरीही बाबर आझमच्या नेतृत्वातील पाकिस्तान संघाला पराभवाचा सामना करावा लागला. या पराभवामुळे पाकिस्तानचं स्पर्धेतील आव्हान खडतर झालेय. पाकिस्तानचं आव्हान साखळी फेरीतच संपुष्टात येण्याची शक्यता आहे. टी20 विश्वचषकात न्यूयॉर्कमधील मैदानात पाकिस्तानच्या फलंदाजांनी नांगी टाकली, 120 धावांचा पाठलाग करणारा पाकिस्तान विजयाच्या उंबरठ्यावर होता. 48 चेंडूत 48 धावांची गरज होती, तेथून भारतीय गोलंदाजांनी सामना खेचून आणला. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यापुढे पाकिस्तानची फलंदाजी ढेपाळली. पाकिस्तानला हा सामना 6 धावांनी गमवावा लागला. जसप्रती बुमराह, हार्दिक पांड्या, अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंह यांनी भेदक मारा करत सामना जिंकून दिला.
विकेट फेकल्या, रनरेट वाढतच गेला, त्यानंतर....
13 व्या षटकांपर्यंत सामना पाकिस्तानच्या बाजूने होता. फखर जमान आणि मोहम्मद रिझवान शानदार फलंदाजी करत होते. भारताच्या विजयाची शक्यता कमीच होती. पण 13 वे षटक घेऊन हार्दिक पांड्या आला. त्यानं या षटकात फखर जमान याची महत्वाची विकेट घेतली. पाकिस्तानला हा तिसरा धक्का बसला. त्यानंतर पाकिस्तानच्या फलंदाजांनी ठरावीक अंतराने विकेट फेकल्या. पाकिस्तानचा सलामी फलंदाज मोहम्मद रिझवान दुसऱ्या बाजूला शानदार फलंदाजी करत होता. तो सामना भारताच्या हातून हिसकावणार, असेच वाटत होते. पण 15 व्या षटकात जसप्रीत बुमराहने मोहम्मद रिझवानच्या दांड्या उडवल्या अन् सामन्यात भारत वरचढ ठरला. ठरावीक अंतराने विकेट फेकल्या, त्यात निर्धाव चेंडू जास्तच गेले. त्यामुळेच पाकिस्तानचा नेटरेट वाढत गेला. पाकिस्तान संघ अतिशय पॅनिक झाला... उर्वरित काम भारतीय गोलंदाजांनी केले.
पाकिस्तानच्या फलंदाजांनी हाराकिरी केली, सामना भारताने जिंकला
भारतीय भेदक माऱ्यापुढे पाकिस्तानच्या फलंदाजी ढेपाळली. एकवेळ सामन्यात वरचढ असताना पाकिस्तानने सामना गमावला. हार्दिक पांड्या आणि जसप्रीत बुमराह यांनी मोक्याच्या क्षणी विकेट घेतल्या. अक्षर पटेल आणि मोहम्मद सिराज यांनी टिच्चून मारा करत धावा रोखल्या. इमाद वसीम 23 चेंडूमध्ये 15 धावा काढून बाद झाला. इफ्तिखार अहमद याने 9 चेंडूत पाच धावा करत विकेट फेकली, त्यामुळे पाकिस्तान आणखी अडचणीत सापडला. मोहम्मद रिझवान सेट झाला होता, त्याने विकेट फेकली. परिणामी पाकिस्तानचा सहा धावांनी पराभव झाला.
ये वीडियो नहीं देखा, तो कुछ नहीं देखा...
— Dinesh Purohit (@Imdineshpurohit) June 9, 2024
आप भी देखिए 👇 pic.twitter.com/o1RMP0VtXv
बुमराहचा भेदक मारा
भारताकडून प्रत्येक गोलंदाजांनी भेदक मारा केला. मोक्याच्या वेळी विकेट घेत पाकिस्तानला अडचणीत टाकले. भारताकडून जसप्रीत बुमराह सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने चार षटकात फक्त 14 धावा खर्च करत महत्वाच्या तीन विकेट घेतल्या. यामध्ये पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझम आणि अनुभवी मोहम्मद रिझवान याचा समावेश होता. हार्दिक पांड्या याने 4 षटकात 24 धावा खर्च करत दोन विकेट घेतल्या. त्याशिवाय अक्षर पटेल आणि अर्शदीप सिंह यांना प्रत्येकी एक एक विकेट मिळल्या. साखळी सामन्यात भारतीय संघाने दुसऱ्या विजयाची नोंद केली.या विजयासह भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहचलाय. तर दुसरीकडे पाकिस्तानचा संघ स्पर्धेबाहेर जाण्याच्या मार्गावर पोहचलाय. त्यांना उर्वरित दोन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील, त्याशिवाय अमेरिका उर्वरित दोन्ही सामन्यात पराभूत व्हावं लागेल.